ठाणे या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तलावांचे शहर अशी एकेकाळी ओळख असणारे ठाणे आता सिमेंट कॉंक्रेटचे जंगल होत आहे. असे असतानाच, या शहरात काही वास्तू आहेत; ज्या आपल्याला ऐतिहासिक काळात घेऊन जातात त्यापैकी एक म्हणजे कौपीनेश्वर मंदिर. ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून गुरुवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच माती परीक्षण यांच्या माध्यमातून केली जाईल. त्याची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल, असे या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. श्री कौपिनेश्वर मंदीर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे चार फूट तीन इंच उंचीचे व १२ फुटी घेर असलेले शिवलिंग आणि ठाणेकरांची ग्रामदेवता असलेले कौपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळामध्ये इ. स. ८१० ते १२४० दरम्यान बांधले गेले. १८७९ मध्ये वर्गणी गोळा करून मंदिराचा पुन्हा जीर्णोध्दार करण्यात आला. त्यानंतर १९९६मध्ये या सभामंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत.
या मंदिर परिसरात भाजी मंडई आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे हा परिसर दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे. या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचा संकल्प केला असून याबाबतची पाहणी मंदिराच्या विश्वस्तांसोबत करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्त बांगर आणि जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांना दिल्या होत्या. त्यानुसार मंदिराच्या विश्वस्तासमवेत बैठक पार पडली.
यावेळी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच माती परीक्षण या कामाची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. तसेच मुख्य मंदिराचे डिझाईन, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व व मंदिराच्या नवीन गाभा-याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणे तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.
श्री कौपीनेश्वर मंदिर हे ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच आजूबाजूचा परिसर, मंदिराची इमारत, दशक्रिया विधी परिसर याबाबत नियोजन करताना मंदिराचे विश्वस्त या सर्वांना विश्वासात घेवून कार्यवाही केली जाईल असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले.
हे सुद्धा वाचा
अजितदादांच्या ‘टोपी’ची हवा; जोडला अखंड महाराष्ट्र माझा !
भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार, नाशिकमधील होर्डिंग्जवर यशवंतराव चव्हाणांचे फोटो
एफडीए झाला ओसाड गावचा पाटील
भाजीमंडई व त्या परिसरात असणारे मंदिराचे प्रवेशद्वार परिसर सुशोभित करण्यासाठीही योग्य ती कार्यवाही करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. सुशोभिकरणाबाबत पुण्यातील वास्तुरचनाकार अरूण कलमदानी यांनी मंदिर तसेच या परिसरात होणारे उपक्रम, येणारे भक्त आणि मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन एक आराखडा तयार केला आहे. तो आराखडा पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पहावा अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. ती विनंती मान्य करुन हा आराखडा पाहून व सदर वास्तुरचनाकारांशी चर्चा करू, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.
मंदिराचे स्ट्रक्चर आँडिट झाल्यानंतर ही वास्तू दुरुस्त करायची की पूर्ण मंदिराचा नव्याने जिर्णोद्धार करावा हे स्पष्ट होईल. तसेच माती परिक्षण केल्यानंतर खडक किती अंतरावर आहे, पाणी किती खोलीवर आहे हे कळेल, त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यानंतरच स्पष्ट होतील. तसेच जर मंदिराचा पूर्ण जिर्णोद्धार करायचा झाल्यास ऐतिहासिक वास्तू व त्याकाळात करण्यात आलेले दगडी बांधकाम याचा विचार करुनच बांधकाम करावे लागेल, त्यामुळे याबाबत मा. मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती दर्शक माहिती देऊ. त्या पुढील निर्णय त्यांच्या निर्देशाप्रमाणे घेऊन कार्यवाही करु, असे बांगर यांनी सांगितले. त्यास विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली.
भाजी मंडई येथील साफसफाईचे निर्देश
मंदिराच्या बाजूला भाजी मंडई असल्याने या ठिकाणी दिवसभर भाज्यांची आवक सुरू असते. तसेच भाजी मंडईतील खराब झालेला भाजीपाल्याचा उग्र वास मंदिर परिसरात येत असल्याची बाब विश्वस्तांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागला या परिसराची साफसफाई नियमित व दिवसांतून दोन ते तीन वेळा होईल या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.