24 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरमुंबईनवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाप्रश्नी आदित्य ठाकरे सरकारवर संतापले

नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाप्रश्नी आदित्य ठाकरे सरकारवर संतापले

नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणावरुन राज्य सरकारकडून ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण आतापर्यंत तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वेळ मिळत नसल्यामुळे लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात येत आहे, असे कारण राज्य सरकारद्वारा देण्यात येते. आधी 13, 14 ऑक्टोबर, त्यानंतर 17 ऑक्टोबर आणि पुन्हा 30 ऑक्टोबर या तारखा  लोकार्पणासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे या तारखा रद्द करण्यात आल्या. यावरुन, शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ‘X’ वरून (पूर्वीचे ट्वीटर) राज्य सरकारवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, “नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख या मिंधे भाजपच्या घटनाबाह्य सरकारने जाहीर केलेली नाही. हा मेट्रोमार्ग तयार होऊन आता पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. हा विलंब कशासाठी? निवडणुकीच्या हंगामात उद्घाटनासाठी? लाजिरवाणा प्रकार आहे हा!”


याअगोदर,आदित्य ठाकरे यांनी याच मुद्द्यावरुन गुरूवारी (26 ऑक्टोबर) सरकारला धारेवर धरले होते. आपल्या ट्वीटर पोस्टवरुन ते म्हणाले होते की, “सुमारे चार महिन्यांपासून नवी मुंबई मेट्रो उद्घाटनासाठी सज्ज आहे. पण खोके सरकारला सामान्य नागरिकांसाठी वेळ नसून, घाणेरड्या राजकारणात ते व्यस्त आहेत.  सार्वजनिक सेवेसाठी महत्वाचं असलेलं उद्घाटन असं रखडत ठेवणं योग्य आहे का? सरकारकडे लोकांसाठी आणि सार्वजनिक सेवांसाठी वेळ नसेल, तर कुठल्याही सोहळ्यासाठी न थांबता त्या सुविधा लोकांसाठी तातडीने खुल्या करायला हव्यात!”

नवी मुंबईकरांची मेट्रो प्रवासाची 12 वर्षांची प्रतीक्षा आता अजून लांबणार आहे. लोकार्पणाच्या सततच्या विलंबामुळे राजकिय नेत्यांपासुन ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळेच खोळंबले आहेत.

हे ही वाचा 

मराठा आरक्षण झाले सोपे, १५ हजार कागदपत्रांमुळे आशा पल्लवीत…

जरांगेंची प्रकृती खालावल्याने महिलेने फोडला हंबरडा, विष पिण्याचा दिला इशारा

बीएमसीमध्ये राजकीय ‘प्रदूषण’; ठाकरे-शेलार आमने-सामने

याआधीसुद्धा, कॉँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणावरुन राज्य सरकारवर टीका केली होती. बुधवारी, (25 ऑटोबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ते म्हणाले होते की, “सरकारला वेळ नसेल तर नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण आम्ही करू. नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. प्रधानमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोर खेळ सुरू आहे. नवी मुंबईकरांना सरकार अजून किती दिवस वेठीस धरणार आहे.”


“सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी न केलेल्या कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. या सरकारला हा नैतिक अधिकार कोणी दिला. न केलेल्या कामाचे लोकार्पण करताना या सरकारला कमीपणा वाटत असावा, म्हणून नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण रखडवले आहे. या लोकार्पण सोहळ्यावर कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आम्ही हा लोकार्पण सोहळा जनतेचा पैसा न खर्च करता करू.”

“आघाडी सरकारच्या काळात मेट्रो प्रकल्पांची मूहूर्तमेढ रोवली. त्यानंतर 12 वर्षे नवी मुंबईकरांनी मेट्रोची वाट पाहिली. 13, 14 ऑक्टोबर आणि त्यानंतर 17 ऑक्टोबर अशा तीन वेळा लोकार्पणासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. पण सरकारने नवी मुंबईकरांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रधानमंत्र्यांचा मुंबई दौरा झाला त्यानंतर आता शिर्डी दौऱ्याला वेळ आहे परंतु नवी मुंबईला यायला वेळ नाही. लोकार्पणाला वेळ नाही म्हणून पूर्ण झालेल्या प्रकल्पांची सेवा जनतेला मिळत नाही, याचा खेद वाटतो.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी