27 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमुंबई“सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?”

“सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?”

टीम लय भारी

मुंबई : सध्या राज्यात संभाजीनगरच्या नामांतरचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपा (BJP) व मनसे या मुद्यावरून आक्रमक झाली असून, सत्ताधारी शिवसेनेला यावरून कोंडीत पकडले जात आहे. कारण,

महाविकासआघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचा औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास विरोध आहे. तर, शिवसेनेकडून ही आम्ही संभाजीनगर असे नाव करणारच असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, अद्याप हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने भाजपा नेत्यांकडून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे.

“स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा “उखाड दिया” ची भाषा..आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”! सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज रोखठोक सदरातून औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर निशाणा साधलेल्याचे दिसून आले आहे. याचा संदर्भ आशिष शेलार यांनी आपल्या ट्वटिमध्ये घेतल्याचे दिसत आहे.

“औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!” असं संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात म्हटलेलं आहे.

एकूणच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी