भारतीय रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat train) प्रवाशांनी जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. लांबचा प्रवास कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी वंदे भारत ट्रेनला प्राधान्य दिले जात आहे. अशातच पुणे- नाशिकच्या (Pune-Nashik) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच या मार्गावर वंदे भारत ट्रेन (Vande Bharat train) सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासन याबाबत आढावा घेत असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर वेगाने विकसित होत आहे. तर नाशिक हे धार्मिक आणि ऐतिहासिक शहर आहे.(Vande Bharat train to run on Pune-Nashik route soon)
महाराष्ट्रासाठी दोन्ही शहरे महत्त्वाची आहेत. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून राज्यातील कान्याकोपऱ्यातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे पुणे आणि नाशिक या शहरादरम्यान देखील आता वंदे भारत ट्रेन (Vande Bharat train) सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. ही दोन्ही महत्त्वाचे शहरं रेल्वे मार्गाने जोडली गेल्यास नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
पुणे-नाशिकदरम्यान धावणार 24 वंदे भारत ट्रेन
पुणे ते नाशिक हे अंतर 235 किलोमीटर आहे. सेमी हाय स्पीड डबल लाईन कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात काही दिवसांपूर्वी नासिक रोड स्टेशनवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रस्तावित मार्गावर दोन्ही बाजूंनी एकूण 24 वंदे भारत ट्रेन धावतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतकंच नाही तर भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे आणि मुंबईतील मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे यांच्याच या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. याशिवाय रोलिंग स्टॉकची देखभाल व नाशिकमधील मेगा कोचिंग टर्मिनलची संकल्पना आराखड्यांवर देखील या बैठकीमध्ये सूचना व प्रस्तावांना मंजुरीवर भर देण्यात आला. त्यामुळे भविष्यात पुणे-नाशिकचा प्रवास कमी वेळेत आणि आरामदायी होणार आहे.
ताशी 200 किमी वेगाने धावतील ट्रेन, एक्स्प्रेस..
पुणे-नाशिक या महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये सुरुवातीला 24 वंदे भारत ट्रेन (Vande Bharat train) आणि दोन इंटरसिटी गाड्या धावतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ट्रेन आणि एक्स्प्रेस ताशी 200 किलोमीटर वेगाने धावणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी 16039 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे व नाशिक या दोन शहरांचा विकास आणि परिसरातील गावांच्या विकासाला चालणा मिळणार आहे.
सध्या कुठे-कुठे सुरू आहे वंदे भारत ट्रेन?
महाराष्ट्रा च्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या मुंबई ते सोलापूर, मुंबई ते जालना, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आदी शहरांच्या दरम्यान वंदे भारत ट्रेन (Vande Bharat train) सुरू आहे. या ट्रेनला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशातच मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होईल, अशी घोषिणा करण्यात आली होती.