28 C
Mumbai
Tuesday, September 26, 2023
घरमहाराष्ट्रफडणवीस आता संभाजी भिडेला फाशी देणार का?, भिडेविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश

फडणवीस आता संभाजी भिडेला फाशी देणार का?, भिडेविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश

राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आल्यावर संघाच्या तालमीत वाढलेल्या सांगलीच्या संभाजी भिडे यांचे बेताल वक्तव्य वाढतच चालली आहेत. कायम वादाला तोंड फोडणारे विधान करून हे भिडे प्रसिद्धीझोत आपल्याकडे वळवत असतात. अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार होते’ असे विधान केले. त्यामुळे राज्यसह देशातील कॉंग्रेस कार्यकर्ते चिडले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा संभाजी भिडे यांनी अवमान केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने राज्यभर तीव्र आंदोलन केले. ठिकठिकाणी संभाजी भिडे यांचा पुतळा जाळून व प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींच्या फक्त मुसक्या आवळून चालणार नाही तर अशांना फाशी लावली पाहिजे असे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेला फाशी देणार का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतो, पण भाजपा सरकार त्याविरोधात कारवाई करत नाही. भाजपाला संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींच्या फक्त मुसक्या आवळून चालणार नाही तर अशांना फाशी लावली पाहिजे असे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेला फाशी देणार का? हा सवाल आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातही संभाजी भिडेचा हात होता पण अजून तो मोकाटच आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार संभाजी भिडेवर एवढे मेहबानी कशासाठी दाखवत आहे ? संभाजी भिडे, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध सर्वांना माहित आहेत, भारतीय जनता पक्षाने भिडे संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. मुजोर संभाजी भिडेला अटक करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने अधिवेशनात लावून धरली आहे. राज्य सरकारने भिडेला अटक करुन कडक शिक्षा ठोठावण्याची काँग्रेस प्रतिक्षा करत आहे. अधिवेशनाला चार दिवसांची सुट्टी आहे पण कारवाई झाली नाहीतर सुट्टीनंतर अधिवेशनात काँग्रेस पक्ष संभाजी भिडे प्रश्नी सरकारला धारेवर धरेल. जोपर्यंत संभाजी भिडेला अटक करुन कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.

हे सुद्धा वाचा
केसरकर शिक्षणमंत्री असून किती अशिक्षित आहात; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
३३ कोटी वृक्ष लागवड; जयंत पाटलांच्या निशाण्यावर वनमंत्री मुनगंटीवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा संभाजी भिडेने अवमान केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने राज्यभर तीव्र आंदोलन केले. ठिकठिकाणी संभाजी भिडेचा पुतळा जाळून व प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अमरावतीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. धुळ्यात प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे, सातारा, शिंदेवाही, बुलढाणा, यवतमाळ, मोताळा, जळगाव जामोदसह राज्यभर आंदोलन करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी