गणेशोत्सवाच्या काळात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. शिवाय नवसाला पावणार्या गणेशाची आराधना करण्यासाठी अनेक तास रांगेत असतात. परिणामी घरी परतण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसल्याने गणेश भक्तांचे हाल होतात. त्यामुळे १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे २४ तास सुरू ठेवाव्यात, तसेच कोकण हायवेवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दोन अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासंदर्भात डॉ. आव्हाड रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले आहे. एरव्ही रात्री १ नंतर मुंबईतून कर्जत आणि कसार्याच्या दिशेने जाणार्या रेल्वेगाड्या बंद करण्यात येत असतात. या गाड्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास सुरू होतात. त्यामुळे अनेक प्रवाशांची कुचंबणा होत असते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधील गणेशभक्त मुंबईत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
रात्री उशिरानंतर त्यांचे परतीचे मार्ग रेल्वे बंद झाल्याने खुंटतात. हा भाविक वर्ग सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने जादा पैसे खर्च करून घरी परतणे त्यांच्यासाठी अवघड असते. परिणामी त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी कोलकात्यात नवरात्रोत्सवात ज्या पद्धतीने दिवस- रात्र रेल्वे सेवा सुरू ठेवतात. त्याच धर्तीवर मुंबई आणि उपनगरात सबंध रात्रभर रेल्वे वाहतूक सुरू ठेवावी, अशी मागणी केली असल्याची माहिती डॉ. आव्हाड यांनी दिली.
दरम्यान, कोकणात रस्ते मार्गाने जाणे अत्यंत अवघड झाले आहे. खड्डयांमुळे अपघात होणे, वाहतूक कोंडीत अडकणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळेच रविवारपासून (दि.१७) रेल्वेने दोन अतिरिक्त गाड्या सोडाव्यात, अशीही मागणी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली.
…म्हणजे आम्हाला मारणार ना?
सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांना 2024 मध्ये मोक्ष मिळेल, असे विधान रामदेव बाबाने केले आहे. याबाबत आव्हाड यांना विचारले असता, रामदेव बाबाला धार्मिक विषयावर महत्व देणे चुकीचे ठरेल. पण, मोक्ष देणार म्हणजे आम्हाला मारणार का?, असा सवाल करून डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सनातन धर्माच्या विचारांनीच या देशाला रसातळाला नेले आहे. म्हणून आमचा सनातन धर्माला विरोध आहे.
हे सुद्धा वाचा
मराठवाड्यातील जनतेसाठी सरकारची ४५ हजार कोटींची मोठी गिफ्ट
मविआ सरकारची कामगिरी भाजप सरकारपेक्षा चांगली; नाना पाटोलेंनी दाखवला प्रूफ
अखेरीस लालबागच्या राजाचे दर्शन! मूर्ती पाहताच प्रसन्न होईल मन..
सनातन धर्माची बाजू घेणाऱ्या लोकांना आपले काही प्रश्न आहेत, त्याची त्यांनी उत्तरे द्यावीत. ” चार्वाक, बसवेश्वर यांना कोणी मारले? छत्रपती शिवाजीमहाराज यांचा राज्याभिषेक कोणी नाकारला? महात्मा जोतिराव फुले यांच्यावर मारेकरी कोणी धाडले? स्रि शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे कोणी मारले? सती प्रथेविरोधात लढणाऱ्या राजा राममोहन राॅय यांच्यावर तलवार उगारणारे कोण होते? राजर्षी शाहूमहाराज यांच्या बदनामीचा आणि त्यांना ठार मारण्याचा कट रचणारे कोण होते.? विशिष्ट जात समुहाला पाणी पिण्यापासून रोखणारे कोण होते? हे सर्व कृत्य करणारे सनातनी धर्माचे पाईक होते ना! त्यांना आपण विरोध करतच राहणार आहोत. भले आम्हाला मोक्ष देण्याची भाषा केली तरी बेहत्तर, अशा शब्दांत डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी रामदेव बाबांचा समाचार घेतला.