30 C
Mumbai
Tuesday, August 29, 2023
घरमंत्रालयमंत्रालयाच्या इमारतीवरुन उड्या मारुन धरणग्रस्तांचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयाच्या इमारतीवरुन उड्या मारुन धरणग्रस्तांचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयाच्या इमारतीवरुन उड्या मारुन वर्धा जिल्ह्यातील धरणग्रस्तांनी आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही धरणग्रस्त शेतकरी मंत्रालयात त्यांच्या समस्या घेऊन आले होते. मात्र अधिकारी, मंत्र्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या इमारतीवरुन उड्या मारल्या. मात्र संरक्षणासाठी बांधलेल्या जाळीमुळे जीवितहाणी झाली नाही.

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी आज विविध मागण्यांसाठी मंत्रालयात आंदोलन केले. धरणग्रस्तांना सरकारी नोकरी आणि मोबदला देऊ असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र गेल्या 45 वर्षांमध्ये कोणत्याच सरकारने हे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप आंदोलक धरणग्रस्तांनी केला. धरणग्रस्तांची दखल सरकार घेत नसल्याने आज आंदोलकांनी मंत्रालयाच्या इमारतीवरुन सुरक्षा जाळ्यांवर उड्या घेतल्या. यावेळी जवळपास ३० आंदोलनकर्ते्यांनी जाळ्यांवर उड्या घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे धरणग्रस्त गेल्या १०५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मोर्शी येथील तहसील कार्यालयासमोर त्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र सरकार त्याकडे ढुंकून पहायला तयार नसल्याने अखेर आंदोलनकर्त्यांनी आज टोकाचे पाऊल उचलत मंत्र्यालयाच्या इमारतीवरुन सुरक्षा जाळीवर उड्या घेत जीव धोक्यात घातला.

मागील काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. तसेच काही जणांनी मंत्रालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मंत्रालयात जाळ्या बसविल्या आहे. आज याच जाळ्यांवर उड्या घेत धरणग्रस्तांनी जीव धोक्यात घालून आंदोलन केले.

हे सुद्धा वाचा 
 जयंत पाटील यांनी सरकारची केली कानउघाडणी!
आशिया चषक २०२३: राहूल द्रविडने फोडली मोठी बातमी!
छगन भुजबळ हे तेलगी घोटाळ्यात तुरूंगात जाणार होते, पण शरद पवार यांनी वाचविले !  

गेली अनेक वर्षे अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे एकाच वेळी उघडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. धरणालगच्या सिंभोरा, भांबोरा, येवती या गावातील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली येऊन शेतीचे मोठे नुकसान होत आहे. मागील १५ वर्षे शेतकऱ्याचा याविरोधात संघर्ष सुरु आहे, मात्र तो प्रश्न देखील अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यामुळे अखेर आम्हाला न्याय द्या म्हणत शेतकऱ्यांनी आज मंत्रालयात सुरक्षा जाळीवर उड्यामारुन आंदोलन केले. यावेळी मंत्र्यांच्या दालनात उपस्थित असलेल्या मंत्र्यांची देखील तारांबळ उडाली. मंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थीचा प्रयत्न केला. सुरक्षाकर्मींनी जाळ्यांवर जात आंदोलनकर्त्यांना जाळीवरुन खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी