अनेक मंत्री राजे – महाराजांच्या थाटात वावरतात. अशा मंत्र्यांच्या दालनात व बंगल्यावर सामान्य लोकांना प्रवेश सुद्धा दिला जात नाही. मग मंत्र्याची भेट सुद्धा घेणे महाकठीण असते. ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन हे मात्र अपवाद आहेत. त्यांच्या बंगल्यावर सामान्य लोकांना मुक्त प्रवेश दिला जातो. एवढेच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीला तिथे पोटभर जेवण दिले जाते. (Girish Mahajan Provide food to common man) त्यामुळे काम होवू अथवा न होवू पोटभर जेवलेली व्यक्ती महाजन यांच्याबद्दल चार शब्द चांगलेच बोलून जाते.
महाजन यांच्या मलबार हिल येथील सेवासदन या बंगल्यावर दुपारच्या वेळी तिथे गेल्यानंतर एका खोलीत जेवणाच्या पंक्ती उठताना दिसतील. स्वयंपाकी व वाढपी यांची तर सतत लगबग दिसत असते. चपाती, कालवण, सुकी भाजी, वरण, भात, पापड व लोणचे इतके पदार्थ लोकांना खायला घातले जातात.
विशेष म्हणजे, सामान्य लोकांच्या आरोग्याला हितकारक ठरेल असेच पौष्टीक जेवण या ठिकाणी दिले जाते. भुकेलेल्या अनेकजणांच्या पोटाला यामुळे आधार मिळतो. आजूबाजूला अनेक मंत्र्यांचे बंगले आहेत. त्या मंत्र्यांना भेटायला आलेले अनेकजण भूक लागल्यानंतर मात्र गिरीष महाजन यांच्या बंगल्यावर येतात. गिरीषभाऊंच्या बंगल्यावर कोणताही भेदाभेद न करता प्रत्येकाला जेवण दिले जाते.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर सुद्धा अशाच पद्धतीने सामान्य लोकांना जेऊ घातले जाते. मंत्रालयाच्या समोरच तानाजी सावंत यांचा बंगला आहे. या बंगल्यावर केव्हाही गेले तरी जेवायला निश्चितपणे मिळतेच.
गिरीष महाजन यांच्या सवयी!
मंत्री गिरीश महाजन यांना अशा काही सवयी आहेत, की त्या अनेकांना माहीत नाहीत. या सवयींबद्दल ऐकून कुणालाही त्यांचे अनुकरण करावेसे वाटेल. जेवण, आरोग्य, सामाजिक उत्तरदायित्व यांविषयी गिरीश महाजन यांनी स्वतःचे काही मापदंड तयार केले आहेत. हे मापदंड ते स्वतः कटाक्षाने पाळतात.
गिरीश महाजन यांचा सर्वात चांगला व महत्वाचा गुण म्हणजे, त्यांना कोणतेही व्यसन नाही. महत्वाच्या बैठका व उंची लोकांसोबत सतत करावी लागणारी ऊठबस यांमुळे दारू, सिगारेट, गुटखा अशी व्यसने म्हणजे मोठ्या लोकांसाठी किरकोळ बाबी असतात. परंतु महाजन यांनी स्वतःला अशा व्यसनांपासून चार हात दूर ठेवले आहे.
गिरीश महाजन आपल्या आहाराविषयी सुद्धा दक्ष असतात. आरोग्यासाठी अपायकारक असलेले चमचमीत खाद्य सवयींना त्यांनी दूर ठेवले आहे. ते गोड पदार्थ खात नाहीत. चहासुद्धा पीत नाहीत. तळलेले – तेलकट पदार्थ खात नाहीत. ग्रीन सलाड, उखडलेली मटकी – मुग ते खातात. पालेभाज्या, डाळींचा वापर जेवणात जास्त करतात.
कितीही व्यस्त असले तरी ते व्यायाम टाळत नाहीत. त्यांनी घरीच व्यायामशाळा बनविलेली आहे. त्यांच्या सेवासदन या सरकारी निवासस्थानी सुद्धा त्यांनी एक छोटेखानी जीम उभी केली आहे. तिथे ते व्यायाम करतात.
राजकारणात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला इच्छा असो अथवा नसो पण सामाजिक बांधिलकी जपावीच लागते. बऱ्याच नेत्यांमधील सामाजिक बांधिलकीचा नाटकीपणा लोकांच्याही लक्षात येत असतो. परंतु गिरीश महाजनांची काही सामाजिक कामे अशी आहेत की कोणालाही हेवा वाटेल. त्यांनी जवळपास ४० ते ५० अनाथ मुलांना दत्तक घेतलेले आहे. त्यांचा शैक्षणिक व दैनंदिन खर्च महाजन स्वतः पेलतात. त्यांचे हे कार्य फार कुणाला ठाऊक नाही.

संकटकाळात असलेल्या लोकांच्या मदतीला ते हिरिरिने धावून जातात. लोकांच्या वैद्यकीय मदतीसाठी त्यांनी स्वतःची अशी यंत्रणा तयार केली आहे. त्यांच्याकडे दोन वेळा वैद्यकीय शिक्षण खाते होते. पण या खात्याचे मंत्रीपद असो किंवा नसो ते आरोग्य सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असतात. विवाहसारख्या कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावतात. विवाहाच्या हंगामात ते एकाच दिवसात अगदी ४० ते ५० विवाह सोहळ्यांना हमखास हजेरी लावतात. ते सतत हसतमुख असतात. कामाचा निपटारा वेगाने करतात. लोकांच्या कामांविषयी ते सकारात्मक असतात.
हे सुद्धा वाचा
पंकजा मुंडे यांना आता शरद पवारांचा आधार!
मंत्री गिरीश महाजन यांना आहेत ‘या’ सवयी, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !
रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा योग, काही पणवती तर लागणार नाही ना?
त्यांच्या बंगल्यावर सामान्य लोकांना मुक्त प्रवेश असतो. गावच्या कानाकोपऱ्यातून थकूनभागून आलेल्या सामान्य व्यक्तीला बंगल्यावरील हॉलमध्ये बसायला जागा मिळते. चहा व पाणी आवर्जून दिले जाते. बऱ्याचदा नाश्तासुद्धा दिला जातो. अनेक मंत्री असे आहेत की, त्यांच्या बंगल्यावर प्रवेशद्वारातून आत प्रवेश दिला जात नाही. अशा परिस्थितीत गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी सामान्य लोकांना मिळणारी वागणूक नाडलेल्या लोकांना थोडीतरी दिलासा देणारी ठरते.
Girish Mahajan, Sevasadan, BJP