देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिकेचे अंदाजपत्रक (BMC Budget 2023) सादर होणार आहे. प्रशासक असलेले मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल हे गुरुवारी, 2 फेब्रुवारी रोजी अंदाजपत्रक सादर करतील. देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक अंदाजपत्रक मांडणार आहेत. (Brihanmumbai Municipal Corporation) देशाच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी सादर होणारे बीएमसी बजेट म्हणजे निवडणुकीचा जुमला राहील, अशी अटकळ बांधली जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईला धत्तुरा मिळाल्यानंतर आता पालिका अंदाजपत्रकात तरी निराशा होऊ नये आणि नवे कर किंवा करवाढीचा बोझा लादला जाऊ नये, हीच सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे.

प्रशासनाच्या माध्यमातून सध्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार सुरू आहे. आयुक्त नगरसेवकांना भेटही देत नाहीत, ना पत्रकार परिषदांना कधी सामोरे गेले. तब्बल 38 वर्षांनंतर 7 मार्चपासून प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई पालिकेचा कारभार चालवला जात आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर नवे नगरसेवक निवडून येऊन महापालिकेची पहिली सभा होईल, तोवर प्रशासकाची नियुक्ती होणाऱ्या महापालिकेच्या पहिल्या सभेच्या तारखेपर्यंत लागू राहील. BMC ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. प्रशासकाने अंदाजपत्रक मंजूर करण्याची जवळपास 38 वर्षांतील मुंबईतील उद्या पहिलीच वेळ असेल. यापूर्वी फक्त एकदाच 38 वर्षांपूर्वी प्रशासकाने अंदाजपत्रक सादर केल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी महापालिकेने 45,949.21 कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते. यंदा ते 4,500 कोटींनी वाढून 50,000 कोटी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी आरोग्य क्षेत्रासाठी 1,800 कोटींची वाढ करून 6,624.41 कोटींची तरतूद केली गेली होती. अर्थात आता आरोग्य खर्चावरूनच भाजप नेते बोंबाबोंब करीत असले तरी यंदाही या निधीत वाढच केली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्राला धत्तुरा दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाल्याची टीका त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. भाजपला राजकीय यश मिळालेल्या राज्यांमध्ये किंवा ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांना अर्थसंकल्पात झुकते माप दिल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्षातही मुंबई किंवा महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून काहीच हाती आले नाही. महाराष्ट्रातील सध्याचे घटनाबाह्य सरकार दिल्लीसमोर लाचार असल्याची टीकाही शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. गुजरातकडे प्रकल्पही पळविले आणि निधीही पळविले, अशीच प्रत्यक्षात स्थिती आहे. कर्नाटकावर खैरात केली गेली आहे. मुंबईच्या वाट्याला तर काही म्हणता काही आलेले नाही. उपनगरीय सेवांबाबत अपेक्षांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका अंदाजपत्रकातून काही मिळणार नसेल तरी चालेल; पण नवा काही डोक्याला ताप नको, अशीच सर्वसामान्य मुंबईकरांची भावना आहे. एकदाच्या निवडणुका लावा आणि प्रशासक राजमधून सुटका करा, अशीच जनभावना आहे. अर्थात मुंबईकर आणि मराठी माणसांची शिवसेनेप्रति असलेली निष्ठा आणि सहानुभूती यामुळे निवडणूक घ्यायला शिंदे सेना आणि भाजप कचरत आहे.
हे सुद्धा वाचा :
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून शिवसेनेला बदनाम करण्याचे काम सुरु
बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या …
मुंबई देशाची धडकन म्हणत मोदींनी घातली मुंबईकरांना साद; महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले!
आगामी महापलिका बजेट हे निवडणूकपूर्व अंदाजपत्रक असल्याने त्यात शिक्षण, आरोग्य, मूलभूत पायाभूत सुविधा, रस्ते यासाठी भरभक्कम तरतूद केली जाईल, असा दावा शिंदेसेना आणि भाजप नेत्यांकडून केला जात आहे. केंद्राने तोंडाला पाने पुसल्यानंतर आता शिंदे सेना व भाजपच्या सरकारला बांधील असलेले महापालिका आयुक्त मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणार का, ते उद्याच स्पष्ट होईल. निवडणूकपूर्व वातावरणनिर्मिती व भावनिक संमोहनासाठी अंदाजपत्रकात मुंबईकरांसाठी काही नव्या लोकानुनयी घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात, पुन्हा त्याचा खिशावर कररूपी तां पडायला नको, एव्हढीच सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे.