पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले होते. पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्याच्या पोलिसांसाठी राखीव भूखंड राजकीय व्यक्तीने एका बांधकाम व्यवसायिकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या आरोपांवर उत्तर देताना आज मंगळवारी (17 ऑक्टोबर) अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. ‘मी अनेक वर्षे पुण्याचा पालकमंत्री होतो पण त्या प्रकरणाशी माझ्या काहीही संबंध नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या आत्मचरित्रातून अजित पवारांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी 2008 साली शासनाने काढलेला जीआर सादर केला.
काय म्हणाले अजित पवार?
2008 साली शासनाने काढलेल्या जीआरचा हवाला देत अजित पवार म्हणाले, “संबंधित प्रसंताव गृह विभागाचा होता. त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. त्यावेळी आर आर पाटील गृहमंत्री होते. पुण्यातील भूखंडासंदर्भात आर. आर. पाटलांनी निर्णय घेतला असं मला सांगितलं. पोलिस आयुक्तांना बोलावून मी विचारलं असतात्यांनी नाही म्हटल. मी द्यायचं नाही तर नका देवू असे त्यांना सांगितले. कोणत्याही अधिका-याशी, आयएएस आधिकारी यांच्या मी व्यवस्थितपणे बोलत असतो. प्रसिद्धीसाठी काही खळबळजनक गोष्टी लिहिल्या असतील.”
“यांची लगेच चौकशी करा असं विरोधी पक्षाचं म्हणण आहे. पण, कुठल्याही ठिकाणी माझी सही नाही. कुठल्याही बैठकीला माझी उपस्थिती नाही. आर आर पाटलांनी सांगितलं की तुम्ही लक्ष घालू नका. माझा काहीही संबंध नाही. आर. आर. पाटील यांना काही करण्यास मी सांगितलं नाही. मेट्रोच्या मोक्याच्या जागा पोलिस खात्याच्या पाँलिटेक्नीकीची जागा दिलेल्या आहेत. कुठल्याही जागा देताना पारदर्शकता असावी. या जनतेच्या जागा आहेत आणि जनतेचा पैसा आहे. विश्वस्त म्हणून आम्ही काम करत असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा
मीरा बोरवणकर यांचे आणखी गौप्यस्फोट; सरकारमध्ये कोण आहेत बिल्डरांचे दलाल?
अध्यक्ष नार्वेकरांना पुन्हा ‘सर्वोच्च’ समज; ३० ऑक्टोबरला अखेरची संधी
मराठा आरक्षणावर अजित पवार म्हणाले, ‘दमच निघत नाही’
मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी याबाबत चौकशीची मागणी केली होती. त्यावरून अजित पवार म्हणाले, “चौकशी कुणाची करता? जागा कुठेही गेलेलीचं नाही. रेकॉर्डसची जावून पाहणी केली आहे. आपल्याला कुठलीही वेडीवाकडी काम करायची नाहीत. भूखंडाबद्दल मी विचारपूस केली हे कबूल केलं. कुठलीही माहिती झाकून राहणारी नाही. माझ्या यात काहीही संबंध नाही. मी समिती नेमलेली नाही.”