29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमुंबईडॉ. आंबेडकरांच्या 'अर्थपूर्ण' लिखाणाची जगाकडून दखल - शरद पवार

डॉ. आंबेडकरांच्या ‘अर्थपूर्ण’ लिखाणाची जगाकडून दखल – शरद पवार

डॉ. बाबासाहेबांनी अनेक विषयांवर लिखाण केलं. विशेषतः अर्थशास्त्राचा आधार घेऊन त्यांनी जे लिखाण केलं त्याची नोंद ही देशातच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा जाणकारांनी केलेली होती. अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थविषयक कार्याचा गौरव केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आज (२१ ऑक्टोबर २०२३ रोजी) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तेव्हा पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, नामवंत अर्थतज्ञ प्रा. स्वाती वैद्य, डॉ. मनिषा करणे, डॉ. अजित रानडे, डॉ. वामन गवई आणि डॉ. गणेश देवी यांच्यासह अर्थक्षेत्रातील देश विदेशातील अभ्यासक उपस्थित होते.

‘आयुष्यातील काही महत्वाचा काळ त्यांनी कोलंबीया युनिव्हर्सिटीमध्ये घालवला. नंतरच्या काळामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. १९२३ च्या आसपास परत आल्यानंतर मुंबईच्या कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्यांनी योगदान दिलं होतं. त्यामधून विशेषतः त्यांनी जे लिखाण केलं, त्या लिखाणामध्ये ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ असा अत्यंत महत्वाचा अर्थशास्त्रासंबंधी कठोर भूमिका मांडणारा ग्रंथ लिहिला. त्याची नोंद जगातल्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केली. काहींनी त्याला मान्यता दिली नाही, तरीसुद्धा त्यामधील त्यांचं लिखाण त्यांनी मनापासून स्वीकारलं, असं पवार यांनी सांगितलं.

‘स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे एक सरकार झालं, त्या सरकारमध्ये ‘वॉटर रिसोर्सेस अँड पॉवर’ या मंत्रालयाची जबाबदारी बाबासाहेबांवर आली. त्यावेळेला या देशात उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग कसा करायचा ? त्यासंबंधीची उभारणी कशी करायची ? याबद्दल अत्यंत मोलाचे निर्णय हे त्यांनी घेतले. उदाहरण सांगायचं झालं तर, आज पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जी एक स्वयंपूर्णता प्राप्त झाली, त्यामागील मूलभूत कारण भाकरा आणि नांगल धरणांचा निर्णय त्या काळामध्ये बाबासाहेबांनी घेतला होता. ‘दामोदर व्हॅली कार्पोरेशन’ या अत्यंत महत्वाच्या पाटबंधारे प्रकल्पाचा निर्णयसुद्धा स्वातंत्र्याआधी त्यावेळच्या सरकारमध्ये असताना बाबासाहेबांनी घेतलेला होता.’ असेही पवार यांनी सांगितले.

‘एका दृष्टीने पाण्यासंबंधी व पाटबंधारे संबंधी मूलभूत निर्णय त्यांनी घेतले. हे घेत असताना पाण्यापासून व प्रकल्पापासून विद्युत निर्मिती हीसुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ते करणं सहज शक्य आहे हा विचार त्याकाळी बाबासाहेबांनी मांडला. आज विद्युत क्षेत्रामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल किंवा अन्य संस्था या राज्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये काम करतात अनेक राज्यांमध्ये त्या संस्था काम करतात.

पण ह्या राज्यामध्ये हे काम करत असताना ती विद्युत निर्मिती एखाद्या राज्याला पुरेल त्यापेक्षासुद्धा अधिक असेल आणि काही राज्य अशी आहेत की, ज्या ठिकाणी विद्युत निर्मितीला मर्यादा आहेत. अशा ठिकाणी विद्युत उपलब्ध करून देण्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केला. स्वातंत्र्याआधी स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडली. एवढेच नव्हे तर अधिक अतिरिक्त वीज ज्या ठिकाणी आहे आणि ज्या राज्यामध्ये वीज नाही त्या ठिकाणी वीज पोहचवण्यासाठी अनेक निर्णय बाबासाहेबांनी घेतले’. अशा शब्दात पवार यांनी बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा मागोवा घेतला.

बाबासाहेब म्हटल्यानंतर आपल्या सर्वांसमोर प्रकर्षाने एकच विषय जातो तो म्हणजे संविधान. संविधानाबद्दल त्यांचं योगदान यासंबंधी चर्चा करण्याचं कारण नाही. कारण आज या देशामध्ये खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही जी टिकली त्यामध्ये संविधानामधील त्यांच्या योगदानालाच श्रेय द्यावं लागेल, यामध्ये काहीच शंका नाही. संविधानासंबंधी मोलाचं काम जसं त्यांनी केलं तसंच विद्युत, जलसंधारण, कामगार क्षेत्रातले कायदे आणि अन्य कायदे यासंबंधीसुद्धा जो मूलभूत विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला त्याचा फायदा स्वातंत्र्यानंतर सुद्धा या देशातल्या कोट्यावधी नागरिकांना अनेक वर्षांपासून मिळत आहे.

हेच त्यांचं जे योगदान आहे त्याचं स्मरण करणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः अर्थशास्त्र संबंधित त्यांनी जे लिखाण केलं, ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या ग्रंथाच्या माध्यमातून सोनं आणि चलन किंवा चांदी आणि चलन यांचे असलेले संबंध याबद्दल एक मार्गदर्शक तत्व बाबासाहेबांनी जगासमोर ठेवलं, असे पवार यावेळी म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार कुमार केतकर यांनीही यावेळी आंबेडकरांच्या योगदानाचा उहापोह केला.

आंबेडकरी अर्थ विचाराचे मर्यादीकरण केलं जात: प्रकाश आंबेडकर 

प्रकाश आंबेडकर यांनी, आंबेडकरी अर्थ विचाराचे मर्यादीकरण केलं जात असल्याचे सांगत याची व्यापकता वैश्विक असल्याचे सांगितलं. आदिवासींच्या जमिनींच्या हक्कांचे रक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर आंबेडकरांची दृष्टी मसुदा समितीचे अध्यक्ष पद नव्हती तर अर्थविचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन आयोगाच्या माध्यमातून काम करण्याची होती असं त्यांनी यावेळी. आंबेडकरी अर्थ विचाराचे मर्यादीकरण केलं जात असल्याचे सांगत याची व्यापकता वैश्विक असल्याचे सांगितलं. आदिवासींच्या जमिनींच्या हक्कांचे रक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर आंबेडकरांची दृष्टी मसुदा समितीचे अध्यक्ष पद नव्हती तर अर्थविचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन आयोगाच्या माध्यमातून काम करण्याची होती असं त्यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा 

‘मराठा-कुणबी’ संदर्भात काय बोलले रामदास कदम?
शरद पवार-प्रकाश आंबेडकर भेटीत फक्त कॉफीपान?
इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेने उचलले मदतीचे पाऊल

समष्टी फाउंडेशन, आंबेडकर लॅब इनिशिएटिव्ह आणि एनआयसीईद्वारे आयोजित हा सोहळा स्मृतिशेष मधूकरराव तामगाडगे ट्रस्टच्या सहकार्याने पार पडला. अमेरिकेच्या प्रसिध्द कोलंबिया विद्यापीठासह SOAS युनिव्हर्सिटी लंडन नॉलेज पार्टनर म्हणून सामील झाले होते. कार्यक्रमात न्यायमूर्ती सी. एल थूल आणि डॉ. सुकेश झंवर यांचे हस्ते नवीन पिढीतील उद्योजक अविचल धिवार, भरत वानखेडे, निलेश पठारे, अक्षय दावडीकर आणि विशाल पाटणकर यांना सन्मानित केलं गेलं. विउरूवेला या प्रकाशन संस्थेतर्फे बा भीमा या कॉमिक बुक सिरीजचा चौथा भाग शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित केला.

या सोहळ्यात विक्रांत भिसे, भूषण भोंबाळे, मयुरी च्यारी, लक्ष्मण चव्हाण, प्रभाकर कांबळे, सुरज कांबळे, आकांक्षा धनराज पाटील, सुधीर राजभर, पिसुर्वो जितेंद्र सुरळकर आणि क्युरेटर- सुमेश मनोज शर्मा या भारताच्या आघाडीच्या दृष्यचित्रकारांद्वारे विशिष्ट पद्धतीच्या कलाकृतीच्या माध्यमातून बाबासाहेबांना व त्यांच्या आर्थिक योगदानास आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना अँड. जयमंगल धनराज यांनी केले वैभव छाया यांनी कार्यक्रमामधील भूमिका स्पष्ट केली आश्लेषा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर समीर शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी