संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.
थोरात म्हणाले, पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती.
हे सुद्धा वाचा
वा रे गतिमान सरकार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या 5 लाखापर्यंत मदतीचा जीआर आलाच नाही!
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसीनीची भरपाई 30 दिवसात पीडितास द्यावीच लागणार अन्यथा दंड; दोन्ही सभागृहात विधेयक मंजुर
राज्यात सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार
थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले, एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडेसारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल. संभाजी भिडे याने यापूर्वी तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मोठ्या लोकांवर टीकाटिप्पणी केली आहे. वृत्त वाहिनीच्या महिला प्रतिनिधीने कुंकू, टिकली लावली नसल्याने याच भिडेने तिचा अपमान केला होता. शिवाय माझ्या आंब्याच्या झाडाचे आंबे खाल्ल्यास पुत्र प्राप्ती होईल असे अंधश्रद्धा पसरवणारे विधान केले होते. यासाठी सरकारने भिडे या व्यक्तीला नोटीस बजावली होती. पण या भिडेने नोटिस आपल्याला काही मिळाली नाही, असा कांगावा केला. त्यानंतर भिडे हा पंतप्रधान मोदी यांच्या जवळच असल्याने सरकार त्यावर कारवाई करत नाही, असे बोलले जाते.