30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरमुंबईभारतीय नौदल कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज : व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादुर...

भारतीय नौदल कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज : व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादुर सिंग

देशाच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज आहे. राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी व राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यासाठी नौदलाच्या पश्चिम विभागातर्फे सर्वत्र लक्ष ठेवले जात आहे. सागरी हिताच्या व संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून भारतीय नौदल कोणत्याही प्रकारच्या प्रसंगाचा सामना करण्यासाठी नेहमीप्रमाणे सज्ज असल्याची माहिती नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख,व्हाईस अ‍ॅडमिरल (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ ) अजेंद्र बहादुर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. सागरी हिताच्या सर्व क्षेत्रांमध्ये नौदलाच्या पश्चिम विभागातर्फे जहाजे, पाणबुड्या आणि विमाने तैनात असून मानवरहित विमाने देखील सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी तैनात असल्चाची माहिती त्यांनी दिली.

नौदल दिवस रविवारी ४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्राने सज्ज असलेल्या अत्याधुनिक युध्दनौका आयएनएस विशाखापट्टणमवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
केवळ समुद्र किनारे नव्हे तर खोल समुद्रात देखील होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर नौदलाचे बारीक लक्ष असते. त्यासाठी विविध युध्दनौका, पाणबुड्या व विमानांचे सहाय्य घेतले जाते. नौदलातर्फे विविध प्रसंगांमध्ये मानवतावादी सहाय्य पुरवले जाते. तसेच आपत्तीमध्ये देखील बचावाचे काम केले जाते, त्याबाबत व्हाईस अ‍ॅडमिरल सिंग यांनी माहिती दिली.
भारतीय नौदल हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक बनले आहे. श्रीलंका, मालदीव, सेशेल्स, मॉरिशस, बांगलादेश, ओमान आणि इतर बंदरांवर भारतीय नौदलाच्या विविध युध्दनौकांनी सद्भावना व परस्पर सामंजस्य वाढण्याच्या हेतूने भेट दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.

आझादी का अमृत महोत्सव ( स्वातंत्र्याची ७५ वर्षे) साजरे करण्याचा भाग म्हणून या वर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी पश्चिम आशिया मधील मस्कत व ओमान, पूर्व आफ्रिकामधील दार-एस-सलाम व टांझानिया आणि दक्षिण अमेरिकेतील रिओ दि जानेरो व ब्राझील येथे युध्दनौका तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.किनारपट्टी सुरक्षा, सागरी सुरक्षा, अग्निवीर, तीव्र हवामानात काम करण्यासाठी एसओपी, समुद्रमार्गे अंमली पदार्थांची तस्करी, स्वदेशी युद्धनौकांचे उत्पादन, भविष्यातील अधिग्रहण यासह इतर विषयांवर व्हाइस अ‍ॅडमिरल एबी सिंग यांनी आपली मते मांडली.
हे सुध्दा वाचा

शिवसेना खासदार-भाजप आमदार यांच्यात खडाजंगी !

केरळमध्ये आरएसएसच्या 11 कार्यकर्त्यांना जन्मठेप; घरात घुसून केली होती सीपीएम कार्यकर्त्यांची हत्या

उदयनराजे भोसले इतके हतबल झालेले मी गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा पाहतोय : अनिल गोटे

भारतीय नौदलातर्फे दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. 1971 च्या भारत-पाक युध्दादरम्यान नौदलाने केलेल्या दैदीप्यमान इतिहासाचे स्मरण करण्यासाठी नौदल दिन व नौदल सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो.
यानिमित्त नौदलातर्फे संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेट वे ऑफ इंडिया येथे नौदलातर्फे प्रात्यक्षिके केली जातात व नौदलाच्या सज्जतेचे दर्शन घडवले जाते. नौदलाच्या हेलिकॉप्टरांद्वारे केली जाणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके व नौदलाच्या जवानांकडून केली जाणारी प्रात्याक्षिके श्वास रोखून ठेवायला लावणारी असतात.

नौदल सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील २० शाळांमधील ४ हजार विद्यार्थ्यांना नौदलाच्या युध्दनौकेची सफर घडवण्यात आली. त्यामध्ये एन.सी.सीचे विद्यार्थी, सैनिकी शाळा, रोटरी शाळा, तसेच सरकारी ,खाजगी शाळांमधल्या आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, इंडियाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. भारतीय नौदलाच्या कार्याची ओळख यावेळी विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली. नौदलाच्या ताफ्यातली पृष्ठभागावरून हवेत आणि पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि जहाज , पाणबुड्या आणि विमानांद्वारे प्रक्षेपित केलेल्या टॉर्पेडोसह विविध शस्त्रे दाखवून त्यांना त्याची माहिती देण्यात आली. नौदलाने केलेल्या विविध मोहिमा आणि सागरी जीवनावर भाष्य करणारा चित्रपट यावेळी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!