27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeमुंबईMeasles Outbreak in Mumbai : मुलांचे आरोग्य जपा; मुंबईत गोवरचा उद्रेक

Measles Outbreak in Mumbai : मुलांचे आरोग्य जपा; मुंबईत गोवरचा उद्रेक

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ करणारी बातमी समोर आली आहे. मुंबईमधील झोपडपट्टी भागात गेल्या काही दिवसात गोवर आजाराचा धोका वाढला आहे.

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ करणारी बातमी समोर आली आहे. मुंबईमधील झोपडपट्टी भागात गेल्या काही दिवसात गोवर आजाराचा धोका वाढला आहे. गोवरचे वाढते रुग्ण हा चिंतेचा विषय असून 61 बालकांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सहा बालकांना कृत्रिम प्राणवायूवर ठेवण्यात आले आहे. मुंबईत संसर्गजन्य गोवर आजाराचे आणखी 17 लहान मुलं सापडल्याने एकूण रुग्ण संख्या 126 वर पोहोचली आहे. या उद्रेकाची स्थिती पाहता केंद्र सरकारकडून याची दखल घेण्यात आली आहे. हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. गोवर हा विषाणूमुळे होतो जो सहज पसरतो आणि मुलांसाठी गंभीर आणि प्राणघातक ठरू शकतो.

एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू
मुंबईत गोवरच्या गंभीर आजार असलेल्या एक वर्षीय बालकाचा कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 10 नोव्हेंबर) या बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळाच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला त्यानंतर शनिवारी (ता. 11 नोव्हेंबर) प्रकृती आणखी गंभीर झाल्याने त्या बालकाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सोमवारी (ता. 13 नोव्हेंबर) दुपारी या बालकाचे निधन झाले. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत आणखीच भर पडली. त्याशिवाय प्रशासनही अधिक सतर्क झाले आहे. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

गोवर आजाराची कारणे
गोवर हा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे दिसू लागतात. तसेच गोवर आजार झालेल्या व्यक्तींच्या संपर्कांत जी व्यक्ती येईल तिला सुद्धा हा आजार होण्याची भीती असते. गोवर हा रोग एका विषाणूमुळे होतो. हा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर उष्ण वातावरणात फार काळ टिकून राहू शकत नाही. पण शीत वातावरणात तो बराच काळ टिकू शकतो. म्हणून हिवाळ्यात हा आजार जास्त पसरतो.

हे सुद्धा वाचा

Green Tea : जेवणानंतर लगेच ‘ग्रीन टी’ पिताय? सावधान!

Health Tips : थंडीच्या दिवसांत शरीर गरम ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन आवश्यक, वाचा सविस्तर

Health Tips : सदैव निरोगी राहण्यासाठी कोणत्या प्रकारचे अन्न खावे! जाणून घ्या एका क्लिकवर

गोवराचा रुग्ण पुरळ यायच्या चार ते पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. गोवराचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात. त्यानंतर ते रसग्रंथी, पांथरी, टॉन्सिल, तोंडाचा अंतर्भाग, श्वासनलिकांचे आतले आवरण, इत्यादी जागी पसरत जातात. सगळ्यात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकांच्या आतल्या भागात होतात. म्हणूनच गोवरमध्ये खोकला येतो. बऱ्याच वेळा पुढे श्वसन संबंधी आजार होऊ शकतात. त्वचेवर उठणारे पुरळ हे सूक्ष्म केशवाहिन्यांना येणा-या सुजेमुळे उठतात. कुपोषित मुलांमध्ये या आजाराने कुपोषणाची तीव्रता वाढते. कधीकधी विषाणूंमुळे मेंदूला सूज येते.

गोवर आजाराची लक्षणे
सर्दी, बारीक ताप, खोकला, डोळे लाल होणे तसेच तोंडावर गालावर लालसर ठिपके येतात व पुरळ येतात. ताप हळूहळू वाढत जाऊन त्यानंतर पूर्ण अंगभर कानाच्यामागे चेहरा, मान, छाती, पोट याप्रमाणे पुरळ येतात व शेवटी हातापायावर पसरतात पण कधीकधी पुरळ हातापायावर यायच्या आधीच गोवर कमी होतो. गोवराचे पुरळ ज्याप्रमाणे येतात त्याचप्रमाणे म्हणजे वरून खाली नाहीसे होतात. तोंडातील पुरळामुळे भूक मंदावते. खोकला मात्र थोडे दिवस टिकतो.

गोवर प्रतिबंधक लस
गोवराविरुध्द सर्वात चांगला उपाय म्हणजे प्रतिबंधक लस. ही लस शासकीय आरोग्यसेवेतूनही मिळते. म्हणून ही लस पहिल्या सहा महिन्यांनंतर 15 व्या महिन्यांत बाळाला द्यावी. लस टोचल्यावर 6 ते 10 दिवसांत थोडा ताप, अंगावर लाल पुरळ येतात. लसटोचणीनंतर आठवडयाभरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. कधीकधी एखादा झटका येण्याची शक्यता असते परंतु बहुतेक मुलांना काहीही त्रास होत नाही. ही लस अर्धवट मारलेल्या विषाणूंची बनलेली असते. या लसीमुळे कायमची प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे असंख्य मुलांचे आजारपण, मृत्यू यामुळे टाळता येतील.

मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना
पालिकेच्या माध्यमातून आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जिवनसत्व ‘अ’ देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसेच ९ महीने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाचे अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकार्‍यामार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी