कंत्राटी भरतीची निर्णय महायुतीच्या सरकारने काल (२० ऑक्टोबर) सरकारने रद्द केला. त्यानंतरही याचे कवित्व काही संपलेले नाही. कंत्राटी भरती कुणी सुरू केली यावरून विरोधकांची महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहे. तर हे पाप उद्धव ठाकरे सरकारचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शरद पवारांचे आहे, असा प्रतिवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. एवढेच नव्हे तर हा निर्णय आधीच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, असा पलटवार करताना ‘उलटा चोर कोलवाल को डांटे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी थेट केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे.
सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना ही सरकारची कंत्राटी भरतीमधील मातृयोजना आहे, असा जोरदार हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. केंद्र सरकारने २०२२ मध्ये सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना आणली. ही योजना मुळाच सैन्यावरील खर्च कमी करण्यासाठी आली. त्यामुळे यात तरुण सैनिकांचे हित पाहिलेले नाही, असा आरोप होत आहे. यावरूनच पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रासह राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
हे ही वाचा
शरद पवार-प्रकाश आंबेडकर भेटीत फक्त कॉफीपान?
ड्रगमाफिया ललित पाटीलच्या ‘बारा’ भानगडी
मोहीत कंबोजने राखी सावंतसोबत केली सुषमा अंधारेंची तुलना
केंद्राच्या या योजनेला देशातून विरोध झाला होता. सैनिक म्हणजेच अग्नीवीर भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणणे हीच कंत्राटी भरतीमधील मातृयोजना आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या योजनेत साडेसतरा ते २३ वयोगटातील युवकांची सैन्यात भरती केली जाते. चार वर्षांनंतर भरती झालेल्यांपैकी केवळ २५ टक्के सैनिकांना कायम केले जाते. उर्वरित सैनिकांना ठराविक रकमेचा निधी देऊन घरी बसवले जाते. यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारमधील शिंदे-फडणवीस याचेच समर्थन करत आहे. अग्निपथ योजना रद्द करा, नाहीतर जनतेचा रेटा तुम्हाला माहिती आहे, असा इशाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला.