शरद पवार यांची कोल्हापुरात आज सभा पार पडली या सभेतून पवारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. कांद्याच्या प्रश्नावरुन एकनाथ शिंदे यांनी पवारांवर निशाणा साधला होता. त्याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मोदी सरकारने शेतकऱ्यांकडे ढुंकुन ही पाहिले नाही असा घणाघात पवारांनी केला.
शरद पवार यांचे राज्यात दौरे सुरु आहेत, पक्षबांधणीबरोबरच, सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर ते जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर पवार यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीत (इंडिया) राहण्याचे स्पष्ट केले आहे, तसेच जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांच्या भूमीत जावून पवार सभा घेत आहेत. एकेकाळचे पवारांचे अत्यंत विश्वासू असणारे हसन मुश्रीफ यांनी पवारांची साथ सोडल्यानंतर आज पवारांनी कोल्हापुरात सभा घेतली. या सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करतानाच राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर सडकून टिका केली.
भारताचे चंद्रयान ३ चंद्रावर यशस्वीपणे उतरल्याच्या यशाबद्दल त्यांनी इस्त्रोचे कोतुक केले, इस्त्रोसाठी नेहरु, इंदिरा गांधी, वाजपेयी, एपीजे अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने इस्त्रो जगातील महत्त्वाची संघटना बनल्याचे सांगत दुसरीकडे आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई, बेकारीने लोक त्रासून गेले आहेत, असे देखील पवार म्हणाले.
शेतीच्या दयनीय अवस्थेबद्दल पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात १८ दिवसांमध्ये २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनात संकट असते तेव्हा शेतकरी प्राण सोडायला तयार होतो. कारण त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. कर्ज फेडायची इच्छा असून देखील ती फेडण्याची त्याची ताकद नसते, त्यामुळे शेतकरी टोकाला जातो असे पवार म्हणाले.
हे सुद्धा वाचा
धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना लावले ‘कामाला’
एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडूंसाठी माजी पंतप्रधानांच्या पत्राला केराची टोपली
कोल्हापूरला जाण्याआधी शरद पवार दुष्काळी माण-खटावमध्ये; प्रभाकर देशमुखांना बळ देणार
कांद्याच्या समस्येकडे लक्ष वेधताना पवार म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळायला हवी. कांद्याचा उत्पादन खर्च शेतकऱ्याच्या पदरात पडायला हवा. त्यासाठी निर्यात करायला हवी, मात्र कांदा देशाबाहेर निर्यात होत असताना कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर लावला आहे. त्यामुळे जगभरात भारताच्या कांद्याला दर मिळत नसल्याचे पवार म्हणाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आंदोलने करुन देखील सरकार त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
कांदा दरावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांवर टीका केली होती. त्याचा समाचार पवारांनी सभेत घेतला. ते म्हणाले, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो की, मी कृषी मंत्री असतानाच कांद्यावर निर्यात कर लावला नाही. कांद्याचे दर वाढले तेव्हा भाजपचे नेते कांद्याच्या माळा घालून आले, त्यावेळी जिरायती शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळावेत म्हणून कांद्याच्या माळा घालणाऱ्यांनी कवड्याच्या माळा घातल्या तरी कांद्याचे दर बदलणार नाहीत असे सांगितले होते, असे पवार यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांचा इतका अपमान कुणी केला नव्हता, मोदींवर प्रहार
शतकऱ्यांच्या समस्यांकडे मोदी सरकार लक्ष देत नसल्याचे सांगताना पवार यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा दाखला दिला. पवार म्हणाले, शेतकरी दिल्लीच्या सीमेवर हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे बारा महिने बसले, मात्र मोदी सरकारने त्याकडे ढुंकुन देखील पाहिले नाही, देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांचा इतका अपमान कधीच केला नव्हता असे पवार म्हणाले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल चिंता
सध्या देशात कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क सरकारने लावले आहे. त्यानंतर आता ऊस उत्पादक शेतकऱी देखील अडचणीत येतील अशी चिंता पवारांनी व्यक्त केली. पवार म्हणाले, स्प्टेंबर महिन्यानंतर सरकारकडून साखर निर्यातीवर प्रतिबंध घातली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळणार नाही, अशी भीती पवारांनी यावेळी व्यक्त केली.