30 C
Mumbai
Tuesday, August 29, 2023
घरमहाराष्ट्र'या' राजकीय नेत्याने आपल्या दत्तक लेकरांविषयी व्यक्त केल्या भावना, तुमच्याही डोळ्यातून पाणी...

‘या’ राजकीय नेत्याने आपल्या दत्तक लेकरांविषयी व्यक्त केल्या भावना, तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल !

खरे तर मुलांनी आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करणे या सारखे मोठे सुख कोणत्याच पालकांना नसते. मात्र त्याहूनही काही नाती अशा पद्धतीने विनली जातात की, त्याला शब्दांच्या सीमा नसतात. मात्र मुलगी आणि बापाचे नाते तर त्याहून मेणाहूनी मऊ असते. शेतकरी संघटनेचे बुलढाण्याचे नेते रविकांत तुपकर यांची द्त्तक मुलगी वैष्णवी हिने वडिलांचे हृदय भरुन यावे असे त्यांचे स्वप्न आज पुर्ण केले आहे. वैष्णवीने महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये प्रवेश मिळविला आहे. त्याचा आनंद तुपकर यांनी व्यक्त करताना जे काही समाजमाध्यमांवर लिहीले आहे ते वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यांत पाणी आल्या शिवाय राहणार नाही.

रविकांत तुपकर यांची सोशल मीडियावरील पोस्ट जशीच्या तशी

आपले इवलेसे पंख घेऊन पाखरू जेंव्हा गगनाकडे झेपावू लागते तेंव्हा पक्ष्याला सर्वांत जास्त आनंद होतो. लवकरच त्या पाखराच्या पंखांत बळ येऊन ते क्षितीजात मुक्त विहार करू लागेल, हे स्वप्न पूर्णत्वाकडे जेंव्हा जाऊ लागते, त्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो..? 

घटना १२ वर्षापूर्वीची आहे, शेगाव-संग्रामपूर रोडवरील खिरोडा पुलावरून एक बस अचानक नदी पात्रात कोसळली. या भीषण अपघातात जवळपास१८ ते २० प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता. यात मच्छिंद्रखेड (ता.शेगाव) येथील कैलास भारंबे व त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. त्यांच्या लहानग्या मुलांच्या डोक्यावरील आईबापाचे छत्र हरपल्याने ती पोरकी झाली. मी या सर्व अपघातग्रस्त कुटुंबांना त्यावेळी सांत्वनपर भेटी दिल्या होत्या. स्वर्गवासी झालेल्या भारंबे दाम्पत्यांच्या घरी गेलो असता त्यांच्या दोन चिमुकल्या मुली आणि एक लहानसा मुलगा पाहून मला अक्षरशः रडायला आले. त्यांच्या पाठीशी कोणीही नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तेंव्हा मी व माझ्या पत्नीने या तिन्ही मुलांचे आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली. अल्प कालावधीतच आम्ही या बाळांचे लाडके मम्मी-पप्पा झालो. 

त्यातली माझी मोठी मुलगी कु.वैष्णवी हिने आज सांगलीतल्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग या सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थेत माहिती तंत्रज्ञान (आयटी) च्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला आहे. हा क्षण माझ्यासाठी बाप म्हणून व माझ्या कुटुंबासाठी अतिशय आनंदाचा आहे. अत्यंत गुणवान, कष्टाळू, व प्रगल्भ अशा माझ्या वैष्णवीने कमी वयातही नेहमीच तिच्या परिस्थितीचं, जबाबदारीचं भान राखत अभ्यास केला. कु.वैष्णवी लहान असतांना त्या काळात आम्ही बऱ्याच रहिवासी शाळांची शोधाशोध केली, पण इतक्या लहान मुलीसाठी रेसिडेंशियल स्कुल मिळत नव्हत्या, अखेर तीला मी नगरच्या पब्लिक स्कूलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. अत्यंत साधारण खेड्यातून व गरीब कुटुंबातून आलेल्या वैष्णवीने पब्लिक स्कूलमध्येही आपला ठसा उमटविला. ११ व १२ मध्ये डॉ.गजानन नारे सर, प्रा.काळपांडे सर व डॉ.गणेशजी गायकवाड यांनी चांगला सपोर्ट केला.  

इंजिनिअरिंगला चांगले कॉलेज मिळावे म्हणून वैष्णवीने एक वर्ष रिपीट केले व नामांकित कॉलेज मिळवूनच दाखविले. आज तिची बहीण श्रेया ११ वीला तर भाऊ श्रेयस १२ वीला असून ती दोघं शहरात शिक्षण घेत आहेत. मी, माझी पत्नी व आमची ही तिन्ही मुले कायम संपर्कात असतो. आम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय ते घेत नाहीत. सुट्यांमध्ये आम्ही सगळे एकत्रित येतो, आपली अभ्यासातली प्रगती ते सांगतात, ते ऐकून समाधान वाटते. त्यांना आई-वडिलांची उणीव भासणार नाही याची काळजी आम्ही घेत आलोय. जन्मदात्यांची जागा आम्ही घेऊ शकणार नाही पण निदान त्यांना त्यांच्या पायावर उभे राहून भविष्य उज्ज्वल करण्याचे बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  

हे सुद्धा वाचा 
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांची रक्षाबंधन ठरणार आगळी -वेगळी!
रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकारची महिलांसाठी भेट; गॅस सिलिंडरच्या दरात घट
रक्षाबंधन सणानिमित्त व्यापाऱ्यांकडून ‘केक’चे लाल गाजर !

माझी मोठी लेक आज इंजिनीयर बनायला निघाली आहे, माझ्याकडे या क्षणी माझ्या भावना वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. तिने लहानपणापासून खूप मेहनत केली आहे, प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे. मी तिच्यासाठी साधने उपलब्ध करून देऊ शकतो पण मेहनत तिचीच आहे. इंजीनियरिंग सुद्धा ती खूप मनापासून करेल व भविष्यात खूप मोठी होईल, याची मला खात्री आहे. 

वैष्णवी बाळा, तू खूप मोठी हो आणि भविष्यात इतरांचा आधार बन. तुझे भविष्य खूप उज्ज्वल आहे. तुझ्या या प्रवासाचा आम्हाला एक भाग बनता आले, याचा आनंद वाटतो. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. खूप खूप शुभेच्छा आणि अनंत आशीर्वाद!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी