30 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमुंबईधोक्याची घंटा : मुंबईतील दूषित हवेमुळे होतोय फुफ्फुसाचा कर्करोग

धोक्याची घंटा : मुंबईतील दूषित हवेमुळे होतोय फुफ्फुसाचा कर्करोग

मुंबईतील प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा विळखा मुंबईभोवती पडत चालल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. मुंबईत २००९ ते २०२१ या दरम्यान फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत सुमारे ४९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. हवेतील प्रदूषण विशेषतः पार्टीक्युलेट मॅटर २.५ चे हवेतील अधिक प्रमाण आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच सुधारित मृत्यू प्रमाणपत्र प्रक्रियेमुळे कर्करोगजन्य आजाराचा धोका वाढला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (Lung cancer due to polluted air in Mumbai) २००९ मध्ये मुंबईत फुफ्फुसाच्या कर्करोगाने ६२१ लोकांचा मृत्यू झाला होता, मागील काही वर्षांमध्ये यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २०२१ मध्ये शहरात फुफ्फुसाच्या कर्करोगाने ९२३ मृत्यू झाले. मागील १२ वर्षांत फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ४८.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब उघडकीस आली आहे.

Lung cancer due to polluted air in Mumbai

गोवंडी ‘न्यू संगम वेल्फेअर सोसायटी’चे अध्यक्ष शेख फैयाज आलम यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जाद्वारे मुंबईतील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या मृत्यूची आकडेवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) मिळवण्यात आली आहे. २०२२ ची माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. २०१० मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने ६८३ लोकांचा मृत्यू झाला, तर २०१२ मध्ये ७२४, २०१५ मध्ये ९०४, २०१६ मध्ये ९६४ आणि २०१७ मध्ये ९४२ लोकांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये १२ वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक म्हणजेच एक हजार सहा प्रकरणे नोंदवली गेली. २०२० मध्ये, कोविडच्या पहिल्या वर्षी मात्र, मुंबईत फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ८०२ वर खाली घसरली. तंबाखू, वायू प्रदूषण आणि सुधारित निदान तंत्रज्ञानामुळे मुंबईत गेल्या दशकात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे अधिकाधिक लोकांचे निदान झाले आहे.

जागतिक पातळीवर सादर करण्यात आलेल्या अहवालात हवेतील प्रदूषणाचा फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंध असल्याचे अधीरेखित करण्यात आले आहे. एस. एल. रहेजा हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. सार्थक रस्तोगी यांनी सांगितले की, पार्टीक्युलेट मॅटर २.५ चे हवेतील अधिक प्रमाण सामान्य पेशीमध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या उत्परिवर्तनाला कर्करोग होण्यास चालना देऊ शकते. “गेल्या दशकात, फुफ्फुसाचा कर्करोगाचे रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषत: धूम्रपान न करणाऱ्या महिलांना हा कर्करोगाचा आजार होत आहे. यूकेमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या १० पैकी एक प्रकरण हवेच्या प्रदूषणामुळे होते.” असे डॉ. सार्थक रस्तोगी यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत मुंबईत प्रदूषणाच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. मागील महिन्यात दिल्लीच्या तुलनेत मुंबईतील हवेतील प्रदूषणाची पातळी खूपच वाढली होती. गेल्या आठवड्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून ती ‘अत्यंत खराब’ नोंदवली गेली.

मुंबईतील प्रदूषणास महापालिका जबाबदार
भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी तत्कालीन ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळेच मुंबईतील हवेतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्याचा गंभीर आरोप केला होता. मुंबईत १५०० पेक्षा अधिक पुनर्विकास प्रकल्पांचे काम सुरु आहे. कोणतेही नियोजन न करता महापालिकेमार्फत या बांधकामांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतदेखील ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन अयोग’ स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली होती. मुंबईतील वातावरणीय बदलांचे वैज्ञानिक पृथक्करण करण्यात येत नाही. महापालिकेच्या शहर नियोजन आणि आपत्कालीन विभागाकडे प्रदूषणाच्या पातळीच्या नोंदीदेखील ठेवण्यात येत नाहीत, असे सांगत शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभारावर टीका केली.

हे सुद्धा वाचा

मुंबई महानगरपालिकेचा ५२,६१९ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर ; विकास कामांसाठी २७,२४७ कोटी

न्यूमोनिया बरा करण्यासाठी लोखंडी सळईचे ५१ वेळा चटके ; ३ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

वंदे भारत एक्सप्रेस का आहे खास, ते जाणून घ्या…

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी