29 C
Mumbai
Wednesday, August 9, 2023
घरमुंबईमंत्री मंगल प्रभात लोढांचे डोके ठिकाणावर आहे का ?

मंत्री मंगल प्रभात लोढांचे डोके ठिकाणावर आहे का ?

मंगेश फदाले, मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे पुण्यात मानाचा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुरस्कार स्वीकारत होते आणि एकीकडे भाजपचे मुंबईतील आमदार आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा लोकमान्य टिळक यांच्या समाधीस्थळी दादागिरी करून भारतीय राष्ट्रध्वज संहितेचा अवमान करत होते ! मंगळवार दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचा मान आणि निमंत्रण महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना असताना निमंत्रित नसलेल्या मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुनगंटीवार कार्यक्रमस्थळी येण्याअगोदर आपल्या हस्ते घाई घाईत झेंडावंदन उरकून घेतले.

मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील टिळक यांच्या समाधी स्थळी सालाबादप्रमाणे स्वराज्यभूमी स्मारक समितीने कार्यक्रम आयोजित केला होता. दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन तसेच लोकमान्य यांच्या समाधीस्थळी टिळकांना जयंती दिनी अभिवादन करणे, पुण्यतिथी दिनी श्रद्धांजली अर्पण करणे असे कार्यक्रम वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात येतात ! प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या चारही प्रसंगी ध्वजारोहण होत असते. टिळकांच्या पुण्यतिथी दिनाचा यावेळचा कार्यक्रम हायजॅक करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न मंगलप्रभात लोढा यांनी केला, अशी भावना त्यावेळी स्वराज्य भूमी येथील उपस्थित नागरिकांची होती.

कोणताही सार्वजनिक उपक्रम, जागा किंवा दुसऱ्याची नावीन्यपूर्ण कल्पना हायजॅक करणे हे काही लोढा यांना अवघड नाही. लोढा यांची हायजॅक करण्याची अपप्रवृत्ती ही जुनीच आहे. मुंबई महानगपालिकेतील एक कॅबिन लोढा यांनी नुकतीच हायजॅक केली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात कुठल्याही पालक मंत्र्यांनी राज्यातील कोणत्याही महानगरपालिका कार्यालयात आपले व्यक्तिगत कार्यालय थाटलेले नाही. पण लोढा यांनी पालक मंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर करत मुंबई महानगरपालिकेत आपले स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित करून एक नवा पण लोकशाहीला घातक असा पायंडा पाडला आहे; असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. आपले राजकारणातील किंबहुना भाजपमधील स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणावा की आपल्या बिल्डर मित्रांशी व पालिकेच्या कंत्राटदारांशी करोडोंच्या बिझनेस मीटिंग करण्याकरिता गोपनीय जागेची सोय केली असं म्हणावं ? असो, मुंबईतील कॉमन मॅन जागरूक आहे. सामान्य माणसाने फक्त मतदान करताना या बाबी जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचा मान आणि निमंत्रण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना असताना निमंत्रित नसलेल्या मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या आताताई पणाबद्दल गेले आठवडाभर समाज माध्यमांवर समाजातील सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. १ आॅगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांच्या निधनामुळे देश शोकाकुल झाला होता. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांमधे पोरकेपणाची भावना निर्माण झाली होती. त्यांच्या प्रेरणेतुन इंग्रजांशी टक्कर देऊन हे समाधीस्थान व हा पुतळा १९३३ मधे उभारण्यात आला होता. पण प्रसिद्धीसाठी हपापलेल्या या भाजपच्या व्यवसायाने बिल्डर आणि मंत्र्यांना देशभक्तांच्या भावना काय समजणार?

पुण्यात नरेंद्र मोदींनी जो पुरस्कार स्वीकारला तो ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुरस्कार’ देशात सन्मानाचा समजला जातो ; परंतु मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईत टिळकांच्या पुण्यतिथी दिनी लोकमान्यांच्या पवित्र समाधी जवळच आयोजक मान्यवरांच्या अपमानाचा पाढा वाचला. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी स्वराज्य भूमीवर समाधी जवळ लोढा यांच्या कार्यकर्त्यांनी टिळक स्वराज्य भूमी स्मारक समिती संस्थापक-अध्यक्ष प्रकाश सेलम यांना अरेरावीची भाषा वापरून, त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील निरर्थक प्रयत्न करत पोकळ धाडस केले.

स्थानिक भाजप आमदार यांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी एक प्रकारचा तमाशा घातला; त्यामुळे मलबारील विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रातून समाज माध्यमांवर लोढा यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुळात मुंबई भाजपतील काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच मलबार हिल मतदार संघातील अनेक सामान्य रहिवाशी लोढा यांच्या अहंकारी प्रवृत्ती बाबत नेहमीच आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.

मुळात लोकमान्य टिळक स्वराज्य भूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम यांच्या सांगण्यानुसार लोढा यांना निमंत्रण देऊन देखील कधी ते लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिनी किंवा जयंती समारोहाला उपस्थित राहिलेले नाहीत. ‘मंगलप्रभात लोढा या व्यक्तीच्या हलकट मनोवृत्तीचा अनुभव समिती सदस्यांना यापुर्वीही आला होता’, असे समिती सदस्यांचे म्हणणे आहे.

स्वराज्यभूमीचे संपुर्ण कार्य त्यांच्या हातुन हिसकावुन घेण्याचा दुष्ट मानस असल्याचे समिती ओळखुन आहे. जर लोढा खरोखरच त्या योग्यतेचे असते तर एकवेळ स्वराज्यभूमीची त्यांना ही जबाबदारी सुपुर्दही केली असती. परंतु एका बाजारु मनोवृत्तीच्या माणसाकडे स्वराज्यभूमीचे पवित्र कार्य कसे सोपविणार ? असा सवाल समितीचा आहे.

नाक्यावरची हंडी ईतर गोविंदांच्या स्पर्धेमुळे घाई घाईत फोडल्यासारखे लोढा यांनी झेंडावंदन करण्याची घाई करणे; हा प्रकार कितपत योग्य आहे ? हा तमाशा जेव्हा गिरगाव चौपाटी येथे चालू होता तेव्हा, दस्तूर खुद्द आशिष शेलार बिल्डर लोढा यांच्या सोबतच आले होते आणि बघ्याची भुमिका घेत हजर होते; म्हणून मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचे लोढा यांच्या कृत्याला समर्थन आहे का नाही? हे स्पष्ट करावे. गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळकांची समाधी असल्यामुळे पवित्र स्थळाच्या झेंडावंदनाला विशेष महत्व आहे. येथील कार्यक्रमाचे आयोजक लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती आहे. समितीची परवानगी न घेता झेंडावंदन केले. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा आणि लोकमान्य टिळकांचा अवमान झाला अशी समितीची भावना आहे.

लोकमान्य टिळक स्वराज्य भूमी स्मारक समितीची भाजपचे बिल्डर आमदार लोढा यांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे या अशाच अतिशय जहाल भाषेत लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. ‘असले थिल्लर उद्योग राष्ट्रभक्तांच्या मंदिरात केले जाऊ नये’ अशी कडक तंबी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष महोदयांनी या मंत्र्याला दिली जावी. अशी समितीची अपेक्षा आहे.

स्थानिक आमदार असुनही लोढा कधी जयंती, पुण्यतिथीच्या कार्यक्रमास हजर रहात नव्हते, आमंत्रणे देऊनही. “आमदार निधीतुन देणगी देतो”, असे सांगुन दिशाभुल करणे, ” मुख्यमंत्र्यांची भेट घडवुन आणतो” असे सांगुन स्वतःची प्रसिद्धी करुन घेणे, स्वराज्यभूमीचा शासन निर्णय बदलण्याचा नीचपणा करणे या गोष्टी या भाजपच्या या कारस्थानी पुढाऱ्याने सातत्याने केल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०२० साली लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी असताना स्वराज्यभूमी येथे कार्यक्रम न होण्यामागे मंगलप्रभात लोढा यांचेच कारस्थान असावे असा आम्हाला दाट संशय आहे. याची नि:पक्ष चौकशी झाल्यास सत्य बाहेर पडु शकेल. सध्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढ्या खालच्या थराला जातील असे आम्हाला मुळीच वाटत नाही.

