30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रवारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी; उद्धव ठाकरेंची सामना अग्रलेखातून टीका

वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी; उद्धव ठाकरेंची सामना अग्रलेखातून टीका

शरद पवारांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, अशी टीका सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केली आहे.

शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येकजण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटय़ावर पडदा पडला; अशा शब्दात सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेचजण होते. पण कार्यकर्त्यांचा रेटा असा व भावना अशा तीव्र की, त्या कार्यकारिणीस पवारांचा राजीनामा नामंजूर करून ‘यापुढे तुम्ही आणि तुम्हीच’, असे पवारांना सांगावे लागले व तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला. पवार यांच्या माघारीने त्यांच्या पक्षात चैतन्य आले तसे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीसही ‘हायसं’ वाटले. पवारांना मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता हे खरे, पण या निमित्ताने आपला पक्ष नक्की कोठे आहे व आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे असं सांगत ठाकरे गटाने अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार यांनी जे राजीनामा नाटय़ केले ते ‘नौटंकी’ होते, अशी टीका भाजपने केली. भारतीय जनता पक्ष हा एक पोटदुख्या पक्ष आहे. दुसऱ्यांचे चांगले व्हावे किंवा बरे घडावे असे त्यांना कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे.  इतरांवर ‘नौटंकी’ असा आरोप करण्यापूर्वी जगातील सगळय़ात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त पावलेल्या आपल्या पंतप्रधान मोदींकडे त्यांनी आधी पाहायला हवे. देशाच्या राजकारणाची ‘नौटंकी’ करणाऱ्यांना दुसऱ्यांच्या घडामोडी नौटंकीच वाटणार, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

भाजपची पोटदुखी अशी की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली.  पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता व पवारांनी ते करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर पक्षाच्या प्रमुख पदावरून निवृत्तीची घोषणा करताच महाराष्ट्राच्या राजकारणास विजेचा झटका बसला, असा घणाघात त्यांनी सामन्याच्या अग्रलेखातून केला आहे.

हे सुद्धा वाचा : 

संजय राऊत नावाचा साप शिवसेना सोडणार; ‘या’ पक्षात करणार प्रवेश; नितेश राणेंचा मोठा दावा

राजीनाम्याचा विषय संपला, आता कामाला लागा: शरद पवार

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

Sharad Pawar, NCP, Ajit Pawar, Sharad Pawar resignation, Shiv Sena, Uddhav Thackeray, saamana, Sharad Pawar resignation Editorial of Saamana Uddhav Thackeray criticized

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी