28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरमहाराष्ट्र'कंत्राटी'वरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये ट्विटर वॉर!

‘कंत्राटी’वरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये ट्विटर वॉर!

कंत्राटी भरतीचा जीआर राज्य सरकारने रद्द केला असला तरी त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर त्याचे खापर फोडले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पार्श्वभूमीवर विरोधकांना जनतेची माफी मागण्याचे आवाहन केले होते. त्यावर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली होती. आता राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगले आहे.

नक्की प्रकरण काय?

राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने शिक्षक आणि पोलिस भरतीचा निर्णय घेतला होता. यावर विरोधकांनी चौफेर टीका केल्यानंतर राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ‘कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसने केली. आता त्याविरोधात आंदोलन करण्यासाठी यांना लाजा कशा वाटत नाहीत? कंत्राटी भरतीचे पाप त्यांचे आहे. त्यांच्या पापाचे ओझे आपल्या सरकारने का उचलावे?’ असा सवाल फडणवीस यांनी केला होता.तसेच, ‘ उद्धव ठाकरे सरकारने कंत्राटी भरतीला मान्यता दिली. आता सगळ्यांचे घोटाळे उघडे करणार,’ असा इशाराही त्यांनी दिला होता.

यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना जनतेची माफी मागण्याचे आवाहन केले होते. तसेच, माफी न मागितल्यास राज्यभर आंदोलनाचा इशाराही दिला होता. यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, “या गृहस्थांचे समाजात, जनमानसात नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिले नव्हते. ज्या व्यक्तीला त्यांचा पक्ष तिकीट देत नाही, ज्याला त्यांचा पक्ष तिकीट देण्याच्याही लायकीचा मानत नाही, त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं.”

“चंद्रशेखर बावनकुळे वारंवार बारामतीवर बोलत आहेत. कारण बातमी छापावी आणि लोकांनी वाचावी असे त्यांना वाटते. जे पक्षाला तिकीट द्यायलाही योग्य वाटत नाहीत त्यांनी बारामतीवर चर्चा करण्याचं काही कारण नाही,” असा टोला शरद पवार यांनी बावनकुळेंना लगावला.

यानंतर, भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आणि या आरोप-प्रत्यारोपांचे ट्विटर वॉरमध्ये रूपांतर झाले.

भाजपचे शरद पवारांना उत्तर

भाजप महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं जेवढं वय आहे त्याहून अधिक वर्षे शरद पवारजी यांची राजकीय कारकीर्द आहे. आपल्याहून लहान कार्यकर्त्याला बळ देणं, प्रोत्साहन देणं हे पवारांना माहिती नाही म्हणून ते बावनकुळेजींविरोधात बोलले आहेत. हाच त्यांच्या राजकारणाचा स्वभाव राहिला आहे. त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आणि त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल आम्ही बोलायची गरज नाही. त्यांचे सहकारी अजित दादा, छगन भुजबळ यावर बोलले आहेत.”


“भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं काम बघून त्यांना भाजपनं प्रदेशाध्यक्ष केलं आहे. संघटन सर्वोपरी या धारणेने ते काम करताहेत. शरद पवार आणि विरोधकांना बोलायला मुद्दे नाहीत त्यामुळे ते आमच्यावर टीका करताहेत पण आम्ही पवार आणि ठाकरे यांना प्रश्न विचारत राहणार. हिंदू धर्म संपविणाऱ्या स्टॅलिनला तुमचं समर्थन आहे का? कंत्राटी भरतीसाठीचा जीआर काढून तशी भरती प्रक्रिया राबविल्याबद्दल आणि नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या तरुण पिढीची फसवणूक केल्याबद्दल तरुणांची माफी कधी मागणार?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादीचा पलटवार

शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पलटवार करण्यात आला आहे. “आदरणीय पवार साहेब यांची जेवढी राजकीय कारकीर्द आहे तितकं बावनकुळे यांचं वय आहे. याची जाण तुम्हाला उशिरा का होईना झाली हे महत्वाचं! फक्त एक राहून गेलं, ते म्हणजे आदरणीय साहेबांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही तपास यंत्रणांचा गैरवापर करून फोडाफोडीचं राजकारण करून घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापण्याची मुळीच राहिलेली नाही. पवार साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा यांच्या हिताचे जे सर्वसमावेशक निर्णय घेतले त्याची सर तुम्हाला येणार नाही हे महाराष्ट्र जाणतो.”


“स्व. यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेल्या राजकीय आदर्शावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. जातीय तेढ निर्माण करणं, विकासाऐवजी केवळ धर्माचं राजकारण करणं ही वृत्ती पवार साहेबांनी कधीच जोपासली नाही. आणि हो… तुम्ही कितीही रेटून खोटं बोलून तुमचं कंत्राटी भरतीचं पाप दुसऱ्याच्या माथी टाकण्याचा प्रयत्न करा, महाराष्ट्राला हे चांगलेच माहित आहे की, त्यावेळेसच्या कॅबिनेटमधील मंत्री जे तुमच्यासोबत आता सत्तेत आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्यास असमर्थ आहात.”

“आणि बावनकुळेजी…आपल्या संपूर्ण हयातीत आदरणीय पवार साहेबांनी सत्तेच्या स्वार्थासाठी दिल्लीच्या तख्तापुढे गुडघे टेकले नाहीत बरं… तर मतांसाठी धार्मिक राजकारणही केलं नाही. आदरणीय पवार साहेब स्वाभिमानाने ‘महाराष्ट्र धर्म’ पाळणारे आहेत. कारण छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार त्यांच्या आचरणात आहे, १३० कोटी देशवासियांची फसवणूक करणाऱ्या ढोंगी वृत्तीचा नव्हे!”

हे ही वाचा 

चंद्रशेखर बावनकुळेंचे वाभाडे; काय म्हणाले शरद पवार?

कंत्राटी भरतीप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा करारा जवाब

अग्निवीर योजनेवरून रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली

भाजप-राष्ट्रवादिमध्ये ट्विटर वॉर सुरुच!

भाजपने राष्ट्रवादीवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. आपल्या पोस्ट मधून त्यांनी लिहिले, “फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो शरद पवार यांनीच. अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं.”


“स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन तुम्ही कायम त्यांच्याविचारांविरोधात भूमिका घेतल्या. ज्या काँग्रेसच्या हाताला धरून तुम्ही राजकारणात आलात त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली हा इतिहास आहे. विदेशी वंशाच्या मुद्द्यांवर सोनिया गांधी यांना विरोध करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या समोर गुडघे टेकून मुजरा केला. त्यामुळे स्वाभिमानाची भाषा तुम्हाला शोभत नाही.”

“धार्मिक राजकारणाचा आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर १३ व्वा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाल्याचा कांगावा मतं मिळवण्यासाठी तुम्ही केला होता. भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि राजकारण मात्र घराणेशाही आणि स्वार्थासाठी करायचं ही खरी ‘ढोंगी‘ वृत्ती आहे. लोकांना हे ठाऊक असल्याने पवार, तुमचे नेतृत्व महाराष्ट्राने कधी स्विकारले नाही. तुम्ही अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते आहात.”

राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप यांच्यामधील ट्विटर युद्ध काही संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाही. आता ह्या दोन्ही पक्षांमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कुठपर्यंत चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी