यंदा आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर होणार आहे. आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. स्वराज्यासाठी जीवावर उदार होऊन शिवरायांनी ज्या किल्ल्यातून साहस व चातुर्याने सुटका करवून घेतली, त्या किल्ल्याच्या भिंती इतिहासाच्या जागराने रोमांचित होणार आहेत. (Agra Fort Shiv Jayanti)
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची 393वी जयंती साजरी होत आहे. गेली अनेक राज्यातील अनेक शिवप्रेमी, सामाजिक संस्थां आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी व्हावी म्हणून प्रयत्नशील होत्या. या सर्वांच्या अथक प्रयत्नातून यंदा ऐतिहासिक योग जुळून आला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने यंदा प्रथमच आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ निनादणार आहे.

अनेक शिवप्रेमी सामाजिक संस्थांनी आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मोदी सरकारकडे केली होती. मात्र, मोदी सरकारच्या अखत्यारितील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ऑर्किऑलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया) या संस्थांना आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर त्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.
आजवर केवळ शिवप्रेमी सामाजिक संघटनांना आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करता येत नव्हता. मात्र, सहआयोजक म्हणून महाराष्ट्र शासन असल्याने शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने परवानगी द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. शिवजयंती उत्सवात खोडा घालणाऱ्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाला राज्य सरकारने पत्र लिहून शिवप्रेमी सामाजिक संस्थांच्या साथीने महाराष्ट्र शासन शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार, शिवप्रेमींना आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास अनुमती द्यावी, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले होते.
पुरातत्त्व खात्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे रखडलेला सुवर्णयोग न्यायालयाच्या दणक्यामुळे कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच जुळून आला आहे. आग्रा येथील याच किल्ल्यात शिवछत्रपतींनी बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्याच किल्ल्याच्या ‘दिवाण-ए- आम’ मध्ये आता त्यांचे स्मरण करण्याची संधी शिवप्रेमींना मिळणार आहे. यंदाच्या शिवाजयंती उत्सवात आग्रा किल्ल्याच्या आसमंतात शिवछत्रपतींचा जयजयकार घुमणार आहे. त्यादृष्टीने यंदाची शिवजयंती विशेष ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा :
शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर यंदा हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका; संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान
या सोहळ्यामुळे आग्रा येथील ऐतिहासिक ठिकाणी मराठी जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची पर्वणी मिळणार आहे. न्यायालयाच्या निर्देशामुळे, सामाजिक संस्थांच्या पुढाकाराला सहआयोजक म्हणून महाराष्ट्र शासनाची साथ आता लाभणार आहे. दरम्यान, न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. शिंदे यांनी महाराष्ट्रातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय तसेच भारतीय पुरातत्व खात्याचेही आभार मानले आहेत.
Agra Fort Shiv Jayanti, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Utsav Agra Fort, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, Jayanti Utsav Agra Fort Diwan A Aam, Shivaji Maharaj History Thrill