संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावापासून प्रसिद्ध झालेले रणजितसिंह देशमुख आता तालुका जिल्हा आणि आता राज्यभरात आपला नावलौकीक मिरवत आहे. आपल्या नावाला साजेसे कर्तृत्व म्हणजेच साधी राहणी व सुसंस्कृत उच्छ-विचारसरणी ते केवळ ढोल-ताशांचे डामडौलपणा नव्हे तर अभ्यासू कार्यकर्तृत्वाची ओळख हा खरा मोठेपणा. (The concept of Muktagotha is a modern revolution Ranjit Singh Deshmukh)
कुटुंबातला बाळ कितीही मोठा झाला तरी बाळच राहतो. तसेच काहीसे रणजितसिंह देशमुख यांचे झाले आहे. घरात ते दादा म्हणून दारात दादा, मग शाळेत दादा, कॉलेजात दादा आणि मित्रमंडळींमध्ये दादा. रणजीत दादा हीच त्यांची लोकप्रिय ओळख. तरीही त्यांनी कधीही दादागिरी केली नाही. अत्यंत हसतमुख, उमदे, शांत आणि निगर्वी असे हे व्यक्तिमत्व. जनसंपर्क प्रचंड तरीही मितभाषी, फक्त ध्वनिक्षेपकासमोर उभे राहिले की मग मात्र त्यांच्या आवाजाला धार चढते अगदी तलवारी सारखी.
महसूल अधिकारी हेच राज्य नागरी सेवेचे अधिकारी: उच्च न्यायालय
संगमनेरच्या पेमगिरी परिसरात ऐतिहासिक काळात जेव्हा निजामशही होती त्यावेळेसचे वतनदार असलेले हे देशमुख घराणे. कित्येक गावांची जहागिरी या कुटुंबाकडे होती.रणजीत दादांना लाभलेले एक राजबिंडे व्यक्तिमत्व हा कुटुंबाचा जनुकीय वारसा. व्यक्तिमत्त्वाप्रमाणे स्वभावही तितकाच दिलदार.
रुबाब हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक. घोड्यावर रपेट करण्याची रणजित दादांची आवड त्या वारशातूनच त्यांच्याकडे चालत आली. त्यांनी आपल्या तबेल्यात उमदे घोडे पाळले आहेत. संगमनेर अश्वप्रेमी संघटनेची स्थापना त्यांनी केली आहे. देवगडला भरणाऱ्या मोठ्या यात्रेत ते दरवर्षी अश्वस्पर्धा आयोजित करतात. पेमगिरी किल्ला ते शिवनेरी किल्ला असा ६५ किलोमीटरचा प्रवास त्यांनी आपल्या लाडक्या अश्वावरून केला आहे. अशी घोडदौड करणाऱ्या रणजित दादांच्या नेतृत्वात राजहंस दूध संघाची घोडदौड अशीच सुरू आहे.
दया पवार स्मृति पुरस्काराच्या कार्यक्रमात यंदा होणार काही नवीन, जाणून घ्या
रणात उतरून जो जेता ठरतो तो रणजित. ज्या क्षेत्रात ते उतरले त्या क्षेत्रात ते ज्येते ठरले. महाविद्यालयीन जीवनापासूनच जिंकण्याची त्यांना सवयच लागली आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेत निवडणुका या महाविद्यालयीन स्तरापासून सुरू होतात. अशा निवडणुकांमध्ये दादांना विद्यार्थ्यांनी आपले नेते बनवले. पुढे ते राजकारणात सहज प्रवेश करू शकले असते; परंतु ते उतरले समाजकारणात, सहकारात. गावातील बहुउद्देशीय सहकारी संस्थेत त्यांना लोकांनी निवडून दिले. येथूनच त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली.
भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या संगमनेर दूध उत्पादक व प्रक्रिया संघ अर्थात राजहंस दूध संघाची जोपासना बाळासाहेब थोरात यांनी केली. रणजितसिंह देशमुख २००८ साली राजहंस दूध संघाचे ते संचालक बनले.बाळासाहेब थोरातसाहेब यांनी २०१५ साली “राजहंस”च्या अध्यक्षपदाची जबाबदारी रणजितसिंह यांच्या खांद्यावर सोपवली. सहकारी दूध क्षेत्रातले आज राजहंस म्हणजे रणजितसिंह देशमुख हे समीकरण बनले आहे. रणजितसिंह “दादा” म्हणून ओळखले जातात. दादा म्हणजे कर्तृत्वाने श्रेष्ठ आपल्या कर्तृत्वाने सहकारी दूध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. नावात दादा शब्दाला त्यांनी कधी दादागिरीचा स्पर्श देखिल होऊ दिलेला नाही. सहकार क्षेत्राला त्यांनी राजकारणाचा फड कधीही मानले नाही. ते म्हणतात,”लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे हे क्षेत्र आहे. अनेक कुटुंबांना रोजी रोटी पुरवणारे क्षेत्र आहे”. घोडदौड सुरू झाली ती आजवर सुरू आहे.
राजहंस दूध संघाचे अध्यक्षपद रणजीत दादांकडे चालून आले. मग त्यांनी दूध संघाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवायला सुरुवात केली. पेढे हे दुग्धजन्य उत्पादन फार काळ टिकत नाही त्यावर योग्य नैसर्गिक प्रक्रिया करून या उत्पादनाच्या नैसर्गिक आयुष्यमानात वाढ करण्यात राजहंस दूध संघाला यश आले. राजहंस ब्रँडचा पदार्थांचे आकर्षक पॅकेजिंग आणि पणन यात सुधारणा करून त्यांचे वितरण शेजारच्या राज्यांमध्ये वाढवले.
संस्थानिक हे घोड्यावरूनच वावरत त्यामुळे त्यांचे पाय कधी जमिनीला लागत नसतात. रणजीतदादांचे पाय मात्र नेहमीच जमिनीवर असतात. तालुक्यातील तरुण सुशिक्षित तरुणांच्या समस्या त्यांनी नेमक्या हेरल्या.
ग्रामीण भागातील गरिबी हटवायची असेल तर त्यांना पारंपरिक शेती करताना पूरक उद्योग शेतीवर आधारित पूरक उद्योग द्यायला हवा हे दादांनी जाणले आणि त्यांनी दुग्ध क्षेत्राला व्यावसायिक रूप आणले. या दूध संघाद्वारे तरुणांना त्यांनी देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. शेतकरी तरुणांना स्वावलंबी बनवले, स्वाभिमानीही बनवले. राष्ट्राचे हे मनुष्यबळ सत्कारणी लावले.
वाणिज्य विषयाचे पदवीधर असणाऱ्या दादांच्या स्वभावाला व्यावसायिक आणि अभ्यासक असे दोन पैलू आहेत. दूध व्यवसाय प्रगतीपथावर असलेल्या देशांचे त्यांनी अभ्यास दौरे केले. तेथील या व्यवसायाची बारीक-सारीक माहिती घेतली. तिथल्या चांगल्या गोष्टी इथल्या संस्कृतीत रुजविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांचे मूर्त रूप म्हणजे मुक्तगोठा आणि मूरघास.
एकूणच भारतामध्ये गाईन-गुरांना गोठ्यामध्ये बांधून ठेवले जाते. माणसाप्रमाणे जनावरांना देखील शारीरिक हालचाल करणे आवश्यक असते अगदी पाळीव प्राण्यांना सुद्धा. गाईंच्या हालचाली वाढणार तर त्यांच्या दुधाची क्षमता वाढते गाई निरोगी राहतात याच तत्वाने परदेशात मुक्तगोठे निर्माण झाले आहेत. दादा सांगतात परदेशात शेतकरी हा खूप श्रीमंत असतो त्याच्या नावावर शे-दोनशे एकर शेती असते. केवळ कुंपण घालून गाईंना सांभाळले जाते तिथेच त्यांना चारा-पाणी दिले जाते. त्यांना तेथे कधीही बांधले जात नाही.
मग हा प्रयोग दादांनी संगमनेर तालुक्यात राबविण्यात सुरुवात केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. तुलनेने इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कमी आहेत तरीही ही संकल्पना आता शेतकरी राबवू लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या घरासमोरच्या अंगणात गाईंना खुंट्यांना बांधले जात होते त्या गायी आता दोन-चार गुंठ्यातल्या कुंपणात मुक्तपणे वावरत आहेत. गायींचे आरोग्य सुधारले आहे तसेच त्यांच्या दुधाची क्षमता वाढली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका तसा फारसा सुपीक नव्हता. विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणासाठी सुरू केलेले अथक प्रयत्न बाळासाहेबांनी पुढे सुरू ठेवले आणि त्यातून निळवंडे धरणाला मूर्त रूप आले. आता पूर्वीची जिरायती शेती मोठ्या प्रमाणात बागायती झाली आहे, परंतु तालुक्यातला आणि जिल्ह्यातला काही भाग आजही अवर्षणग्रस्त आहे. या भागातील शेतकऱ्यांना गाईगुरांच्या चाऱ्याची समस्या नेहमीच जाणवत असते. त्यावर तोडगा म्हणजे मुरघास.
हा मुरघास परदेशात मोठ्या प्रमाणात तयार केला जातो साठवला जातो तो साठवण्यासाठी मोठी जागा लागते. मुरघास मोठ्या मोठ्या बॅगांमध्ये भरून ठेवता येईल असे प्रयोग रणजित दादांनी केले त्याही प्रयत्नांना यश आले आणि आता गोठा तिथे मुरघासच्या बॅगा दिसू लागल्या आहेत. शेतकऱ्यांना आपल्या गाईगुरांना योग्य आहार देता येतो चाऱ्याची टंचाई जाणवत नाही.
लॉकडाऊनच्या काळात रणजितसिंह देशमुख महानंद डेरीचे अध्यक्ष होते. दूध विक्रीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या आणि मग पडून राहणाऱ्या दुधाचे काय करायचे हा यक्षप्रश्न व्यवस्थापनासमोर उभा ठाकला या प्रश्नाचे उत्तर दादांनी शोधले आणि दुधाचे भुकटी तयार करण्याचा नवा प्रकल्प त्यांनी उभारला आता राजहंस दुधाची भुकटी हे राजहंस महत्त्वाचे उत्पादन बनले असून त्याला चांगली मागणी आहे. यामुळे राजहंस संघाचे उत्पन्न देखील वाढले आहे.
राजहंस संघाने आपले व्हेटरिनरी डॉक्टर्स नियुक्त केले आहेत. ते दूध संघाच्या सदस्यांना वेळोवेळी वैद्यकीय मदत करत असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या लंपी रोगाचा प्रादुर्भाव गायींमध्ये झाला त्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्राला यश आले आहे. यात राजहंस संघाच्या डॉक्टर्सनी सर्वाधिक प्रमाणात लसीकरण केले आहे. रणजितदादा जेथे जातात तिथे यश त्यांच्यासोबत असते. त्यांच्यात असलेल्या सुसंस्कृत, सुशिक्षित आणि दूरदर्शी नेतृत्वाची ही घोडदौड अशीच पुढेही सुरू राहणार आहे हे त्यांच्या आजवरच्या जीवनाचा आलेख पाहिल्यावर सहज लक्षात येते.
-सुधीर शालीनी ब्रह्मे