27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरराजकीय"खोटे बोला पण रेटुन बोला," भाजपाचे पवारांना प्रत्युत्तर

“खोटे बोला पण रेटुन बोला,” भाजपाचे पवारांना प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली होती. “शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना काय केले असा थेट सवाल त्यांनी सभेत विचारला होता. त्यावर, शरद पवार यांनी शनिवारी (28 ऑक्टोबर) मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन कृषिमंत्री असताना केलेल्या कामांची यादीच सादर केली. यावरून, भाजपनेही पवारांना प्रत्युत्तर दिले असुन “खोटे बोला पण रेटुन बोला,” अश्या शब्दांत टिका केली आहे. इतकेच नव्हे, तर “खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवणे बंद करा. मोदी सरकारच्या पाठीशी शेतकरी 2014, 2019 पाठीशी राहिला आहे 2024 ला देखील पाठीशी ठामपणे उभे राहणार,” असे म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रच्या अधिकृत “X” अकाऊंटवरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. ह्या ट्विटमधून शरद पवार यांच्यावर टिका करताना 2014 आणि 2022 मधील शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळालेल्या हमीभावाची यादीही सादर केली आहे.


भाजपा महाराष्ट्रने ट्विट केले आहे की, “खोटं बोला पण रेटून बोला अशी भूमिका मा.शरद पवारांनी घेतलेली दिसत आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात देशाच्या कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला आहे मात्र शरद पवारांनी नेहमीच शेतकऱ्यांची दिशाभूल करत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेठीस धरण्याचे काम केले आहे. पवारांना आरसा दाखवणे गरजेच आहे.”

“स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्याचे काम मोदी सरकारच्या कार्यकाळात झाले.”

शेतकऱ्यांचा शेतमालाला मिळालेला MSP

तांदळाला 2014 साली 1310 रुपये तर 2022 मध्ये 2040 रुपये इतका भाव मिळत होता. तर गव्हाला 2014 मध्ये  1400 रूपये तर 2022 मध्ये 2015 रुपये इतका भाव मिळत होता. सोयाबीन पिकाला 2014 मध्ये 2560 रुपये तर 2022 मध्ये 4300 रुपये इतका भाव मिळत होता, हे ट्विटमधून सांगितले.

हे ही वाचा 

मोदीसाहेब, हे घ्या तुमच्या आरोपाला उत्तर…

एकनाथ शिंदेंची साथ सोडून शरद पवारांचा जुना सहकारी स्वगृही!

‘तो’ व्हिडीओ का टाकला? फडणवीसांकडून उत्तराला बगल

पुढे त्यांनी लिहिले ,”पवारसाहेब तुम्ही 2013/14 च्या आथिर्क बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी 27.049 कोटी रुपयांची तरतूद केली ते शेतकऱ्यांच्या खिशात किती गेले तो विषय गौण आहे. नरेंद्र मोदीजी यांनी 2023/24 च्या आर्थिक बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी 1.25 लाख कोटी रुपयांची तरतूद केली, जी की पाच पटीने अधिक आहे. आतापर्यंत 85 लाख महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा झाले. मोदी सरकार प्रमाणेच आता राज्य सरकार देखील त्या सर्व शेतकऱ्यांना सन्मान निधी देत आहे. महाराष्ट्रात जवळपास 78 लाख शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विम्याचा फायदा होत आहे ज्यासाठी 4 हजार 782 कोटी खर्च करण्यात आले आहेत. अश्या विविध योजनांच्या माध्यमातून शाश्वत शेती साठी आमुलाग्र बदल करण्यात मोदी सरकार प्रमाणेच देवेंद्रजी यांनी मोदीजींच्या पथावर पाऊल टाकले आहेत. याउलट जेव्हा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत होता तेव्हा पवार साहेब तुमच्या मतदारसंघात तब्बल 70 कोटींचा छावणी घोटाळा तुमच्याच सरकारमधील लोकांनी उघडकीस आणला होता हे विसरलात का?” असा सवाल विचारला आहे.

“सरतेशेवटी एवढेच सांगणे की खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवणे बंद करा. मोदी सरकारच्या पाठीशी शेतकरी 2014, 2019 पाठीशी राहिला आहे 2024 ला देखील पाठीशी ठामपणे उभे राहणार.” अश्या शब्दांत भाजपने पवारांना उत्तर दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी