28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत, उदयनराजेंचा सर्व पक्षांना इशारा

आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत, उदयनराजेंचा सर्व पक्षांना इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक व्यक्तिंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत वादग्रस्त विधाने करण्यात आली. यासगळ्याची सुरुवात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानापासून झाली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि त्यानंतर आता राज्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराजांचे नाव घेत वादग्रस्त विधान केले. त्यावरून आता छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

राज्यपालांप्रमाणे पुढे आणखी कोणी बोलेल तेव्हा खपवून घेणार का
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकिय वातावरण तापायला सुरुवात झाली. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भुमिका घ्यायला सुरुवात केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उदयनराजेंनी यापुढे राज्यपालांशिवाय त्यांच्या पेक्षा मोठ्या पदावर असणारा व्यक्ती देखील शिवरायांचा अपमान करू शकतो तेव्हा सुद्धा असेच शांत बसणार का असा सवाल नाव न घेता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेण्याचे पाप कुणाचे, आता होणार ‘न्याय’

हार्दिक पंड्याचा जलवा, पण शिखर धवन मात्र कमनशिबी

‘अनिल परब यांनी साई रिसॉर्टप्रकरणी 5 कोटींचा दंड भरला नाही’

प्रत्येक पक्षानं यावर आपली भुमिका स्पष्ट करावी
सोबतंच या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना उदयनराजे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची आपली भुमिका स्पष्ट करावी असे संकेत दिले आहेत. शिवाय प्रत्येक पक्षाच्या उभारणीच्या गाभ्यामध्ये शिवरायांच्या विचारांचा समावेश असायला हवा त्यानंतर प्रत्येकाने आपल्या भुमिकेतील वेगळेपण जपावे यापुढे कोणत्याही व्यक्तीने शिवरायांचा अपमान केल्या तो सहन केला जाणार नाही, आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत वेळ आल्यावर जशास तसे चोख प्रत्युत्तर देऊ अशा शब्दांत उदयनराजेंनी प्रत्येक पक्षाला इशारा दिला आहे.

दरम्यान, प्रतापगडावर शिवप्रतापदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितीत लावली होती. त्या कार्यक्रमाला उदयनराजे गैरहजर राहिले होते. या कार्यक्रमात न जाण्याचे कारण विचारले असता महाराजांच्या नावावर केवळ राजकारण करून चालणार नाही, फक्त ठराविक दिवशीच शिवरायांची आठवण काढण्याची गरज नाही असं मला वाटतं असे उत्तर देत उदयनराजेंनी आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपल्याला कोणीही फोन अथवा निमंत्रण दिलं नसल्याचंही उदयनराजेंनी स्पष्ट केले. त्यामुळे आता शिवरायांच्या नावाने सुरू झालेले राजकारण आगामी काळात तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी