30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला मोर्चा म्हणजे निव्वळ ढोंग : नाना...

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला मोर्चा म्हणजे निव्वळ ढोंग : नाना पटोले

टीम लय भारी 

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आज भाजपने मंत्रालयावर मोर्चा काढला. या मोर्चात भाजपने राज्यसरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधलाय.(Nana Patole criticizes BJP workers over OBC reservation)

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने मंत्रालायावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे असे भाजपा नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा, असा घणाघाती हल्ला  नाना पटोले यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजप सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे. त्यामुळे भाजपाला ओबीसींच्या आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आरक्षण संपवणे हेच भाजपा व त्यांची मातृसंस्था आरएसएसचा अजेंडा असून मंत्रालयावरील भाजपाचा मोर्चा म्हणजे केवळ ‘नौटंकी’ आहे.

‘पाच वर्षे फडणवीस सरकारने झोपा काढल्या’

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोर्चावेळी भाजपा नेत्यांनी केलेली विधाने ही अत्यंत हास्यास्पद व बालिश होती. सत्तेच्या लालसेने पछाडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी लोकांना ‘मसनात’ पाठवण्याची भाषा केली ही मग्रुरी असून भाजपाचे लोकच अशी भाषा वापरू शकतात. ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याची सुरुवात झाली तीच मुळी २०१७ साली. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका फडणवीस सरकारने एक साधे परिपत्रक काढून पुढे ढकलल्या आणि प्रकरण चिघळले. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले त्यादरम्यान ओबीसी आरक्षण वाचावे म्हणून फडणवीस सरकारने कोणतीही हालचाल केली नाही. पाच वर्षे फडणवीस सरकारने झोपा काढल्या आणि आता मात्र ओबीसी आरक्षणाचे खापर महाविकास आघाडीवर फोडू पहात आहेत.

‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खरा मारेकरी भाजपाचाच’

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी सरकारही प्रयत्नशील आहे. विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वत: जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव मांडून तो संमत करून घेतला. जातीनिहाय जनगणना झाली तर असे वाद निर्माणच होणार नाहीत परंतु केंद्रातील भाजपा सरकार त्यावर निर्णय घेत नाही. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस भाजपाच जबाबदार आहे. धनगर समाजाला पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन देणारा व नंतर पाच वर्ष त्यांना झुलवत ठेवणारा पक्षही भाजपाच आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे ही भाजपा सोडता सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खरा मारेकरी भाजपाच असून आता आंदोलन करत ‘मगरीचे अश्रू’ ढाळत आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.


हे सुद्धा वाचा : 

केंद्र सरकारने इंधनावरील कमी केलेला दर म्हणजे ‘आवळा देऊन कोहळा’ काढण्याचा प्रकार : नाना पटोले 

‘बंजारा व भटक्या विमुक्त वर्गाच्या समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ’ नाना पटोले यांचे आश्वासन

राजकीय द्वेषापोटी फोन टॅपिंग; खरा सुत्रधार कोण हे उघड व्हावे : नाना पटोले

भाजपा राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे : नाना पटोले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी