31 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरमहाराष्ट्रज्येष्ठ मराठी साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

ज्येष्ठ मराठी साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

मराठी साहित्य क्षेत्रातील ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक म्हणून लौकीक असणारे ज्येष्ठ राहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बुधवारी (दि.30) रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. नागनाथ कोत्तापल्ले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष देखील होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे जन्म झाला. त्यांचे शिक्षणही मराठवाड्यातच पूर्ण झाले. बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ते औरंगाबादला विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. १९९३ च्या सुमारास ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक बनले. त्यानंतर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली.

औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू असताना नागनाथ कोत्तापल्ले यांनी कॉपीमुक्ती अभियान राबवून ते यशस्वी करणारे ते एकमेव कुलगुरू ठरले. कॉपीमुक्तीसाठी त्यांनी जे पत्र विद्यार्थ्यांना लिहिले होते त्या पत्राचा इतका मोठा प्रभाव विद्यार्थ्यांवर झाला, की विद्यार्थीच स्वयंस्फुर्तीने या अभिनयानामध्ये सहभाग घेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी केले.
बहुआयामी साहित्यिक अशी डॉ. कोत्तापल्ले यांची ओळख होती.

कर्फ्यू आणि इतर कथा, संदर्भ, राजधानी, रेखा आणि पाऊस, कवीची गोष्ट, देवाचे डोळे, सावित्रीचा निर्णय हे त्यांचे कथा संग्रह आहेत. तर मध्यरात्र, गांधारीचे डोळे, पराभव या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे. पापुद्रे, ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध, नवकथाकार शंकर पाटील, साहित्य अन्वयार्थ, मराठी कविता : एक दृष्टीक्षेप, साहित्याचा अवकाश अशी त्यांची समीक्षेची पुस्तके देखील आहेत. तसेच मराठी साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक संघर्ष, गावात फुलले चांदणे, ज्योतिपर्व (ज्योतिराव फुले यांचे चरित्र), उद्याच्या सुंदर दिवसासाठी, कोमेजलेला चंद्र (उडिया अनुवाद, सुवर्णबुद्ध (अनुवाद) आदी पुस्तकांचे देखील त्यांनी लेखन केले आहे.
हे सुद्धा वाचा
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या !, कोर्टाने दिला मोठा निर्णय
आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत, उदयनराजेंचा सर्व पक्षांना इशारा
महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेण्याचे पाप कुणाचे, आता होणार ‘न्याय’

त्यांच्या मूड्स कवितासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार, गांधारीचे डोळे, ग्रामीण साहित्य, उद्याच्या सुंदर दिवसासाठी, केशवराव विचारे पारितोषिक, बी. रघुनाथ पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, परिमल पुरस्कार, गिरीष गांधी साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार आदी पुरस्कार त्यांच्या साहित्यकृतींना मिळाले आहेत.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!