RSS-BJPवाले माझे गुरु आहेत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रा यशस्वी केल्याबद्दल त्यांनी भाजप, संघाचे आभारही मानले आहेत. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा ही आरएसएस-बीजेपीमुळेच अत्यंत यशस्वी होऊ शकली, असेही राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
RSS BJP Guru, Bharat Jodo Yatra Yashasvi, Rahul Gandhi Thanks
भारत जोडो यात्रा देशभरात यशस्वी असल्याची घोषणा करताना राहुल गांधी यांनी आरएसएस-भाजपची फिरकी घेतली. उपहासात्मक स्वरात त्यांनी संघ-भाजपचे आभार मानले. या लोकांना मी गुरु मानतो, कारण ते उत्तम प्रशिक्षण देत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, आरएसएस–भाजपवाले आम्हाला लक्ष्य करून कोणत्या ना कोणत्या मार्गाने आम्हाला जणू मदतच करत असतात.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “काश्मीर ते कन्याकुमारी अशी देशभराची ओळख करवून देणारी एक सामान्य प्रवास यात्रा म्हणून मी भारत जोडो यात्रा सुरू केली. नंतर मात्र या प्रवासाशी देशाचा आवाज आणि भावना जुळत गेल्याचे हळूहळू लक्षात आले. विशेषतः आरएसएस आणि भाजपच्या लोकांचे आभार मला मानायलाच हवेत. कारण त्यामुळेच या यात्रेत देशाचा आवाज अधिक बुलंद होत गेला. भारतातील जनतेच्या भावना त्यामुळे यात्रेशी जोडल्या गेल्या. ही संपूर्ण देशाची यात्रा बनली. आरएसएस-भाजपवाले जितके जास्त टीका, आरोप करतात, तितकी आम्हाला सुधारण्याची संधी मिळते. त्यांना काँग्रेसची विचारधारा अधिक चांगल्या प्रकारे समजावी म्हणून त्यांनी अधिक जोमाने टीका करावी, अशी माझी इच्छा आहे. मी आरएसएस-भाजपला गुरू मानतो, कारण ते मला मार्ग दाखवत आहेत. काय करायला हवे आणि काय करायला नको, यांचे ते फुकटात सल्ले देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. ते किती मोलाचे काम करत आहेत, हे त्यांनाच ठावूक नसेल कदाचित!”

मायावती, अखिलेश यांनाही देशात प्रेमच हवे
राहुल गांधी यांची यात्रा 3 जानेवारीला उत्तर प्रदेशात पोहोचणार आहे. मायावती आणि अखिलेश यादव यांनी या यात्रेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. याबाबत राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षांचे सर्व नेते आमच्या पाठीशी उभे आहेत. ज्यांना भारत जोडायचा आहे, त्यांच्यासाठी भारत जोडो यात्रेचे दरवाजे खुले आहेत. भारत जोडो यात्रेत येण्यास आम्ही कोणालाही रोखणार नाही. मायावती आणि अखिलेश यांनाही भारतात प्रेमच हवे आहे, द्वेष नाही.
हे सुद्धा वाचा :
भारत जोडो यात्रा : बाळासाहेब थोरात यांचे परफेक्ट मॅनेजमेंट
राहुल गांधींना थंडी का वाजत नाही?
VIDEO : गुजरातचा निकाल देशासाठी धोकादायक; लय भारीचे संपादक विक्रांत पाटील यांनी केलेले विश्लेषण
त्यांच्या नेत्यांसाठी आणि माझ्यासाठी सुरक्षेचा प्रोटोकॉल वेगळा कसा?
काँग्रेस पक्षाने सुरक्षेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत राहुल गांधी म्हणाले की, “त्यांचे” ज्येष्ठ नेते बुलेट प्रूफ वाहनातून बाहेर पडतात, तेव्हा कुणी तक्रार करत नाही. “त्यांच्या नेत्यांनी” रोड शो केले, ते खुल्या जीपमधून गेले, हे सारेही प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. मग त्यांच्यासाठी वेगळा प्रोटोकॉल आणि माझ्यासाठी वेगळा, असे कसे कसे असू शकते? माझ्या सुरक्षेसाठी काय करावे आणि काय करू नये, हे सीआरपीएफला चांगलेच माहीत असल्याचेही राहुल यांनी स्पष्ट केले.
RSS BJP Guru, Bharat Jodo Yatra Yashasvi, Rahul Gandhi Thanks