30 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमंत्रालयMantralaya: मुख्यमंत्र्यांकडे फायलींचा ढीग साचला, म्हणून त्यांनी...

Mantralaya: मुख्यमंत्र्यांकडे फायलींचा ढीग साचला, म्हणून त्यांनी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदग्रहण करून एक महिना उलटला, तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्तार करण्यास फुरसत नाही. अशातच एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देऊन टाकले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या उदार भूमिकेमागील सत्य ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी समोर आणले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात फायलींचा ढीग साचला असे म्हणून सचिवांना मंत्र्यांचे अधिकार दिल्याची शक्यता देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली आहे. रविकिरण देशमुख यांनी ट्विट करून आपले मत सोशल मिडीयावर व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रविकिरण देशमुख हे त्यांचे माध्यम सल्लागार होते. देशमुख यांना त्यावेळी सचिव दर्जाचे अधिकार देण्यात आले होते.

रविकिरण देशमुख यांचे मंत्रालयातील धागेदोरे व अनुभव लक्षात घेता राज्यातील नव्या सरकारच्या कारभारावर त्यांनी ट्विटद्वारे मांडलेली शक्यता अनेकार्थी महत्वाची मानली जात आहे. ट्वीटमध्ये रविकिरण देशमुख लिहितात, मुख्यमंत्री कार्यालयात फायलींचा ढीग साचत आहे हे पाहून हे आदेश काढण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी मुख्यसचिव यांना दिल्याचे दिसते. सचिव धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांनाही वेळोवेळी राजकीय नेतृत्वाला विचारूनच सुनावणी, विनंतीअर्ज, पुनर्विलोकनअर्ज यावर निर्णय द्यावा लागेल, असे म्हणून त्यांनी सदर पत्राची प्रत सुद्धा पोस्टमध्ये जोडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना रविकिरण देशमुख यांनी लय भारीला सांगितले, राज्यात अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, मंत्रिमंडळच अस्तित्वात नसल्यामुळे संपुर्ण कारभार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पाहावा लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असले तरीही ते सांविधानिक पद नसल्याने त्यांची केवळ मंत्री म्हणून गणना होते, म्हणून मंत्रिमंडळाच्या बाबतीत ते कोणतेच अधिकृत निर्णय घेऊ शकत नाहीत.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कामाचा धडाका, एकही फाईल प्रलंबित नाही

Eknath Shinde : मंत्रीमंडळाच्या विस्ताराबद्दल एकनाथ शिंदे यांचे पहिल्यांदाच मोठे विधान

Bhandara Rape Case : एकनाथ शिंदेंनी पोलिसांना दुबळे केले, अन् महिलेवर झाला अघोरी बलात्कार

देशमुख पुढे म्हणाले, मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्यामुळे सगळ्याच खात्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांना सांभाळावा लागत आहे. दरवेळी वेगवेगळ्या खात्यामधून साधारण 10 ते 15 फाईल्स किंवा त्याही पेक्षा जास्त फाईल्स येत असतात, दरम्यान संबंधीत खात्याला मंत्रीच नसल्याने सगळ्या फाईल्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पाहाव्या लागत आहेत. प्रत्येक फाईल्सचे महत्त्व वेगळे असले तरीही त्यामध्ये सुद्धा कोणाला प्राधान्य द्यायचे हे सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनाच ठरवावे लागत आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची सरकार म्हणून खूप जबाबदारी वाढली आहे, शिवाय दररोज वेगवेगळ्या फाईल्सचा ढीग सुद्धा वाढू लागला आहे, त्यामुळे यातून मधला मार्ग काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कोणताच विषय प्रलंबित राहू नये यासाठी मुख्यसचिव यांना सूचना करत त्या त्या खात्याचे काम संबंधित सचिवांना सोपवण्यास सांगितले आहे.

दरम्यान, नवे सरकार येऊन महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला तरीही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही याचा फटका सामान्यांप्रमाणे आता प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा बसत आहे, त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत संबंधित खाते सांभाळण्याच्या सूचना काढण्याचे आदेशच मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यसचिवांना दिले आहेत. त्यामुळे सदर आदेश मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंतच लागू राहतील असे सुद्धा यामध्ये सांगण्यात आले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!