असे समिती प्रमुख यांच्या सांगण्यानुसार आदी बाबी समितीने विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या लेखी तक्रार पत्रात नमूद करण्यात आल्या आहेत. भाजप दिल्ली हायकमांड आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आता लोढा यांच्यावर कोणती कारवाई करतात ? याकडे आता लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात चाललेली ही भाजपची अनागोंदी आणि भाजपची अंदाधुंदी कशी थांबेल ? कारण भाजप अनेक बोलघेवडे पुढारी राज्य पातळीवरील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना डचकत नाहीत, कोणी कुणाला विचारतही नाही आणि त्यांना त्यांची किंमत-आदर देखील नाही. असे चित्र असून दिल्लीतून मोदी-शहा जोडगोळीचा दट्ट्या आल्या शिवाय महाराष्ट्रातील वाचाळवीर आणि बेजबाबदार पुढारी ताळ्यावर येतच नाहीत,अशी सध्या राज्यात परिस्थिती आहे.

या कार्यक्रमाच्या ध्वजारोहणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्विकारली होती. यासंबंधात दक्षिण मुंबईतील दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाणे व बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘ड’ विभागाच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे समितीचे पदाधिकारी सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्षा करीत असताना ‘डी वाॅर्डच्या सहाय्यक आयुक्तांच्या संगनमताने या दोन भाजपच्या सदस्यांनी भारतीय सभ्यतेला काळीमा फासणारे कृत्य केले’, असा आरोप समितीचा आहे !

ध्वजारोहण ज्या वेळेला झाले त्या वेळेला पोलीस अधिकारी आणि पालिका अधिकारी यांनी लोढा यांची ही चूक-भूल वेळीच त्यांच्या लक्षात आणून का दिली नाही ? त्यावेळी हा सवाल उपस्थित मान्यवर करत होते. 1971 च्या भारतीय राष्ट्रध्वज अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार या घटनेला जबाबदार असलेल्या लोढा यांच्या सह अन्य अधिकारी वर्गावर कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई होईल याकडे राष्ट्रध्वज संहितेचा आदर करणारे आणि तिरंगा प्रेमींचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा 
नेमाडेंच्या वक्तव्याने समाजाचा आरसा स्पष्ट दिसला…
राहूल गांधी यांनी फ्लाइंग किस देताना मी पाहिले नाही; भाजपच्या खासदार हेमा मालिनी
एकनाथ शिंदे यांच्या माजी खासगी सचिवाला यूएलसीआर घोटाळाप्रकरणी ईडीकडून समन्स

देशासाठी नव्हे तर लोढा सारख्या बिल्डरसाठी काहीही करण्यास तयार असणार्‍यांच्या हातात महाराष्ट्र कितपत सुरक्षित राहिल, असा प्रश्न पडतो. राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रपुरुषाचा अवमान करणार्‍या लोढा या विधानसभा सदस्याचा राजीनामा का घेतला जाऊ नये ? आमदार, मंत्री, पालक मंत्री यांना विशेष अधिकार असतो म्हणुन सार्वजनिक ठिकाणी बेशीस्त वा बेकायदेशीर वर्तन करावे का ? राष्ट्रपुरुषाचे समाधीस्थान, राष्ट्रध्वज यांच्याबाबत आचारसंहितेचे पालन करणे हे विधानसभा सदस्यांचेच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरीकाचे कर्तव्यच आहे.

लोढा यांच्या अशा वागण्यामुळे, लोढा यांच्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार या भाजपच्या पुढार्‍यांची देखील लोकमान्य टिळकांवर खरोखर श्रद्धा आहे का ? आणि हि मंडळी भारतीय तिरंग्याचा मनापासून सन्मान करतात का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी