29 C
Mumbai
Friday, May 26, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रऑर्केस्ट्रा, लावण्यांच्या कार्यक्रमांना वाढती मागणी उठली तमाशाच्या मुळावर

ऑर्केस्ट्रा, लावण्यांच्या कार्यक्रमांना वाढती मागणी उठली तमाशाच्या मुळावर

 गुढीपाडव्यापासून ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांच्या हंगामाला सुरवात होत असल्यामुळे विटा (ता. खानापूर, जि. सांगली) येथील खानापूर रस्त्याला असणाऱ्या तमाशा केंद्रात पंधराहून अधिक तमाशांचे फड तमासगीरांच्या लवाजम्यासह सुवर्णनगरीत दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत लॉकडाऊन आणि आर्थिकमंदीचा मोठा फटका या तमाशा मंडळांना बसला आहे. परंतु यंदाचा तरी यात्रा-जत्रांचा हंगाम चांगला होईल, या आशेने तमासगीर होते. मात्र ऑर्केस्ट्रा आणि लावण्याच्या कार्यक्रमाना वाढत्या मागणीमुळे तमाशाकडे यात्रा कमिटयांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्रा आणि लावण्याच्या कार्यक्रमांना वाढती मागणी तमाशाच्या मूळावर उठली आहे.

महाराष्ट्रात तमाशाला फार मोठी परंपरा आहे. मनोरंजनाचे साधन म्हणून तमाशाकडे पाहिले जाते. यात्रा-जत्रा म्हटलं की हमखास तमाशा असतोच. गुढीपाडव्यापासून गावोगावच्या यात्रांना सुरवात होते. काळज, नारायणगाव पाठोपाठ विटा हे तमाशाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. विटा हे सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने गेल्या शंभरहून अधिक वर्षापासून संपूर्ण राज्यभरातील नामांकीत तमाशाचे फड गुढीपाडव्यापासून विट्यात दाखल होतात. त्याप्रमाणे यावर्षी स्वाती सोलापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ, संजय हिवरे पुरंदावडेकर, लता अकलूजकर, पुष्पाताई बराडकर, कैलास सावंत, कमल ढालेवाडीकर, पायल सावंत, वसंत वाडेकर, सोनाली गजरा वाडेकर, गणेश घोटीकर, रमेश फाळके वायफळेकर, बेबीताई हिवरे, प्यारनबाई कराडकर, दत्तोबा तिसंगीकर, हणमंत देवकाते-पाटील, सागर शिंदे, संगीता पडळकर, संजय हिवरे यांच्यासह सुमारे 18 हून अधिक तमाशाचे फड विट्यात दाखल झाले आहेत. एका तमाशाच्या फडात जवळपास 50 कलाकारांचा संच असतो. त्यामुळे येथील तमाशा केंद्रावर सुमारे एक हजार तमाशा कलावंत दाखल झाले आहेत.

तमाशा कलावंत हे आपले उद्योगधंदे पाहत यात्रा-जत्रांचे तीन महिन्याच्या कालावधीत लोककलेची जोपासना करतात. जरवर्षी गुढीपाडव्यापासून तमाशाचे ऍडव्हान्स बुकींग करण्यासाठी तमाशा केंद्रावर यात्रा कमिटीच्या सदस्यांचा राबता असतो. त्यामुळे या केंद्रावर तमाशा बुकींगच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होत असते. परंतु गेल्या दोन वर्षांत लॉकडाऊनचा आणि आर्थिक मंदीचा मोठा फटका तमाशा मंडळांना बसला होता. त्यामुळे यंदाचा तरी यात्रा-जत्रांचा हंगाम चांगला होईल, या आशेने राज्यातील विविध तमाशाचे फड “सुवर्णनगरी” विट्यात दाखल झाले आहेत. परंतु ऑर्केस्ट्रा आणि लावण्याच्या कार्यक्रमाना वाढत्या मागणीमुळे तमाशाकडे यात्रा कमिटयांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे तमासगीर सुपाऱ्याच्या प्रतिक्षेत आहेत.

आम्ही वर्षोनुवर्षे तमाशाची लोकपरंपरा जपली आहे. गेल्या दोन वर्षांत लॉकडाऊन आणि आर्थिकमंदीमुळे यात्रांचा हंगाम वाया गेला. परंतु यंदाच तरी हंगाम चांगला होईल, या आशेने विट्याच्या केंद्रावर 18 तमाशाचे फड दाखल झाले आहेत. परंतु ऑर्केस्ट्रा आणि लावण्याच्या कार्यक्रमाना वाढत्या मागणीमुळे तमाशाकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे तमाशाची परंपरा जपण्यासाठी लोकाश्रयाची गरज आहे.
– संतोष उर्फ पप्पूशेठ भिंगारदेवे (व्यवस्थापक, तमाशा कलाकेंद्र, विटा)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी