शिंदे सरकारच्या राज्यात दिल्लीकडून महाराष्ट्राचा अवमान आणि अवहेलना सुरूच आहे. (Marathi Humiliated By Delhi) पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना दिल्लीचा धत्तुरा दाखविला गेला आहे. विधानसभेतील एकनाथ शिंदे यांच्या “मन की बात”ला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लाथाडले आहे. दिल्ली दरबारात बाहुले झालेल्या मुख्यमंत्र्यांना वारंवार भाजपचे केंद्रीय नेतृत्व फाट्यावर मारत आहे. मात्र, त्यामुळे राजधानी मुंबईत महाराष्ट्राची दुर्दशा होत आहे.
यावेळी महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून दिल्लीने मुंबई आकाशवाणीचा मराठी प्रादेशिक वृत्तविभाग शेवटी रातोरात हलवलाच आहे. आता मराठीला अडगळीतील साडेचारव्या मजल्यावर टाकले गेले आहे. जणू पोटमाळा असलेल्या या अर्ध्या मजल्यावर जायला-यायला लिफ्ट नाही. पूर्वीपेक्षा निम्म्या जागेत आता कसेबसे कर्मचारी कोंबले आहेत. प्रभारी प्रादेशिक वृत्त अधिकारी असलेल्या सहसंचालक सरस्वती कुवळेकर यांना तळमजल्यावर फेकण्यात आले आहे. प्रादेशिक मराठी विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील समन्वय-सुसंवादच दिल्लीने गोठविला आहे. अनुराग ठाकूर यांच्या योजनेनुसार, मुंबई आकाशवाणीचा पूर्वीचा प्रशस्त मराठी प्रादेशिक वृत्ताविभाग रातोरात रिकामा करून घेण्यात आल्याचा कर्मचारीवर्गाचा आरोप आहे. दोन महिन्यांपूर्वीच ठाकूर यांनी मुंबई आकाशवाणीत पाहणी करून मराठीचा पाचवा मजला पूर्णतः खाली करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती सूत्रांनी “लय भारी”ला दिली.
आकाशवाणीच्या पाचव्या मजल्यावर गुपचूप पाडकाम सुरू असल्याचे सचित्र वृत्त सर्वप्रथम प्रकाशित करून “लय भारी”नेच दिल्लीच्या हालचालींचे बिग फोडले होते. त्यावेळी मराठी प्रादेशिक वृत्त विभागाच्या पाचव्या मजल्यावरील सर्व केबिन्सचे पाडकाम केले जात होते. “लय भारी”च्या वृत्ताच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून हा प्रश्न मांडला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आकाशवाणीचा मराठी प्रादेशिक वृत्तविभाग आजिबात हलवू देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. भुजबळ यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचेही शिंदे यांनी म्हटले होते. “मुंबईत मायमराठी पोरकी होऊ देणार नाही, मराठीवर अन्याय होऊ देणार नाही, दिल्लीकडून मराठीची गळचेपी सहन करणार नाही,” अशा थाटात, आवेशात मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ सभागृहात “मन की बात” केली. मात्र, अखेर दिल्लीने राजधानी मुंबईत मराठीचा गळा घोटलाच. शिंदे सरकारच्या राज्यात, दिल्लीने मराठी बातम्यांच्या 30 वर्षांच्या वैभवशाली परंपरेला अडगळीत फेकून दिले आहे. आज मराठी दीनवाणी, केविलवाणी अन् असहाय्य झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः केंद्र सरकारच्या आकाशवाणी या अधिकृत रेडिओ दृक माध्यमातून ‘मन की बात’द्वारे देशभरातील जनतेशी संवाद साधत असतात; पण त्याच आकाशवाणीच्या मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा म्हणजे मराठीचा आवाज मात्र पद्धतशीरपणे दाबला जात आहे. मुंबईत एकीकडे मराठी विश्व संमेलन भरविले जात असताना मराठी आकाशवाणीचा “गेम” केला जात आहे. शिंदेसेनेसह, मराठीचा कैवार घेतलेली इंजिन सेना, अहोरात्र मराठीचा गजर करणारी शिवसेना आणि दिल्लीच्या तालावर नाचणारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र व मुंबई भाजपा या सर्वच राजकीय पक्षांचे राजधानीतील मराठीच्या उपेक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात डबल इंजिन देणाऱ्या भाजपा सरकारला महाराष्ट्रात मराठीचे इंजिन जणू नकोस झालेले दिसतेय. त्यामुळेच महाराष्ट्राची राजधानी असलेली आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आकाशवाणीचा मराठी प्रादेशिक वृत्त विभाग आज निर्वासित झाला आहे.
हे सुध्दा वाचा :
लय भारीने सर्वप्रथम मांडलेले आकाशवाणी स्थलांतर, वसुलीभाई सत्तारभाईचे प्रश्न अधिवेशनात गाजले
शिंदे सरकार झोपेत; मुंबई आकाशवाणीच्या मराठी प्रादेशिक वृत्तविभागावर पडतोय दिल्लीचा हातोडा!
मराठी वृत्तविभागाच्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब हटवण्याचे आदेश परवा दिले गेले. काल, शुक्रवारी त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही केली गेली. दुपारी दीडचे राष्ट्रीय बातमीपत्र आटोपताच दिल्लीचा हातोडा घेऊन आलेल्या माणसांनी पाचव्या मजल्यावरील आकाशवाणी मुंबई मराठी वृत्तविभागाचे उरलेसुरले सामानही बाहेर करून फेकले. दुपारी तीनचे प्रादेशिक मराठी बातमीपत्र तरी पूर्ण होऊ द्या, अशी विनंती मराठी वृत्त कर्मचाऱ्यांनी केली. मात्र, अनुराग ठाकूर यांचा थेट निरोप असल्याचे सांगून तडकाफडकी मराठी कर्मचाऱ्यांना पाचव्या मजल्यावरून हाकलून देण्यात आले. या दडपशाहीच्या निषेधार्थ, दुपारी तीन नंतर मराठी कर्मचाऱ्यांनी स्टुडिओच्या लाॅबीतच ठिय्या आंदोलन केले. एफएम स्टुडिओची रिकामी असलेली जागा मिळावी, अशी विनंती मराठी कर्मचाऱ्यांनी केली. दिल्लीच्या अतिरिक्त महासंचालक (वृत्त) यांनी अलीकडेच मुंबईभेटीत तसे आश्वासनही दिले होते. त्यावर कुणीही प्रतिसाद दिला नाही. मुंबई आकाशवाणीच्या अतिरिक्त महासंचालकांशी मराठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन बोलणी केली; पण तीही व्यर्थ ठरली. “वरून अनुराग ठाकूर यांचे आदेश आहेत,” असेच तुणतुणे अधिकाऱ्यांनी वाजविले.
आकाशवाणी मुंबईचा मराठी वृत्तविभाग पोरका झाला!
काल रात्रीपर्यंत पाचवा मजला संपूर्ण रिकामा करून घेत आकाशवाणी मुंबईचा मराठी वृत्तविभाग आता साडेचौथ्या मजल्यावरील अडगळीच्या जागी फेकण्यात आला आहे. या नव्या अर्ध्या मजल्यावर लिफ्टने जायची सोय नाही. अतिशय विचित्र ठिकाणी, खूपच कमी जागेत मराठी वृत्तविभाग हलवण्यात आला आहे. चित्र-विचित्र आकाराच्या खोलीत माणसे आणि सामान अक्षरश: कोबले गेले आहे. पूर्वीच्या पाचव्या मजल्यावरील कर्मचारी वर्गाच्या सर्व केबिन आता पाडल्या गेल्या आहेत. वृत्त विभागाच्या सह संचालक सरस्वती कुवळेकर यांची केबिन तळमजल्यावर हलवण्यात आली आहे. तळमजला आणि सध्याचा वृत्तविभाग यातले नवे अंतर आता साडेचार मजल्याचे झाले आहे. सरकारी जागांवर खाजगी विकासकांचा डोळा असतो; पण इथे सरकारच मंत्रालयाजवळील मोक्याची अन् आपली महत्त्वाची जागा काही मर्जीतील उद्योजकांना भाड्याने द्यायला निघाली आहे, असे आरोप होत आहेत. 2017 मधे याच वृत्तविभागात हंगामी वृत्तनिवेदक-भाषांतरकारांनी मोठा संप केला होता. तेव्हापासूनच आकाशवाणी मुंबईत मराठीचा गळा आवळण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. केंद्र सरकारच्या मर्जीतील, नुकत्याच माध्यम क्षेत्रात शिरलेल्या, एका खासगी समूहाला मंत्रालयाजवळ जागा हवी आहे; त्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे आम्हाला न कळण्याइतपत आम्ही “अडाणी” आहोत का, असा संतप्त सवाल मराठी कर्मचाऱ्यांनी केला आहे.