29 C
Mumbai
Saturday, September 2, 2023
घरमंत्रालयअबब! पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी केली ४७ कोटीची बोगस कामे; शिवसेना नगरसेवकाचा गंभीर आरोप!

अबब! पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी केली ४७ कोटीची बोगस कामे; शिवसेना नगरसेवकाचा गंभीर आरोप!

सार्वजनिक बांधकाम खात्यातील (PWD) अधिकारी व कंत्राटदार मिळून एकत्रितपणे बोगस कामे करतात. कागदावर काम केल्याचे दाखवतात. त्या कामावर बराच मोठा निधी खर्च झाल्याची बिले तयार करतात. अंदाजपत्रकापासून ते एमबी पुस्तिकेपर्यंत सगळी कामे फक्त कागदावरच असतात. प्रत्यक्षात मात्र ते काम झालेलेच नसते. काम दाखवून सरकारचा पैसा हडपला जातो. हा पैसा कंत्राटदार व अधिकारी दोघेजण मिळून खिशात घालतात. पीडब्ल्यूडीमध्ये हा प्रकार सर्रासपणे चालत असतो. पण ‘लय भारी’च्या हातात पुराव्यासह धक्कादायक कागदपत्रे आली आहेत. या कागदपत्रांनुसार तब्बल ४७ कोटी रुपयांची बोगस कामे केली असल्याचे समोर आले आहे. ही बोगस कामे वरळी या ठिकाणी झाली आहेत. स्थानिक नगरसेवक ॲड. संतोष खरात यांनी हा घोटाळा चव्हाट्यावर आणला आहे.

‘मी गेल्या पाच वर्षांपासून वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतो. या मतदारसंघात बीडीडीसारख्या जुन्या चाळी आहेत. वर्षानुवर्षे या चाळींची दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना विविध समस्या सहन कराव्या लागतात. सरकारी यंत्रणा ही कामे का करीत नाही यासाठी मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा केला. त्यातून मला खळबळजनक व चक्रावून टाकणारी माहिती मिळाली’ असा आरोप नगरसेवक ॲड. खरात यांनी केला आहे.

माझ्या वरळी मतदारसंघात व आजूबाजूच्या परिसरात पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 47 कोटी रुपयांची कामे केली आहेत. ही कागदपत्रे हातात घेवून प्रत्यक्ष काम केलेल्या ठिकाणी मी जावून पाहणी केली असता, अशी कोणतीच कामे झालेली दिसली नाहीत. एवढेच नव्हे तर नागरिकांना सुद्धा अशी कामे झाल्याचे ठावूक नाही. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी केलेला हा घोटाळा संतापजनक आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराची पाळेमूळे चव्हाट्यावर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही’ असा घणाघात नगरसेवक ॲड. संतोष खरात यांनी केला आहे. सन 2020-21 ते 2022-23 या तीन आर्थिक वर्षात ही बोगस कामे केली असल्याचे सतोष खरात यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

PWD : पीडब्ल्यूडीतील बदली; घोटाळ्याला रवींद्र चव्हाण यांचा चाप !

पीडब्ल्यूडीचा प्रताप : सरकारी महाविद्यालयात टीचभर काम, हातभर बिल !

पीडब्ल्यूडीतील कार्यकारी अभियंत्यांचा उद्योग, निविदा ‘मॅनेज’ करणाऱ्या लिपिकाला ७ वर्षापासून ठेवले एकाच जागेवर

आयआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी
पीडब्ल्यूडीतील बोगस कामासंदर्भात तक्रार झाल्यास दक्षता व गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी केली जाते. परंतु दक्षता व गुणनियंत्रण विभागातील अधिकारी सुद्धा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळालेले आहेत. त्यामुळे दक्षता व गुणनियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांवर माझा विश्वास नाही. या कामांची निष्पक्ष व कठोर तपासणी कऱण्याचे काम आयआयटी मुंबईकडे देण्यात यावे. आयआयटी मुंबईचे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी खऱ्या अर्थाने ‘दूध का दूध व पाणी का पाणी करतील’ अशी मागणी ॲड. खरात यांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची आपण लवकरच भेट घेवून त्यांच्याकडे निवेदन देणार आहोत, असेही खरात यांनी म्हटले आहे. याबाबत पीडब्ल्यूडीच्या वरळी विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांना वारंवार फोन करून सुद्धा त्यांनी फोन उचलला नाही. त्यांना एसएमएस केल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी