27 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरमुंबईAaditya Thackeray : यशवंत जाधवांच्या मतदार संघातही आदित्य ठाकरेंना दणक्यात प्रतिसाद !

Aaditya Thackeray : यशवंत जाधवांच्या मतदार संघातही आदित्य ठाकरेंना दणक्यात प्रतिसाद !

आदित्य ठाकरे यांनी भायखळा, वरळी आणि प्रभादेवी येथील शाखाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद सुद्धा साधला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासू सहकाऱ्यांनीच दगा दिल्यानंतर शिवसेनेमध्ये आता मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार यांच्यासह बंडखोरी केली, त्यानंतर शिवसेनेला भलेमोठे भगदाड पडले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना असताना, एकनाथ शिंदे गटाने त्यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली आहे. पण आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा वाद वाढू लागला आहे. हे सर्व होत असताना शिवसेनेचे नेते आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु करून राज्यातील प्रत्येक मतदार संघातील शिवसैनिकांना भेट देण्यास सुरुवात केली आहे.

काल (ता. ४ ऑगस्ट) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भायखळा, वरळी आणि प्रभादेवी येथील शाखाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद सुद्धा साधला. आदित्य ठाकरे यांनी भेट दिलेला भायखळा मतदार संघ हा एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार यामिनी जाधव यांचा असून या मतदारसंघात यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांचा अधिक प्रभाव आहे, पण असे असून देखील आदित्य ठाकरे यांना या मतदारसंघात लोकांनी राजकीय भूकंपानंतर चांगला प्रतिसाद दिला.

यशवंत जाधव यांच्यामुळे भायखळा हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला बनला, असे बोलले जाते. पण या मतदारसंघात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा स्वतंत्र असा मतदारसंघ आहे. ज्यामुळे शिवसेनेत झालेल्या भूकंपानंतर सुद्धा या मतदारसंघात अद्यापही शिवसेनेचा प्रभाव कायम आहे. आदित्य ठाकरे यांनी काल भेट दिल्यानंतर लोकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.

हे सुद्धा वाचा

Aaditya Thackeray यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली

उद्धव ठाकरे अर्जून खोतकरांना म्हणाले, तुमची अडचण असेल तर तुम्ही जा

शिवसेनेच्या काही बंडखोरांसाठी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख

दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि इतर उपस्थित नागरिकांशी सुद्धा संवाद साधला. तसेच सामन्यांमध्ये मिसळून सेल्फी काढताना सुद्धा आदित्य ठाकरे यावेळी दिसून आले. महत्वाची बाब म्हणजे भायखळा हा मतदारसंघ जाधव दाम्पत्याचा असला तरी, या मतदार संघात आदित्य ठाकरे यांना नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी लोकांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठी गर्दी केली होती. युवा वर्गापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिसाद दिला. याआधी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना आपल्या भाषणातून खडेबोल सुनावले होते. गेल्या काही दिवसात आदित्य ठाकरे यांच्या जनतेशी भेटीगाठी वाढल्याने शिवसेना आता पुन्हा एकदा नव्याने उभी राहणार असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!