बाजारात आता गणपती उत्सवाची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. गणपतीच्या आगमनासाठी आता फक्त काहीच दिवस शिल्लक असताना सार्वजनिक गणपती उत्सवातील मंडळांनी रविवारीच गणपती मूर्ती मंडळात आणून ठेवली. मूर्तीची स्थापना केल्यानंतर सजावटीसाठी बराच वेळ लागत असल्याने मोठ्या गणपती मंडळातील सदस्यांनी रविवारी गणपती मूर्ती मंडळात आणून ठेवली.
रविवारी दुपारीच घाटकोपर सर्वोदय परिसरातील मोठे रस्ते, दृतगती मार्ग, एल. बी. एस. मार्ग, दादर, माटुंगा परिसरात दुपारीच मोठया गणपती बाप्पांचे भक्तांना दर्शन झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने सार्वजनिक गणपती मंडळाच्या सदस्यांनी लगबगीने गणपतीची मूर्ती मंडळात आणली. भक्तगण वाजत गाजत, ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यात तल्लीन होते. सायंकाळनंतर मात्र बऱ्याच भागात वाहतूक कोंडीही दिसून आली. पोलिसांनी रस्त्याच्या एका बाजूला गणपती मंडळांना वाहतुकीसाठी जागा उपलब्ध करून दिली. इतर वाहनांनी वेग मर्यादित राखत मंडळांना प्रवासासाठी जागा तयार केली.
हे ही वाचा
गणरायासाठी थर्माकोलच्या मखरांऐवजी सजावटीसाठी कोणत्या वस्तू बाजारात मिळतायत ?
दहीहंडीत फुगड्या घालून चार्ज झालेले सोमय्या पुन्हा मैदानात!
नकाश अझीझच्या ढोल ताशाच्या गजरातील ‘मोरया’ गाण्यावर तुम्ही ही धराल ठेका
गणपतीच्या आगमनासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. आमच्याकडील गणपतीच्या ८ ते १३ फूटांच्या मूर्ती रविवारीच रवाना झाल्या. मोठ्या मूर्तीची ऑर्डर मे-जून महिन्यात आगाऊ स्वीकारली जाते. त्यानंतर फॅक्टरीमधून घरगुती गणपतीसाठी छोट्या आकरांच्या मूर्ती आणल्या गेल्या. रंगरंगोटी आणि मणी लावण्याचे काम आम्ही दुकानात प्रत्यक्ष ग्राहकांच्या समोरच करतो. यानिमित्ताने प्रसिद्धी मिळते. बरेचदा छोट्या आकाराच्या मूर्ती ऐन गणपती उत्सव जवळ येताच मोठ्या संख्येने विकल्या जातात. यंदा व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.