29 C
Mumbai
Monday, August 14, 2023
घरराजकीयकळवा हॉस्पिटलचे ऑडिट करा; एसआयटी चौकशीची शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाची मागणी

कळवा हॉस्पिटलचे ऑडिट करा; एसआयटी चौकशीची शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाची मागणी

कळवा रुग्णालयाच्या हलगर्जी कारभाराने दोन दिवसात २२ रुग्णांचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे ऑडिट करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी ‘लय भारी’ शी संवाद साधताना केली आहे. अभिजीत बांगर हे एक वर्षापासून ठाणे महापालिकेचे आयुक्त आहेत. या कालावधीत त्यांनी चारपेक्षा जास्त वेळा कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेटी दिल्या आहेत. या भेटीत त्यांना या रुग्णालयातील हलगर्जी, बेजबाबदार अधिकारी-कर्मचारी नजरेस पडले नाहीत का, पडले असेल तर त्यांनी तेव्हाच कारवाई का केली नाही, असा सवालही घाडीगावकर यांनी विचारला आहे.

शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या कळवा रुग्णालयात महापालिका सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कळवा रुग्णालयासाठी वारंवार दुरुस्ती आणि इतर सामग्रीसाठी पाच वर्षात देयक काढले आहेत हे पाहता विद्यमान महापालिका आयुक्त यांच्यावर खरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी घाडीगांवकर यांनी केली आहे. स्वतःला अनाथांचा नाथ म्हणवून इव्हेंट करणारे मुख्यमंत्री मागील २० वर्षात कळवा रुग्णालयाच्या प्रशासनाला शिस्त लावू शकले नाहीत. नागरिकांना सुविधा देऊ शकले नाहीत. महापालिकेच्या नागरी सुविधाच्या भूखंडावर जी रुग्णालये उभी आहेत, त्या रुग्णालयांमध्ये महापालिकेसाठी राखीव जागा उपलब्ध करून देऊ शकलेले नाहीत. हे मुख्यमंत्र्यांचे अपयश असून ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात येण्यास यांची दूरदृष्टीविहित धोरणे कारणीभूत होत असल्याचा आरोप संजय घाडीगावकर यांनी केला आहे. CM निधीतून वैद्यकीय कारणासाठी १०० कोटी वाटल्याचा गवगवा मुख्यमंत्री करतात आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात योग्य उपचाराअभावी महापालिका रुग्णालयात दोन दिवसात २२ रुग्ण दगावतात, किती हा मोठा विरोधाभास आहे असा सवाल घाडीगावकर यांनी उपस्थित केला आहे.
हे सुद्धा वाचा
२२ रुग्णांचे बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे झाले; शहरात लागले रुग्णालयाचे पोस्टर्स
शहा यांनी गोंजारताच अजित पवार लागले कामाला; एकाच दिवसात घेतल्या दोन मॅरेथॉन बैठका
हसमुख असलेल्या रामदास आठवले यांनी वाढवली शिंदे गटाची चिंता

कळवा हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा कट शिजतोय !

कळवा रुग्णालयात अपुरा स्टाफ आहे वैद्यकीय अधिकारी नर्स यांची कमतरता आहे. येथील स्थानिक कर्मचाऱ्यांनी येथील सोयीसुविधाबाबतचा पाढा वारंवार महापालिका प्रशासनाकडे वाचलेला असतानासुद्धा त्यावर उपाययोजना होत नसतील तर याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी निश्चिती करून महापालिका आयुक्तांचा राजीनामा मुख्यमंत्री घेतील काय? ज्या पद्धतीने महापालिका रुग्णालय आणि महापालिका इमारती या खासगीकरणाच्या नावाखाली ज्या सामाजिक संस्थांना देण्याचा घाट चाललेला आहे आणि होत आहे ते पाहता सामान्य नागरिकाला आरोग्य सुविधा मिळणं हे ठाण्यात दुर्लभ होऊ लागलेले आहे, आतापर्यंतचा अनुभव पाहता ज्या संस्थांना महापालिकेचा रुग्णालय इमारती दिलेल्या आहेत तेथे सामान्य ठाणेकर नागरिकांना हजारो रुपये खर्च करून नागरी सुविधा घ्याव्या लागत आहेत हे कटू सत्य आहे आणि हे मुख्यमंत्री का बदलू शकलेले नाहीत ?असा सवाल संजय घाडीगावकर यांनी केला आहे. तसेच ज्या पद्धतीने आपल्या मित्र वर्गाला आणि जवळच्या लोकांशी संबंधित असलेल्या संस्थांना महापालिकेच्या वास्तू देण्याचा घाट आहे तो प्रकार इथेही नाही ना? म्हणून कळवा हॉस्पिटलला सुविधा किंवा उपाययोजना न करता या पद्धतीने घटना घडवून खासगीकरण करण्याचा हेतू तर नाही ना? असा संशय घाडीगांवकर यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी