गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील (Bhavini Patil) यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या पॅनलच्या पराभवानंतर फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “गावातीलच काही लोकांच्या चुकीच्या प्रपोगांडामुळे पराभव झाला,” असे त्यात म्हटले आहे. पॅनलच्या पराभवाचे राजकीय भांडवल करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी कधीही माझ्या विरोधात कुठलेही कारस्थान केलेले नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी या पोस्टमधून दिले आहे.
गिरीश महाजन यांचा उजवा हात मानले जाणारे, कट्टर समर्थक कार्यकर्ते प्रा. शरद पाटील यांच्या पॅनलने भाविनी पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला होता. जळगाव भाजपनेच गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या कन्येला दगा दिला, अशी भावना या पराभवानंतर व्यक्त झाली. गिरीश महाजन यांच्यासाठीही हा पराभव लज्जास्पद ठराविला गेला. त्यांनी प्रा. पाटील या आपल्या कार्यकर्त्याला माघार घ्यायला का सांगितले नाही, गुजरात जिंकवून देणाऱ्या प्रदेशाध्यक्षांच्या लेकीचे पॅनल कसे पडू दिले, असे सवाल उपस्थित झाले होते. गिरीश महाजन यांच्या शब्दाला जामनेर तालुक्यात काही मान आहे की नाही? की, त्यांनी शब्दच खर्ची केला नाही, प्रयत्न केले नाहीत, अशा चर्चाही रंगल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, भाविनी पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून मनोगताद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भाविनी रामचंद्र पाटील लिहितात, की मोहाडी ता. जामनेर जि. जळगाव या आमच्या गावामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून मी निवडून आले. सर्वच गावाने भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले. या संधीचा योग्य उपयोग करत, पाच वर्षांमध्ये मोहाडी गावाचा विविध अंगी विकास केला. शिक्षण, आरोग्य, पाणी, मूलभूत सुविधा, वैयक्तिक लाभाच्या योजना, व्यायाम शाळा, अभ्यासिक, सार्वजनिक स्वच्छतागृह आदी आघाड्यांवर पाच वर्षात जोरदार विकास केला. मात्र, तरीही या पंचवार्षिक निवडणुकीत आमच्या पॅनलचा पराभव झाला.

मी या मनोगतातून सर्वांना सांगू इच्छिते, की गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी कधीही माझ्या विरोधात कुठलेही कारस्थान केलेले नाही. गावाच्या विकासासाठी मी गेल्या पाच वर्षात, जेव्हा-जेव्हा त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी मला रिकाम्या हाताने कधी पाठवले नाही. गिरीश महाजन यांनी मला नेहमीच माझ्या वडिलांसारखे मार्गदर्शन केले आहे. या पंचवार्षिक निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा त्यांनी माझी आस्थेने विचारपूस केली. अगदी पॅनल पडल्यावर लागलीच त्यांचा फोन आला. त्यामुळे कुणीही माझे वडील सी.आर. पाटील व गिरीश महाजन यांच्यात, माझ्या पराभवाच्या आडून राजकीय गैरसमज करण्याचा प्रयत्न करू नये. निवडणुकीच्या पराभवामुळे बेबनाव होईल, असे वातावरण तयार करू नये. गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यात-आमच्यात आजही स्नेहाचे वातावरण आहे.
हे सुध्दा वाचा :
चित्रलेखाच्या शेवटच्या अंकातही महारावांनी संघ-भाजपला बदडून धुवून काढले!
VIDEO : गुजरातबाहेर ब्रँड मोदी फेल! एकत्र आल्यास विरोधकांना मोठी संधी
गावातीलच राजकीय सत्तेसाठी हपापलेल्या काही माणसांकडून चुकीचा प्रपोगंडा सेट केला गेला. लोकांवर दबाव आणून माझ्या विरोधात प्रचाराची मोहीम राबवली गेली. त्यामुळे गावात आमच्या पॅनलचा पराभव झाला असला तरी मी आणि माझे 2 सहकारी सदस्य म्हणून ग्रामपंचायतवर पुन्हा निवडून आलो. गावात उभे असलेले दोन्ही पॅनल भाजपाच्या विचारांनी प्रेरित होते. आज ज्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत, त्याअर्थी त्याही भाजपच्याच आहेत.
राजकारणात विजय-पराजय होतच असतात. गावातीलच काही लोकांच्या चुकीच्या प्रपोगंडामुळे आमच्या पॅनलचा पराभव झाला. यात गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांचा काहीही संबंध नाही, हेच या निमित्ताने स्पष्ट करू इच्छिते.
Bhavini Patil Facebook Post, CR Patil, Girish Mahajn, Gulabrao Patil