29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमुंबईMumbai Measles : मशिदींमधून केली जाणार गोवर लसीकरणाची घोषणा

Mumbai Measles : मशिदींमधून केली जाणार गोवर लसीकरणाची घोषणा

मुंबईतील गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शहरातील मशिदींमध्ये लाऊडस्पीकरद्वारे लसीकरणाची घोषणा केली जाणार आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना याची माहिती मिळू शकेल. यासंदर्भात बीएमसीने मौलानांसोबत बैठकही घेतली आहे.

पूर्व उपनगरातील गोवंडी भागात गोवरचा सर्वाधिक फैलाव झाल्याचे दिसून आले आहे. येथील बहुतांश मुस्लिम कुटुंबांचा लसीकरणाबाबत नकारात्मक दृष्टिकोन आहे. मुस्लिमांना लसीबद्दल जागरूक करण्यासाठी बीएमसीने येथील मुस्लिम धर्मगुरुंसोबत बैठक घेतली. बीएमसीच्या आवाहनानंतर आता येथील सर्व मशिदींमधून लहान मुलांना लसीकरण करण्यात यावे, अशी घोषणा केली जाणार आहे. याबाबतची सुरुवात शुक्रवारी (ता. 18 नोव्हेंबर) नमाजानंतर करण्यात आली आहे. मुंबईतील आठ वॉर्डांपैकी (मुंबई) गोवरचा सर्वाधिक प्रादुर्भाव एम-पूर्व वॉर्डातील गोवंडी येथील झोपडपट्टी विभागात आहे. मुंबईत आतापर्यंत गोवरच्या 8 संशयित लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. यातील चार मुले गोवंडीतील होती. यासह गोवंडी परिसरात गोवर असलेल्या लहान मुलांपैकी एक तृतीयांश लहान मुले गोवरबाधित आढळून आले आहेत. मुंबईत सध्या 164 मुलांना गोवराची लागण झाली आहे. यांपैकी अनेकांनी लस घेतलेली नव्हती किंवा त्यांचे अर्धवट लसीकरण करण्यात आले होते.

बीएमसीच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, गोवंडीतील बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम आहे आणि येथील लोक मुलांचे लसीकरण करण्यास टाळाटाळ करत आहेत. लसीकरणाने आपल्या मुलांचे काहीतरी होईल, असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. या गैरसमजांना तोंड देण्यासाठी बीएमसी मुस्लिम धर्मगुरूंची मदत घेत आहे. बुधवारी खासगी डॉक्टरांसह मदरशांचे दरवाजे ठोठावल्यानंतर गुरुवारी एम-पूर्व प्रभाग कार्यालयात मौलानांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बीएमसीच्या आरोग्य विभागाने परिसरातील मशिदींच्या इमामांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते.

बैठकीत काय झाले ?
या बैठकीला 32 मशिदीचे मौलाना, विभागातील डॉक्टर्स संघटनेचे पदाधिकारी, WHO प्रतिनिधी, वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स संघटनेचे सरचिटणीस ‘उमा’चे सरचिटणीस डॉ. जाहिद खान व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद, डॉ. उपाली मित्रा यांनी उपस्थित मौलानांना गोवरविषयी माहिती दिली. या आजारावर लस किती परिणामकारक आहे हे समजावून सांगण्यात आले. मौलानांनी बीएमसीला शक्य ती सर्व मदत करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.

काय म्हणाले मौलाना ?
बैठकीला उपस्थित असलेले रफी ​​नगर कब्रिस्तान मशिदीचे मुफ्ती मोहम्मद सुभान अश्रफ म्हणाले की, बीएमसीने प्रथमच सार्वजनिक आरोग्याच्या उपक्रमासाठी मौलानांना सोबत सहभागी करून घेतले आहे. ते म्हणाले की, लसीबाबत मुस्लिमांमधील संभ्रम दूर करण्याचे काम केले जाईल. आम्ही मशिदींमधून लहान मुलांना लस देण्याची घोषणा करू. सुन्नी मोहम्मदी मशिदीचे इमाम मौलाना तौफिक आझमी मिसबाही म्हणाले की, त्यांनी बैठकीत बीएमसीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आवारात पसरलेल्या अस्वच्छतेकडे वेधले. तसेच पोलिओ, गोवर इत्यादी लसीकरणाबाबत समाजातील लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी सिने कलाकारांव्यतिरिक्त समाजातील धर्मगुरूंची मदत घेतली पाहिजे, हे काम आता बीएमसी- करत आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना परिसरातील प्रत्येक मशिदीच्या विश्वस्तांना पत्रे देण्यास सांगितले आणि मशिदींना जनजागृती करण्याचे आवाहन केले. या पत्रानंतर प्रत्येक मशिदीचे इमाम आपापल्या मशिदीतून बीएमसीकडून करण्यात आलेले हे आवाहन घराघरात पोहोचविण्याचे काम करतील.

हे सुद्धा वाचा

Measles Outbreak in Mumbai : मुलांचे आरोग्य जपा; मुंबईत गोवरचा उद्रेक

Mumbai News : मुंबईत पाळीव कुत्रे फिरवणाऱ्यांनी सावधान !

Green Tea : जेवणानंतर लगेच ‘ग्रीन टी’ पिताय? सावधान!

मुख्यमंत्र्यांनी घेतला गोवर रोग नियंत्रणाचा आढावा
गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणले पाहिजे. या सूचनेसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध धर्मगुरूंची मदत घेण्याच्या सूचनाही बीएमसीला केल्या आहेत.

900 हून अधिक लसीकरण केंद्रे उघडली
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत गोवर प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईत गोवर रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लसीकरणासाठी 900 हून अधिक केंद्रे उघडण्यात आली असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यासोबतच मुलांना ‘व्हिटॅमिन ए’च्या गोळ्या देण्यात येत असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी