34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअजित पवार यांचा विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात

अजित पवार यांचा विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही. सरकारला याची किंमत मोजावी लागेल,” असा इशारा देत, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्री, अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं जात आहे. अंधश्रद्धांना खतपाणी घातलं जात आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, असा हल्लाबोल विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केला. (Maharashtra Legislature Winter Session 2022)

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधी पक्षांतर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांनी महापुरुषांबद्दलची अवमानकारक वक्तव्ये, मंत्री व अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, राज्याबाहेर चाललेले उद्योग, त्यामुळे वाढलेली बेरोजगारी, महिलांवरील वाढते गुन्हे, अंधश्रद्धेला घातलं जाणारं खतपाणी असे अनेक मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी. सत्ताधारी अथवा विरोधीपक्षातील कोणी भ्रष्टाचारी असेल त्याच्यावर कारवाई करावी, महिलांना संरक्षण द्यावे, उद्योगधंदे राज्याबाहेर जाण्यापासून रोखावे, अशा अनेक मागण्या अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात केल्या.

अजित पवार म्हणाले, आज महाराष्ट्र वेगळ्या परिस्थितीतून जातो आहे. मोठमोठे उद्योग एकामागून एक राज्याबाहेर जात असताना सत्तेवर असलेले महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. “महाराष्ट्र येत्या दोन वर्षात गुजरातच्या पुढे नेऊ, गुजरात म्हणजे लहान भाऊ, पाकिस्तान नाही”, अशी सारवासारव उप मुख्यमंत्री महोदयांनी वेदांत-फॉक्सकॉन गुजरातला गेल्यानंतर केली. अहो, मोठ्या भावाचा (शिवसेना) हात धरुन लहान भाऊ (भाजपा) कधी “मोठा” झाला, मोठ्या भावाचे घर कसे मोडले, हे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. बहुदा, तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्ही करणार नाही ना ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणताना स्वाभिमान जागृत ठेवा, कुणापुढेही झुकू नका. महाराष्ट्रात गुंतवणुक आल्याशिवाय राहणार नाही. नाही तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलरवर नेण्याची तुमची घोषणा ही घोषणाच ठरेल, एवढं लक्षात ठेवा, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, आजच्या प्रस्तावात राज्याची बिघडलेली कायदा व सुव्यवस्था हा विषय आहे. सांविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून मागच्या काळात वंदनीय अशा महापुरुषांचा अपमान केला गेला. राज्याच्या मंत्र्यांकडून अपमान केला गेला. सत्तारुढ पक्षाच्या आमदारांकडून महिलांविषयी खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्यं झाली, दादागिरीची भाषा केली गेली. राजकीय कुरघोडीतून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. राजकारणासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दलाचा गैरवापर होत आहे. हे आज कायदा व सुव्यवस्थेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे.
हे सुद्धा वाचा
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये बोनस; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’सारखी योजना लागू होणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

या राज्याने नेहमीच राष्ट्रपुरुषांचा सन्मान केला आहे. राष्ट्रपुरुषांबद्दल जाज्वल्य अभिमान बाळगणारे हे राज्य आहे. पण राज्याचे सर्वात मोठे सांविधानिक पद भूषवणाऱ्या मान्यवरांकडून याच महाराष्ट्रात झालेला महापुरुषांचा अपमान महाराष्ट्रातील जनतेला पटलेला नाही, प्रचंड असंतोष आज राज्यात आहे.आजही आमची मागणी आहे की, ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला त्या राज्यपालांना माघारी बोलवा, त्यांची हकालपट्टी करा. आणि ज्या मंत्री महोदयांनी आणि आमदार महोदयांनीही अपमान केला, त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृह मंत्र्यांची आहे. सरकारची आहे. पण मुख्यमंत्री आणि गृह मंत्री आपल्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या गुन्ह्यांकडे सोयीस्कर डोळेझाक करत असतील तर कायदा व सुव्यवस्था राहील का ? असा सवाल करतानाच राज्यात २० हजार पोलिसांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे जवळ जवळ पंधराशे (१,११६) पोलीस आमदारांच्या सुरक्षेसाठी आहेत ही बाब अजित पवार यांनी निदर्शनास आणून दिली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी