29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीमुळेच विजेचा खेळखंडोबा सुरु आहे : प्रवीण दरेकर

महाविकास आघाडीमुळेच विजेचा खेळखंडोबा सुरु आहे : प्रवीण दरेकर

टीम लय भारी 

मुंबई : राज्यातील वीजटंचाईच्या समस्येला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे.याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे हजारो कार्यकर्ते राज्यभर वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक देतील, व देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणाखाली लादलेले भारनियमन संपूर्ण मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी घोषणा प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. (Praveen Darekar says power shortage due to Mahavikas Aghad)

दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भाजप पक्षाने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.

दरेकर  यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकेची झोड उठविताना सांगितले की, गेल्या सुमारे तीन आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे.

राज्यातील सुमारे २७ वीजनिर्मिती संयंत्रे बंद किंवा जेमतेम चालवली जात आहेत. विजेची मागणी कमी असतानाच्या काळात करावयाची देखभाल दुरुस्तीची कामे ऐन उन्हाळ्यात हाती घेऊन सरकारने वीजटंचाईच्या समस्येत भर घातली आहे. सामान्य ग्राहकाचे वीजबिल थकल्यानंतर त्याची वीज कापणाऱ्या आणि थकबाकीचे कारण देत भारनियमन लादणाऱ्या सरकारच्या अनेक खात्यांकडेच वीजबिलाची हजारो कोटींची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाल्याचे दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.

सरकारच्या बेशिस्तीमुळे वीज मंडळाचा कारभार ढासळला असून आर्थिक बेशिस्तीला आळा घालण्यासाठी एक अभ्यास गट नेमण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने सरकारला चार महिन्यांपूर्वी केली होती. अद्याप अशा अभ्यास गटाची नियुक्तीच झालेली नसल्याची माहिती मिळत असून वीज मंडळ मोडीत काढण्यासाठीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोपही विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली, असा आरोपही त्यांनी केला.

कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आता भारनियमनाऐवजी देखभाल दुरुस्तीचे कारण देत वीज वितरणच बंद ठेवून जनतेला वेठीस धरले जात आहे. कमाल मागणीच्या वेळात सुमारे सहा हजार मेगावॅट विजेचा तुटवडा असताना अन्य क्षेत्रातून जेमतेम १३०० मेगावॅट वीज खरेदी केली जात आहे. सरकारने खरेदी केलेल्या विजेचे पैसेही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी खाजगी क्षेत्राकडून वीज नियामक आयोगाकडे केल्या जात असल्याने राज्य सरकारची पत संपुष्टात आली आहे. एकीकडे थकबाकी वाढत असताना विशिष्ट खाजगी पुरवठादारांशी हातमिळवणी करून चढ्या दराने वीज खरेदी करावयाची आणि त्याचा भार ग्राहकाच्या माथ्यावर मारून टक्केवारीचे राजकारण करावयाचे असा वसुली सरकारचा हेतू असेल तर तो हाणून पाडला जाईल असा इशाराही विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.

खाजगी क्षेत्राकडून वीज खरेदीच्या दरावर केंद्र सरकारने मर्यादा घातल्याने राज्य सरकारमधील हितसंबंधीयांची कोंडी झाली असून टक्केवारीच्या राजकारणात अडथळे येत असल्याने त्यांचा जळफळाट सुरू आहे. त्यामुळेच कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेला वीजसंकटात ढकलले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. सरकारी कार्यालयांची बिले थकविणारे व ग्राहकांची लुबाडणूक करणारे आघाडी सरकार हेच सर्वात मोठे वीजचोर असून तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अन्यथा विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात मंत्र्यांना जागोजागी जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.


हे सुद्धा वाचा :

Mumbai court rejects BJP MLC Praveen Darekar’s anticipatory bail plea

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावाच लागेल : सुभाष देसाई

भाजपाला मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज, राणा दांपत्यांना ‘बंटी आणि बबली’ म्हणत संजय राऊतांची जोरदार टिका

मोदी सरकार म्हणजे ‘खोटं बोल पण रेटून बोल’ : रोहित पवार

नवाब मलिक यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहातच : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांची जामखेडमध्ये भेट!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी