28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या काळा राम मंदिरात संयोगीताराजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव!

नाशिकच्या काळा राम मंदिरात संयोगीताराजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव!

रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे वृत्त आहे. वेदोक्त प्रकरण हे सामाजिक उन्नयनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. राजर्षी शाहूंच्या बाजूने ते समाजपरिवर्तनाचे महत्त्वाचे कलम होते. पण रुढीप्रिय, परंपरावादी आणि जातीनिष्ठ उच्च समाजाच्या दृष्टीने त्यांच्या आजवरच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न करणारी ही घटना असल्याने ब्राह्मण समाज घटकाने त्याला प्राणपणाने विरोध केल्याचे दिसते. दरम्यान आज छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध केल्याने हा मुद्दा  पुन्हा एकदा  समोर आला आहे.

संयोगीताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पुजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.

नाशिकच्या काळा राम मंदिरात संयोगीताराजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव!

हे प्रकरण समजून घेताना आधी आपण वेदोक्ताची पार्श्वभूमी आणि राजर्षी शाहू महाराज यांचे यामागची मुख्य भूमिका समजून घेऊयात…

वेदोक्त म्हणजे काय?

वेदात सांगितल्याप्रमाणे, ब्राम्हण श्रेष्ठत्वाचा सिद्धांत समाजाच्या माथी मारण्यासाठी शेकडो वर्षांपासून धर्मशास्त्रांचे ग्रंथ, मनुस्मृती, पुराणे वगैरे निर्माण केली गेली. ब्राम्हण व्यक्ती अविद्वान असो की विद्वान असो, ते मोठे दैवत आहे, असे मनुस्मृती मध्ये सांगितले गेले.

वेदोक्ताची ठिणगी कशी पडली?

राजर्षी शाहू महाराज कार्तिक मासात नियमितपणे पहाटे असत. स्नान चालू असताना नारायण भटजी मंत्र म्हणत असे. एकेदिवशी महाराजांचे स्नेही प्रकांड पंडित राजाराम शास्त्री भागवत महाराजांसोबत होते. स्नान चालू असताना राजाराम शास्त्रींच्या लक्षात आले की, तो भटजी स्वतः स्नान न करता वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र उच्चारित होता. राजाराम शास्त्रींनी ही गोष्ट छत्रपतींच्या निदर्शनास आणून दिली आणि महाराजांनी त्या भटजीला याचा जाब विचारला. त्यावर तो भटजी म्हणाला शूद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात.एका भटजीने ‘क्षत्रिय कुलावतंस हिंदुपदपातशहा’ अशी बिरुदावली असलेल्या छत्रपतींना शूद्र म्हणून हिणवले आणि वेदोक्ताची ठिणगी पडली.

वेदोक्ताच्या प्रसंगी शाहू महाराज ऐन तारुण्यात होते. आपल्या सेवकाने आपल्याला शूद्र म्हणावे ही गोष्ट त्यांच्या खूप जिव्हारी लागली होती. हळूहळू कोल्हापुरातील मराठा लोकांत संतापाची लाट उसळू लागली. खरे तर ब्राम्हणवर्गातील पुढाऱ्यांनी या प्रकरणात थोडा सुज्ञपणा दाखवायची गरज होती मात्र ते छत्रपतींचे कुल क्षत्रिय कसे नाही हे सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागले.

मराठ्यांतील फक्त भोसलेच क्षत्रिय व बाकीचे मराठे शूद्र ही भूमिका शाहू महाराजांना सामाजिक अन्यायाची वाटली. दरम्यान शाहू महाराजांच्या दत्तक आई आनंदीबाई राणीसाहेबांचे अंत्यसंस्कार वेदोक्तरीत्या करण्यास आणि राजवाड्यातील धर्मकृत्ये वेदोक्तरीत्या करण्यास कोल्हापुरातील ब्रम्हवृंदाने नकार दिला होता. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळले. त्यात करवीर पीठाचे शंकराचार्य ब्रह्मनाळकर स्वामींनी छत्रपतींच्या क्षत्रियत्वाला आव्हान दिले आणि या प्रकरणाचा भडका उडाला. दरबारचे मुख्य पुरोहित आप्पासाहेब राजोपाध्ये यांना महाराजांनी वारंवार इशारा दिला मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

हे सुद्धा वाचा :

उदयनराजे भोसले इतके हतबल झालेले मी गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा पाहतोय : अनिल गोटे

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते : देवेंद्र फडणवीस

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!

महाराजांनी त्यांना राजसेवेसाठी दिलेले ३० हजारांचे इनाम जप्त केले. शंकराचार्यांच्या मठाचे ५० हजारांचे उत्पन्न सरकारजमा करून ब्रह्मनाळकर स्वामींना तडाखा दिला. ज्यांनी धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिला. अशा शेकडो ब्राह्मणाची अनुदाने व इनामे जप्त केली. आणि १९०२ साली कोल्हापूर संस्थानच्या प्रशासनातील ५०% जागा मागासवर्गीयांसाठी राखीव केल्या. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राम्हण वर्ग संतप्त झाला आणि ब्राह्मणी वृत्तपत्रांमधून महाराजांवर विखारी टीकेचा भडीमार सुरु झाला. या सर्व रणधुमाळीत ब्राम्हण पक्षाचे कैवारी होते भटमान्य टिळक…

हा संघर्ष जवळपास ६-७ वर्षे चालला. कोल्हापूरच्या राजोपाध्यांनी त्यांचे वत जप्त झाल्यानंतर सार्वभौम ब्रिटिश सत्तेकडे न्यायासाठी धाव घेतली. मे १९०५ मध्ये गव्हर्नर जनरलसाहेबांनी राजोपाध्यांची केस फेटाळली आणि शाहू महाराजाचा विजय झाला. महाराजांनी वतने, इनामे जप्त केली त्यामुळे ब्रह्मवृंदाच्या अर्थप्राप्तीवर परिणाम झाला. ब्रिटिशांनी केस फेटाळल्यामुळे सर्वच आशा मावळल्या आणि ब्रह्मवृंदाने महाराजांसमोर शरणागती पत्करली. ब्रह्मनाळकर स्वामींनी महाराज क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार असल्याचे कबुल करून क्षमायाचना केली. पण महाराजांचा हा विजय महाराष्ट्रातील संपूर्ण ब्राम्हणवर्गानि मान्य केला असे नाही.

अधून मधून उकळ्या फुटत राहिल्या मात्र त्यात पूर्वीसारखी हवा नव्हती. वेदोक्ताच्या मंत्रानी आपला उद्धार होणार नाही याची शाहू महाराजांना पुरेपूर जाणीव होती. पण हा वेदोक्त मंत्रांचा प्रश्न नव्हता तर तर हा सामाजिक न्यायाचा प्रश्न होता. ब्राह्मणांना वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार होता आणि त्याला शाहू महाराजांनी शह दिला होता, हे सर्व प्रकरण १८९९ ते १९०५ या कालखंडात घडले. या टप्प्यात शाहू महाराजांनी चातुर्वर्ण व्यवस्था नाकारलेली नव्हती. १९९० नंतरच्या काळात महाराजांनी वर्णश्रेष्ठत्व, जातीभेद, याविरुद्ध लढा पुकारला. अस्पृश्यता वेदोक्तातील अनुभवामुळे सर्व हिंदूना वेदोक्ताचा अधिकार देणाऱ्या आर्य समाजाकडे आणि ब्राह्मणशाहीच्या मक्तेदारीविरुद्ध लढणाऱ्या सत्यशोधक समाजाकडे शाहू महाराज आकर्षित झाले.

संदर्भ: राजर्षी शाहू महाराज जीवन व कार्य
लेखक: डॉ. जयसिंगराव पवार

Rajarshi Shahu Maharaj Book | Ramesh Patange | Cart91

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी