29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोमेजलेले राज ठाकरे !

कोमेजलेले राज ठाकरे !

टीम लय भारी

राजमान्य , राजश्री , श्रीमान राजजी ठाकरे साहेब
जय भारत !!!

साहेब कसे आहात तुम्ही ? ५२ मिनिटाच्या भाषणाने थकला असाल ना ? आता तीन-चार महिने आराम करा. पावसाळा गेला की बघू आपण महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत . साहेब , तुम्ही चालू केलेली हनुमान चालीसा अजून एक आठवडा वाजेल बरं का . त्यानंतर नाटककार फडणवीस आणि मंडळी नवीन पेन ड्राइव बाहेर काढतील आणि तुमच्या चालीसा बंद होतील . या महाराष्ट्रात फडणवीसांना आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त फुटेज मिळाल्याचे चालत नाही . एबीपी देवेंद्र आणि इतर गोदी मिडियाला तसा निरोप कधीच गेला असेल .(MNS Raj thackeray’s political stand become changed)

राज साहेब , सुरुवातीला तुमची काय क्रेझ होती . मराठी माणसाचा मुद्दा , ती खळखट्टयाकची भाषा . मराठी माणसांना नुसती गुदगुल्या करत होती . तुमचा तो विविधरंगी भगवा पांढरा हिरवा निळा रंगाचा कल्पक झेंडा . तुम्ही एकदम सर्वसमावेशक वाटत होतात . नेता असावा तर तुमच्यासारखाच . तुम्हाला जसा जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घातलेला शेतकरी आवडत होता तसाच आम्हाला सर्वसमावेशक तुमच्यासारखा नेता आवडला होता .

नंतर तुमच्या राजकीय सल्लागारांनी तुमची उलटी गिनती चालू केली . तुमच्या पक्षाचे चिन्ह रेल्वे इंजिन याचे तोंड बदलले . इंजिनाचे तोंड उजवीकडे की डावीकडे असे बालिश खेळ चालू केले . आपले चिरंजीव आजारी पडले तेव्हा आपण आपल्या दहा बोटातल्या आंगठ्या , गळ्यातील माळा फेकून दिल्या . चिरंजीव चांगला झाल्यावर त्याच माळा , अंगठया जागेवर आल्या .

विचारांची बैठक पक्की नसल्यावर माणूस असा सैरभैर वागतो साहेब . असो .

नंतर तुम्ही झेंड्याचा रंगच बदलला . मराठी सोडून हिंदुत्व स्वीकारलं . तुम्हाला वाटलं उद्धवजी ठाकरे यांच्या वडिलांनी जसे राजकारण केले तसेच मी सुद्धा करेल . पण साहेब , त्यांना त्यांच्या पक्षाच्या वाढीला तेव्हाच्या काँग्रेसने मनापासून मदत केली . काँग्रेस आणि भाजपमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. भाजपा आणि विशेष म्हणजे देवेंद्र भाई तुमचा वापर भाजीतील कडीपत्यासारखा करून कधी फेकून देतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही . असो .

तुम्ही राजकारणातील सल्लागारांची कोणती ” शिदोरी ” घेऊन चालला आहात हे तुम्हालाच माहित .

साहेब , तुमच्या हनुमान चालीसावर सोशल मीडियावर भरपूर खिल्ली उडवली जात आहे बर का . लोक आता लाव रे ती हनुमान चालीसा असे म्हणू लागले आहेत . साहेब चालीसा हा भैयाचा हिंदी भाषिक शब्द आहे . तुम्ही शिवतीर्थवाले , किमान स्तोत्र हा शब्द वापरायला काय हरकत होती . हिंदुत्व करता करता मराठी भाषेच्या शब्दांची सुद्धा तुम्ही करून टाकली की काय ?

साहेब त्या दिवशी एक तरुण कार्यकर्ता म्हणत होता की , साहेबांना भ्रष्टाचाराबद्दल किती राग आहे बघा . साहेबांनी कधी भ्रष्टाचार केलाच नाही का हो ? मी ठामपणे म्हटले , नाही !!! मग तो म्हणाला , साहेबांनी नुकतीच शिवतीर्थ नावाची भली मोठी बिल्डिंग बांधली मग त्याच्यासाठी कुठून पैसे आणले असतील ? मागे कोहिनूर मिल विकत घेतली तेव्हा कुठून पैसे आणले असतील ? इतक्या महागड्या गाड्या कशा वापरतात ? मुलाचे लग्न इतक्या धुमधडाक्यात कसे साजरे करतात ? एक सर्वसामान्य व्यंगचित्रकार इतकी संपत्ती कशी जमा करू शकतो ? पेट्रोल-डिझेल , कांदे-बटाटे , तूरडाळ , गहू , तांदूळ , मटन , चिकन ,फोनचा रिचार्ज , टी व्ही रिचार्ज ,डॉक्टरचा खर्च , मेडिसिनचा खर्च , उंची कपडे , महागडे गॉगल , यासाठी कुठून पैसा आणत असतील ? मी म्हणालो , गप्प बस . ईडी सारखे प्रश्न विचारु नकोस . येडा बिडा झाला की काय ? असले फालतू प्रश्न आपण कार्यकर्त्यांनी कधीच विचारायचे नसतात . तरी तो पुढे कसा विचारतो माहिती आहे का ? तो म्हणाला , सध्या एक लिंबू दहा रुपयाला झालाय हे साहेबांना माहीत आहे का हो ?

साहेब , आपल्या भाषणात तुम्ही त्या भैय्यांच्या उत्तरप्रदेशचा उदो उदो केलात . डायरेक्ट 360 अंशात फिरलात . मानलं बुवा आपल्याला . लोकांच्या विस्मरणशक्तीवर काय जबरदस्त कॉन्फिडन्स आहे आपल्याला ?

आपण कनिष्ठ ब्राह्मण . म्हणजे सी.के. पी . हो ! एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला बरोबर वाचवतो . आपल्याकडे एकच आमदार ( तोही स्वतःच्या कर्तुत्वाने निवडून आलेला ), 2 ते 3 नगरसेवक असताना बामणी आणि गोदी मीडियाच्या जीवावर आपण आणि आपला पक्ष अजून जिवंत आहे . नव्हे जाणीवपूर्वक जिवंत ठेवला जात आहे . नाहीतर पक्षाचा आख्खा एक खासदार असताना त्या ओवेसीभाईची लाईव्ह सभा या ब्राह्मणी मीडियाने कधी दाखवली नाही ती .

साहेब , तुम्ही तुमच्या स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमा ठेवता . त्या प्रतिमांसमोर फिल्मी स्टाईलने मुजरा घालता . आणि त्या जागेवरूनच जाती-जातीत द्वेष पसरवणारे भाषण कसे काय देऊ शकता ? साहेब , तुम्ही प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा चालविण्याऐवजी त्या ब. मो .पुरंदरेचा वैचारिक वारसा चालवित आहात . त्यामुळेच तुमचा वैचारिक पाया ठिसूळ असल्याने तुम्ही पटकन 360 अंशात गर्रकन गोल गोल फिरता .

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन आपण केलेत . साहेब मनसेच्या स्थापनेच्या कित्येक वर्षे अगोदरपासून प्रत्येक वर्षी बाबासाहेबांची जयंती दणक्यात धुमधडाक्यात साजरी होते . गेल्या काही वर्षांपासून देश विदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी होते . साहेब , या आवाहनाबरोबरच दलित विद्यार्थ्यांची सरकारने स्कॉलरशिप बंद केली आहे , जातीयवादी प्रेमप्रकरणातून अनेक दलित तरुण मुलांच्या हत्या झाल्या , त्याबद्दल आपले मत कधी ऐकले नाही . या मुलांच्या रोजगारबद्दलची कोणतीही ब्लू प्रिंट , ग्रीन प्रिंट , रेड प्रिंट आपण कधी सादरच केली नाही . आपण चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झाल्याचे एकही चित्र उपलब्ध नाही . मग कशाला उगाचच पुतना मावशीचे प्रेम दाखवता ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बऱ्याच दलाच्या प्रमुखपदी मुसलमान होते . बाबासाहेबांचे संविधान हे प्रथमही भारतीय आणि अंतिमतः ही भारतीय हेच शिकविते .

आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांना तुम्ही तुमच्या भाषणात अरे-तुरेची भाषा वापरली . किती जळाव एखाद्यावर . किती द्वेष करावा एखाद्याचा . तुम्ही अरेतुरीचे भाषा वापरल्याने त्यांच्या पदाची गरिमा थोडीच कमी होणार आहे . उलट त्यामुळे तुमची संस्कृती दिसून आली .

साहेब तुमचा वैचारिक गोंधळ इतका जबरदस्त झाला आहे की तुमची भाषाच गोंधळलेली झाली आहे . आणि तुम्ही निवडलेला राजमार्ग आता एखाद्या गल्लीतल्या मार्गासारखा दिसत आहे .

शरद पवारांवर टीका करताना काही वाटत नाही का हो तुम्हाला साहेब ? प्रसिद्धी मिळविण्यासाठी पुण्यात पवार साहेबांची तुम्ही प्रकट मुलाखत घेता . त्यांच्या घरी बिन बुलाये मेहमान भेटायला जाता . त्यांच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहता . तेव्हा त्यांचा पक्ष हा जातीयवादी आहे हे तुमच्या लक्षात येत नाही का ? तेव्हा कुठे गेला राधेसुता तुझा धर्म ? साहेब , हा डबल गेम बंद करा . वैयक्तिक संबंध वगैरे गोड गोड शब्दच्छल बंद करून टाका आता .

जय संविधान !
जय भारत !!
जय महाराष्ट्र !!!

                                                                                                                         लेखक :  ऍड .विश्वास कश्यप ,
माजी पोलिस अधिकारी


हे ही वाचा : 

राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, घाटकोपर येथे मनसे कार्यकर्त्यांकडून स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली

मनसेची बॅनरबाजी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी