मुख्यमंत्री एकनाथ शिेदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के होणार आहे. या निर्णयाचा फायदा एसटी महामंडळातील 90 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. पण महागाई भत्ता अवघा चार टक्के वाढवल्याने मुख्यमंत्री समाज माध्यमात ट्रोल झाले आहेत.
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 203 टक्क्यांवरून वाढवून 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून वाढवून ३८ टक्के करण्यास आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी – कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. pic.twitter.com/fsRx40JU0S
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 8, 2023
एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनावर कार्यवाही होत नसल्याने एसटी कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयात धूळ खात पडली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला होता.
शासनाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता दिला आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनासुद्धा मिळायला हवा होता, पण तो अद्याप मिळालेला नाही. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळत असून त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता मिळायला हवा होता. पण एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप 34 टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत असल्याचेही कर्मचारी संघटनांनी म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्के वाढवला आहे. त्यामुळे एस टी कर्मचारी वर्गात कही खुशी कही गम असे वातावरण आहे.
हे सुद्धा वाचा
शाहरुखच्या ‘जवान’नं ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडला!
राजकारणात अस्पृश्यता पाळली जाते – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही काँग्रेसवर हल्ला
बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात
असे असताना या निर्णयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र समाज माध्यमात चांगलेच ट्रोल झाले आहेत. ‘साहेब द्यायचे तर सातवा वेतन आयोग द्या, एसटी कर्मचारी तुमच्याकडे आस लावून बसला आहे.’ असे एका ट्रोलरने म्हटले आहे. दुसऱ्याने, ‘मुख्यमंत्री साहेब. ऑगस्ट महिन्याचा पगार अजून मिळाला नाही एसटी कामगारांना’ ही बाब निदर्शनास आणली आहे. तर एका ट्रोलरने ‘साहेब धन्यवाद. कृपया 42% ही लवकरात लवकर करावा कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 42% आहे.’ असे ट्रोल केले आहे.