बंगळुरू, कर्नाटकात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तिथे पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. बंगळुरू शहरात अंडरपासमध्ये कार अडकल्याने इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या महिला आयटी इंजिनियरचा मृत्यू झाला. यासह गेल्या दोन दिवसांत विविध घटनांत एकूण पांच जणांचा कर्नाटकातील मुसळधार पावसाने बळी घेतला आहे. बेंगळुरू आणि ओल्ड म्हैसूर भागात गारपीट, मेघगर्जना आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले.
मुसळधार पावसामुळे अंडरपासबाहेरील प्रतिबंधात्मक बॅरिकेडस् खाली पडले आणि चालकाने पाण्याने भरलेला अंडरपास ओलांडण्याची जोखीम पत्करली. अंडरपासमधील पाण्याची पातळी लक्षात न घेता कार चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या मध्यभागी कार आल्यानंतर पाण्यात जवळपास बुडाली. नंतर कारचे इंजिन बंद पडले.

☝️ हीच ती महिंद्रा झायलो कार, जी चालकाने निष्काळजीपणे, तुडुंब पाणी असूनही केआर सर्कल अंडरपासमध्ये घुसविली आणि कारमधील भानू रेखा या इन्फोसिस कंपनीत आयटी इंजिनियर असलेल्या 23 वर्षीय तरुणीला कुटुंबाच्या डोळ्यादेखत जीव गमवावा लागला. रेखा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील होती. ती भाऊ संदीपसह बेंगळुरूमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होती.

☝️ हाच तो केआर सर्कल अंडरपास ज्यामध्ये अडकलेल्या झायलो कारमधील रेखा या तरुणीचा मृत्यू झाला. ती भाऊ व आईसह बेंगळुरूमधील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी भाड्याची कार घेऊन फिरत होते. या तिघांसोबत एक वृद्ध आणि दोन लहान मुली असे इतर तिघे नातेवाईकही होते. पाण्याने भरलेल्या केआर अंडरपासमधून पुढील एक ऑटो आणि एक कार जाताना पाहून झायलो चालकाने कार आत घातली. मात्र, कार पाण्यात शिरताच तिचे इंजिन बंद पडले आणि दारे लॉक झाली.कार पाण्यात पूर्ण बुडाल्यानंतर ड्रायव्हरने खिडकीच्या काचेवर लाथ मारून काच फोडली व तो बाहेर पडला आणि मदतीसाठी ओरडू लागला. संदीपही बाहेर आला. त्यांनी रेखासह कारामधील इतर पाच जणांना बाहेर काढले. त्यावेळी भानू रेखा बेशुद्ध पडली होती. तिला ऑटोरिक्षातून सेंट मार्था हॉस्पिटलमध्ये हलवले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

☝️ आयटी इंजिनियर तरुणीला जीव गमवावा लागलेल्या केआर सर्कल अंडरपासबाहेर पोलिसांनी नंतर बॅरिकेड्स लावले. पोलिसांनी आधी पाणी साचताच हा अंडरपास वाहतुकीला बंद केला असता तर रेखाचा जीव वाचू शकला असता. रेखाचा भाऊ संदीपने बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला कारचालक हरीश गौडा आणि महापालिका अधिका-यांवर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चालक हरीशला अटक केली. मात्र, नंतर कोर्टाने त्याला जामिनावर सोडले.

☝️ केआर अंडरपासमध्ये अडकलेली झायलो कार बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या मदत पथकाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सर्व अंडरपासचे ऑडिट करण्याचे बंगलोर महापालिका BBMP आयुक्त तुषार गिरी नाथ यांनी जाहीर केले. जे अंडरपास वापरण्यास योग्य नाहीत ते बंद केले जाणार आहेत. या अंडरपासमधून पाण्याचा निचरा स्टॉर्मवॉटर ड्रेनमधून सुरळीत करण्यासाठी निर्देशही त्यांनी अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार शहरातील 18 अंडरपासवर आता अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडले. | फोटो क्रेडिट: गुगल☝️ बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडले. बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. बुधावरनंतर त्याची तीव्रता कमी होईल. 24 आणि 25 मे रोजी हलका ते मध्यम पाऊस आणि काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या दिवसात आकाश साधारणपणे ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 आणि 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
☝️ बंगळुरूला गारपीट आणि मुसळधार पावसाचा फटका बसला, ज्यामुळे शहरातील काही भागात पाणी साचले. पावसामुळे शहरातील अनेक भागातील रहिवाशांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले. असंख्य ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शहरात झालेला पाऊस हा मान्सूनपूर्व असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विदर्भापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत व दक्षिण-आंतरीक कर्नाटकावर पाऊस अधिक सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
☝️ बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने एक जुनी इमारत जमीनदोस्त केली. ही सिमेंटची इमारत पावसाने जणू मूळापासून म्हणजे पायापासूनच उखडून काढलेली दिसते. सध्या ही दुमजली इमारत कललेल्या अवस्थेत आहे.
हे सुद्धा वाचा :
सततचा पाऊस नैसर्गिक आपत्तीत अनेक किचकट, तांत्रिक अटींचा महापूर
प्राजू कुठे आहेस ?..काय धुकं काय पाऊस;काय डोंगर; लय मज्जा..हाय !
तुमच्या भागात वीज पडणार असल्याची माहिती देणार दामिनी अॅप

☝️ केपी अग्रहाराजवळ जोरदार वादळामुळे चुकून नाल्यात चुकून पडून 31 वर्षीय लोकेश कुमार या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उशिरा पोलिसांना सापडला. केपी अग्रहारा येथील रहिवासी लोकेश कुमार हा एका खाजगी कंपनीत हाऊस किपिंग कर्मचारी होता. लोकेश आई-वडील आणि मोठ्या भावासोबत राहत होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तो मित्रांसोबत बाहेर गेला होता. दुर्दैवाने, तो केईबी कार्यालयाजवळील नाल्यात पडला आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेला. घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह हाती लागला.
या घटनांबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत नुकसानभरपाई जाहीर केली आहे.