29.9 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी सेवेची 75 वर्षे; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची लाईफलाईन "लालपरी"

एसटी सेवेची 75 वर्षे; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची लाईफलाईन “लालपरी”

1 जून, 1948 रोजी पुणे-नगर मार्गावर धावली होती पहिली एसटी बस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

एसटी सेवेची 75 वर्षे पूर्ण झाली आहे. 1 जून, 1948 रोजी पुणे-नगर मार्गावर पहिली एसटी बस धावली होती. तेव्हापासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची लाईफलाईन “लालपरी” आजही त्याच दिमाखात धावत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एसटी’च्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

पाऊस असो की वारा, उन्हातही गेली 75 वर्षे एसटी महाराष्ट्राच्या गाव-खेड्यातून निरंतर धावत आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत म्हणजेच चांदा ते बांदा ‘एसटी’ने हा महाराष्ट्र कवेत घेतला आहे. ”बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या ब्रीदाला जागून, जिथे कुणी जात नाही, त्या आदिवासी पाड्यापर्यंतही एसटी पोहोचली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बस सेवेला (ST) दिलेल्या या शुभेच्छा – 

1 जून, 1948 रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने 75 वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते. आपल्या सुखकर आणि सुरक्षित प्रवासी सेवेमुळे एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली आहे. आज ग्रामीण भागापासून शहरी भागात देखील प्रवासासाठी एसटीला मोठी पसंती दिली जाते. विशेष म्हणजे आपल्या शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सूट तर 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरु केली असून या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 

आज कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यात महाराष्ट्राची एसटी सेवा विस्तारली आहे. या विस्ताराचे संपूर्ण श्रेय महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालक, तंत्रज्ञ यांचे आहे. त्यांनी आपल्या लाडक्या लालपरीला हिरकणी, शिवनेरी, शिवशाही आणि विठाई या नावांसह आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि आज स्पर्धात्मक युगात देखील ती भक्कम उभी आहे. शासनाच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही जीवनवाहिनी अविरत सुखद प्रवास देत राहील.

हे सुद्धा वाचा :

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचं जेलमध्ये उपोषण

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्हणजे युद्धात जिंकले व तहात हारले अशीच अवस्था : श्रीरंग बरगे

एसटीची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम अजूनही सुरू; अधिकृत MSRTC थांबे, ढाबे, हॉटेल्सना बंधनकारक

लोकांच्या सुख दुःखात धावून येणाऱ्या आपल्या लालपरीने स्वतःचा अमृत महोत्सव पूर्ण केल्याचा विशेष आनंद आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक तसेच प्रवासी बंधू भगिनी यांचे मनापासून अभिनंदन. या 75  वर्षांच्या प्रवासात आपला मोलाचा वाटा आहे. आपण यापुढे देखील एसटीची गती कायम ठेवून उत्तम प्रवास सेवा जनतेला देणार, हा विश्वास आहे.

 

ST 75 Years, Eknath Shinde Wishesh, Rural Maharashtra LifeLine, MSRTC, LalPari

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी