न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही जे होत नाही, ते आज झाले. मुंबईत किमया झाली. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), फोर्ट परिसर, मरोळ-अंधेरीसह अर्धी मुंबई फेरीवालामुक्त झाली आहे. सीएसएमटीबाहेर बेशिस्त टॅक्सीवाल्यांचाही गोंगाट आज नाही. ही सारी परिस्थिती पाहून चाकरमानी मुंबईकर सुखावला आहे. मोदीजी रोज मुंबईत या, रोज उद्घाटने करा, मुंबईकरांचे चालणे सुसह्य करा, अशीच जणू मुंबईकरांची भावना झालीय. (Modiji Come To Mumbai EveryDay)
सीएसएमटी, फोर्ट परिसरासह मरोळ भागातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्याची आज किमया साधली गेली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे! आज पंतप्रधान मुंबईत येत आहेत. दुपारी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबईहून सोलापूर व शिर्डी येथे जाणाऱ्या दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना झेंडा दाखविणार आहेत. हा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान मारोळ येथे अलजामिया टस सैफिया शैक्षणिक संस्थेच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करण्यासाठी जातील. त्यामुळे पंतप्रधानांना मुंबई फेरीवालामुक्त, छान, सुंदर दिसावी; हेरिटेज परिसर प्रसन्न दिसावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनासह पोलिस यंत्रणेचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. एरव्ही चिरीमिरी आणि हफ्ते घेऊन महापालिका अधिकारी व पोलिस यंत्रणा हेरिटेज वास्तूचा विचार न करता फेरीवाल्यांना रस्त्यावर बसू देतात, बसवतात, असे आरोप सातत्याने होतात. आज मात्र या भ्रष्ट आरोपांच्या गर्तेतील यंत्रणा अतिशय कार्यक्षम झाल्या आहेत. काहीही असले तरी रस्ते, फूटपाथ यांनी मोकळा श्वास घेतल्याने मुंबईकर सुखावला आहे. मुंबईतील महापालिका निवडणूकपूर्व प्रचार दौरा आटोपून आज सायंकाळी पंतप्रधान शहरातून रवाना होईपर्यंत तरी मुंबईकरांना मोकळे रस्ते व मोकळ्या फूटपाथचे भाग्य लाभणार आहे.

कर अदा करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचे चालणे सुसह्य करण्याऐवजी फूटपाथवर दुकाने उभारण्यास परवानगी देणाऱ्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाची उच्च न्यायालयाने परवाच बिनपाण्याने चंपी केली होती. सर्वसामान्य नागरिकांच्या चालण्याच्या वाटा अडवून वरळीतील टिळक रुग्णालयाबाहेर फेरीवाल्यांची सोय करू पाहणाऱ्या पालिका प्रशासनाने या परवानगीचा पुनर्विचार करावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले. फूटपाथवर फेरीवाल्यांना दुकाने थाटण्याची परवानगी देत पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका, असे न्यायालयाने सुनावले होते. पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देत वाहतूक सुरळीत करणे हा फूटपाथचा उद्देश असतो. पालिका प्रशासन या फूटपाथवरच फेरीवाल्यांना बसवू पाहत असेल तर फूटपाथचा मूळ उद्देशच नष्ट केला जात असल्याची खंत हायकोर्टाने व्यक्त केली होती. फूटपाथ हे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी नव्हे तर चालणाऱ्यांसाठी, पादचाऱ्यांच्या सोयीसाठी असतात, अशा शब्दात हायकोर्टाने पालिका अधिकाऱ्यांचे कान उपटले होते.
Flagging off of Mumbai – Solapur Vande Bharat Express & Mumbai – Sainagar Shirdi Vande Bharat Express by Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji@RailMinIndia #AmchiVande #VandeBharat pic.twitter.com/HNfbUr7ZhC
— Central Railway (@Central_Railway) February 10, 2023
शैक्षणिक संस्था, प्रार्थनास्थळ आणि रुग्णालयांपासून 100 मीटर अंतरात फेरीवाल्यांना सक्त मनाई आहे. तरीही पोलिस आणि महापालिका यंत्रणा न्यायालयीन आदेशांचे पालन करीत नाही. अनेक ठिकाणी या भ्रष्ट यंत्रणा नगरसेवक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मदतीने चिरीमिरीची चिंधीगिरी करत असतात. त्यातून सर्वसामान्य नागरिकांना चालण्यासाठी फूटपाथच उपलब्ध राहत नसल्याने त्यांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागते. सीएसएमटी आणि फोर्ट परिसरात तर फेरीवाल्यांनी अक्षरक्ष: उच्छाद मांडला आहे. त्यामुळे या परिसरात यायला जीव नकोसा होतो. स्थानिक रहिवाशी व वैध, कर भरणारे व्यावसायिकही त्यामुळे हैराण आहेत. जोडीला बेशिस्त टॅक्सीवाल्यांचा गोंगाट असतो. त्यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा होत असतो. सीएसएमटीच्या हेरिटेज वास्तूबाहेरच रात्री तर वेश्याव्यवसायालाही ऊत येतो. पालिका इमारतीसमोर, पोलिसांच्या साक्षीने हे सारे धंदे सुरू असतात.

हे सुद्धा वाचा :
- वंदे भारत एक्सप्रेस का आहे खास, ते जाणून घ्या…
- मुंबई शिर्डी प्रवास होणार वेगवान अन् आरामदायी; राज्यात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस
- परप्रांतातून येणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे
मोदीजी रोज मुंबईत या, मुंबई फेरीवालामुक्त होऊन जाऊ द्या ..
या सर्व पार्श्वभूमीवर, मुंबईच्या फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून ते दिव्यांग, वयोवृद्धांसह सर्वसामान्य पादचाऱ्यांना चालण्यायोग्य करा, असे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच पुन्हा एकदा दिले आहेत. खरेतर हायकोर्टाने यापूर्वीही वारंवार बृहन्मुंबई महानगरपालिकेला फूटपाथ मोकळे करण्याचे आदेश दिले होते. मात्र, भ्रष्ट पालिका अधिकारी आणि पोलिस यंत्रणेची ती इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी फूटपाथ मोकळे करवून घेण्यासाठी या यंत्रणांनी जी कार्यपद्धती, मॉडेल अवलंबले, त्याच धर्तीवर एरव्हीही मुंबईतील सारे फूटपाथ मोकळे करून घेतले पाहिजेत. न्यायालयानेच तसे निर्देश द्यायला हवेत. मुंबईतील एकही रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नसल्याने फूटपाथवरील अतिक्रमण रोखण्याबाबत पालिका प्रशासन काय उपाययोजना करणार आहे, त्याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र 1 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. बेकायदा फेरीवाल्यांमुळे मुंबईतील सर्वच फूटपाथचा गळा घोटाला गेला आहे, रस्ते अरुंद झाले आहेत. नागरिकांना फूटपाथवरुन चालणे अशक्य झालेले आहे. वयोवृद्ध तसेच अपंग नागरिकांना प्रामुख्याने यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे न्यायालयाने पालिकेच्या बिनडोक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. अपंग आणि वयोवृद्धांना कोणत्याही अडथळे, अडचणींशिवाय फूटपाथवरुन चालणे शक्य व्हावे, यासाठी कोणते नियम लागू करता येतील, त्याचाही विचार करण्याचे आदेश हायकोर्टाने बथ्थड आणि भ्रष्ट अशा महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.