28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रबारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती झाल्या वर्ल्डफेमस!

बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती झाल्या वर्ल्डफेमस!

कोटीच्या कोटी उड्डाणे .. बारामतीकरांच्या करामतींनी खुद्द खासदार खासदार सुप्रिया सुळेही भारावल्या; व्वा रे पठ्ठयांनो, महाराष्ट्र दंगला रे भावांनो!

बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती वर्ल्डफेमस झाल्या आहेत. (Chandal Chaukadichya Karamati) बारामतीच्या करामती महाराष्ट्राला नवीन नाहीत. बारामती आणि करामती यांचे समीकरणही तसे फारच जुने आहे. सध्याच्या बारामतीकर चांडाळ चौकडीच्या करामतींनी मात्र जगभरातला तमाम मराठी माणूस आज म्हणतोय, व्वा रे पठ्ठयांनो; महाराष्ट्र दंगला रे भावांनो!

ही करामत काही बारामतीच्या नेहमीच्या काकांची किंवा त्यांच्या पुतण्याची किंवा ताईंचीही नाही. या नव्या वर्ल्डफेमस ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ बारामतीतल्याच असल्या तरी राजकारणातील आजिबात नाहीत. या करामती आहेत कांबळेश्वर ता. बारामती येथील तरुणांच्या गावरान फिल्म प्रॉडक्शनच्या आणि त्यांच्या वेब सिरिजच्या!

बारामतीकर गावरान चांडाळ चौकडीच्या करामतींनी ‘रसिकां’च्या प्रतिसादाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. आता तर या गावाकडच्या पोरांची भलतीच हवा झाली आहे, कारण चांडाळ चौकडीच्या करामतीची दर्शकसंख्या (व्हयूज) पोहोचले आहेत तब्बल 54 कोटींवर! बारामतीच्या ताईसाहेब सुप्रिया सुळे यांनी खास ट्विट करून या चांडाळ चौकडीच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. गावरान फिल्मस् प्रॉडक्शनच्या चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीजच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जातो. निर्माता सुभाष मदने, दिग्दर्शक बाळासाहेब उर्फ ह.भ.प. भरत महाराज शिंदे आणि रामदास जगताप यांचे यांची ही वेबसिरीज जगभरातल्या मराठी जनांना आज हसवत आहे.

बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती झाल्या वर्ल्डफेमस!

खासदार सुप्रिया सुळे या ट्विटमध्ये म्हणतात, की कांबळेश्वर मधील या युवकांनी या आधीही कलापथकाच्या माध्यमातून बेटी बचाव, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, आदर्श गाव यासारख्या विविध सामाजिक विषयावर महाराष्ट्रात 5 हजार प्रयोग करत समाजप्रबोधन केले आहे. त्यामुळे या कलापथकाला माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच राज्य शासनाचेही अनेक पुरस्कार या कलापथकाला मिळाले आहेत. आधुनिक काळाबरोबर बदल घडवत या कलापथकाने 5 जानेवारी 2020 ला ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ या वेब सिरिजच्या माध्यमातून आपल्या समाजातील समस्या, अडचणी, अनिष्ट प्रथा यावर विनोदी अंगाने भाष्य करत समाज प्रबोधनावर कार्य सुरू ठेवले आहे. आपल्या मतदारसंघातील ग्रामीण कलाकारांचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.

ही सारी खरेतर गावाकडची साधीसुधी पोरं! कधीकाळी रस्त्यावर, ग्रामपंचायतींच्या पारावर, व्यसनमुक्तीचे प्रबोधन करत असायची. पारावरून सुरुवात केलेले हे प्रबोधन आज राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले. गावाकडच्या गावगुंडीच्या, पारावरच्या गप्पा याच पोरांनी बंदिस्त नाट्यगृहापर्यंत आणल्या. त्यांनी शहरात गावाला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि पाहता पाहता काही हजारांवर प्रयोग आणि महाराष्ट्रात विनोदाची दंगल उडवून दिली. हाच स्टेज शो पुढे वाढवायचा, म्हणून मग वेबसिरीज सुरू झाली. खरेतर गावाकडच्या ग्रामपंचायतीमध्ये वसुली क्लार्क म्हणून काम करणारी ही पोरं. नंतर ती ग्रामपंचायतीची सरपंच, उपसरपंच कधी झाली ते कळलेदेखील नाही. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वात लाडका शो म्हणून चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजचा बोलबाला आहे.

हे सुद्धा वाचा :

Maharashtra Politics : ‘भाजपला मुंबई ‘ठाकरे’मुक्त, तर बारामती ‘पवार’मुक्त करायची आहे’

Ajit Pawar :अजित पवारांनी सांगितल्या लहाणपणीच्या करामती, लोकांमध्ये पिकला हशा!

Rohit Pawar : रोहित पवारांकडून भाजप नेत्यांना बारामतीचं आवतणं…

अवघ्या दीड वर्षात या गावाकडच्या पोरांच्या करामतींनी 10 लाख सबस्क्रायबर आणि 20 कोटी दर्शकांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर पुढल्या अवघ्या सहा महिन्यात आता 17 लाख सबस्क्रायबर आणि 54 कोटी दर्शकांचा टप्पा या चांडाळ चौकडीच्या करामतींनी गाठला आहे. विशेषतः कोरोनाच्या अतिशय दुःखाच्या काळात अनेकांच्या घरात काही दिवस चुली पेटल्या नव्हत्या, अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते, अनेकांचा लाखोंचा खर्च झाला, अनेकांची हक्काची लाडकी माणसे जगातून गेली, त्यावेळी या चांडाळ चौकडीने लोकांना विरंगुळा दिला. दुख: विसरायला मदत केली. या अत्यंत दुःखाच्या काळात माणसे घरात कोंडलेली असताना चांडाळ चौकडीच्या करामतींनी काही काळ का होईना, लोकांना दुःख विसरायला भाग पाडले.

लोकांच्या जीवाभावाचे सोबती म्हणून या चांडाळ चौकडीच्या करामतीमधील बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, सरपंच, पाटील, गणा हे सारे लोकांच्या पसंतीस उतरले. बारामती तालुक्यातील कांबळेश्वर आणि आसपासच्या गावातील ही सर्व कलाकार मंडळी आहेत. त्यांनी अगदी सहजरित्या गावरान ढंगात, कोणताही कृत्रिम बाज ठेवता, अगदी जसे गावात घडते तसे लोकांना दाखवले. त्यामुळे जगभरच्या दर्शकांना आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी रिलेट होता आले. त्यातून या चांडाळ चौकडीने वेबविश्वातील लोकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. आज महाराष्ट्राच्या गावागावातले आबालवृद्ध, महिला-पुरुष हे हातातल्या मोबाईलवर, युट्यूब, फेसबुकवरील रामभाऊंच्या पाच एकराचा आणि बाळासाहेबांचा दारूच्या नशेत केल्या जाणाऱ्या करामतीं पाहण्यात गुंग असतात.

Chandal Chaukadichya Karamati, चांडाळ चौकडीच्या करामती, Marathi Funny Viral Videos, Baramati, बारामती; Baramatis Chandal Chaukadichya Karamati Gone World Famous Marathi Funny Viral Videos

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी