छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यावरून राज्यातील जनतेच्या संतापाच्या तडाख्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पॅकअप’च्या मूडमध्ये आहेत. अर्थात, चंद्रकांत पाटील यांच्याप्रमाणेच तेही आपला हेका काही सोडायला तयार नाहीत. त्यातूनच त्यांनी पुन्हा घटनात्मक पदाचा प्रोटोकॉल धाब्यावर बसवला आहे. संकेतानुसार, राष्ट्रपतींकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी, एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यागत राज्यपालांनी चक्क अमितभाईंकडे मार्गदर्शन मागितले आहे. मात्र, इतके सारे घडूनही राज्यपालांना अक्कल आलेली दिसत नाही. या पत्रातूनही कोश्यारी यांनी एक आगावूपणा करत पुन्हा छत्रपती शिवरायांसह महापुरुषांचा अवमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यपाल महोदय छत्रपती शिवराय व इतर उत्तुंग महापुरुषांच्या पंक्तीत बसवू पाहत आहेत. आपली खुर्ची वाचविण्यासाठी व पक्षश्रेष्ठींची खुशामत करण्यासाठी राज्यपालांनी केलेली ही तुलना अतिशय संतापजनक आहे. याबाबत राज्यात पुन्हा तीव्र भावना उमटू शकतात.
राज्यपालांनी स्वतः गेले काही दिवस पूर्वीसारखे भाराभर जाहीर कार्यक्रम आणि पदव्या वाटप कार्यक्रम बंद केले आहेत. अलीकडे त्यांचा मूडही फारसा बरा नसल्याची माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली. त्यांना राज्यातून बाहेर पडायचे आहे. त्यांनी तशी पूर्ण मन:स्थिती तयार केली आहे. ते जातील, हे नक्की! मात्र, इतक्यात त्यांना जाऊ द्यायला राज्य भाजपाचे नेते तयार नाहीत. कारण राज्यपालांना आता हलवले, तर तो विरोधी पक्षाचा मोठा विजय ठरेल. त्यातून विरोधी पक्षांना भाजप घाबरल्याचा अर्थ काढला जाऊ शकेल. त्यामुळे लगेच राज्यपालांना हलविण्याची काही चूक भाजप करणार नाही, असे राजकीय जाणकार मानतात. त्यामुळे राज्य भाजपाचे नेते शक्य तितकी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अशात चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारसाठी नवी डोकेदुखी वाढवून ठेवली आहे. केंद्रातील भाजप नेत्यांना आता महाराष्ट्रात नव्याने जनतेचा रोष नको आहे. विशेषत: मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन, केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील अनेक वाचाळ भाजप नेत्यांना गप्प राहण्याचा दट्टा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातच अधिवेशनात महापुरुषांच्या अवमनावरून विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील यांच्या वाचाळ कारनाम्याने अधिवेशनात सरकारचा कस लागणार आहे. अशात महापुरुष अवमानानाबत राज्यात जबरदस्त मोर्चे निघण्याची, बंदला अभूतपूर्व प्रतिसादाची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास थोडी सबुरी दाखवून, दोन पावले मागे यावे अशी केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना सूचना केली आहे. राज्यपालांची तात्काळ सुटी करण्याची भाजप हायकमांडची भूमिका आहे. फडणवीस मात्र त्यासाठी राजी नसल्याचा सूत्रांचा दावा आहे. यामुळे विरोधी पक्षांचे, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावेल व भाजप कार्यकर्त्यांनी गोची होईल, असे राज्यातील नेते पटवून देऊ पाहत आहेत. दुसरीकडे, अमित शाह यांच्या याच नाराजीची कल्पना आल्याने आता भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पत्र लिहून मनधरणी करण्याचा, मखलाशीचा प्रयत्न केला आहे. कोश्यारी यांना दिल्लीत जाण्याची, सर्वोच्च घटनात्मक पदी बसण्याची मनोमन, सुप्त इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही चालविले होते. मात्र, त्यांची ती संधी हुकली. आता किमान पुढे “उप” तरी संधी मिळावी, अशी त्यांची आशा आहे. तूर्तास तरी त्यांनी बॅगा पॅक केल्याचे राजभवनातील सूत्रांचे म्हणणे आहे.
हे सुद्धा वाचा
कोश्यारी, लोढा यांच्यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी तोडले अकलेचे तारे !
राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवरायांबाबत पून्हा वादग्रस्त वक्तव्य
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवन, मलबार हिल येथून 6 डिसेंबर रोजी अमितभाई यांना मूळ हिंदीतून लिहिलेले पत्र (मराठीत अनुवादित करून) जसेच्या-तसे :
आदरणीय श्री. अमितभाईजी,
सादर प्रणाम, तुम्हाला माहिती आहेच की, महाराष्ट्रातील एका विद्यापीठात केलेल्या माझ्या भाषणाचा एक छोटासा भाग, मूळ संदर्भ वगळून, आजकाल काही लोकांनी राज्यपालांना टीकेचा विषय बनवले आहे. तरुण पिढीसमोर उत्तुंग, आदर्श व्यक्तिमत्त्वांचा उदाहरणे असतील, तर ते त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. मी विद्यार्थ्यांना सांगितले, की आम्ही शिकत असताना काही विद्यार्थी महात्मा गांधीजी, कोणी पंडित नेहरूजी, कोणी नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना आपले आदर्श मानायचे. मात्र, तरुणांना सध्याच्या त्यांच्या पिढीतील कर्तव्यदक्ष लोकांचे उदाहरणही हवेसे वाटणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राबाबत बोलताना मी म्हणालो, की आजच्या संदर्भात डॉ. भीमराव आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत चांगली उदाहरणे देता येतील. याचा अर्थ विद्यार्थी डॉ. पी.जे. अब्दुल कलाम, होमी भाभा इत्यादी अनेक कर्तव्यदक्ष लोकांनाही आदर्श मानू शकतात. आज जर एखादा तरुण या व्यक्तींना किंवा विशेषत: भारताचे नाव जगात उंचावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदर्श मानत असेल तर त्याचा अर्थ भूतकाळातील महापुरुषांचा अपमान होत नाही. तो तुलनेचा विषयही नव्हता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला, तर ते केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत. कोविडच्या काळात अनेक मोठी माणसे घराबाहेर पडली नसताना, मी या वयातही शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगड अशा पवित्र स्थळांना पायी जाऊन भेटी दिल्या. शिवाजी महाराजांसारख्या पूज्य पुत्राला जन्म देणार्या माता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजाला भेट देणारा मी कदाचित 30 वर्षांहून अधिक काळातील पहिला राज्यपाल आहे. तेही हवाई मार्गाने नव्हे, तर मोटारीने जाऊन. वस्तुत: माझ्या विधानाचा एकच अर्थ होता, की शिवाजी महाराज हे सदैव माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहेत.

आदरणीय अमितभाईजी, तुम्हाला माहिती आहेच, की 2016 मध्ये तुम्ही स्वतः हल्दवानीमध्ये असताना 2019 ची निवडणूक न लढवण्याचा आणि राजकीय पदांपासून दूर राहण्याचा माझा मानस मी जाहीरपणे व्यक्त केला होता, परंतु आदरणीय पंतप्रधान आणि तुम्ही माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याबाबत दाखविलेली आपुलकी आणि विश्वास यामुळेच मी महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे राज्यपालपद स्वीकारले आहे. तुम्हाला हेही माहीत आहेच, की माझ्याकडून चुकून कुठे काही चूक झाली, तर मी लगेच खेद व्यक्त करायला किंवा माफी मागायला मागेपुढे पाहत नाही. ज्यांनी मुघल काळात धैर्य, त्याग आणि बलिदानाची उदाहरणे जगासमोर ठेवली, अशा छत्रपती शिवाजी महाराज, श्रीगुरु गोविंद सिंग आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या अवमानाची तर स्वप्नातही कल्पना करता येणार नाही.
कृपया सध्याच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन करावे, ही विनंती.
भवदीय,
भगतसिंग कोश्यारी
सादर
श्री अमित शाहजी,
माननीय गृहमंत्री,
भारत सरकार