भाजपविरोधात बातम्या न येण्यासाठी पत्रकारांना धाब्यावर न्या, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगरमधील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आणि त्यानंतर बावनकुळेंवर टीकेचे आसूड उठू लागलेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट ट्वीट करत चंद्रशेखर बावनकुळे यांना धारेवर धरले आहे.
तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का?, असा थेट सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरमधून केलाय. तर माध्यमे तुमच्याच इशाऱ्यावर चालतील, असे दिवस अजून तरी आलेले दिसत नाहीत. कारण असे असते तर त्यांनी तुम्हाला माणिपूरचा आरसा दाखवला नसता, असा घणाघात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बावनकुळे यांच्यावर केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे जी,
तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का ?देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही.
दुसऱ्यांचे पक्ष फोडून, इडी सीबीआय सारख्या संस्थांचा धाक दाखवून ही भाजप विरुद्ध आवाज दबत नाही आहे. त्यामुळे… pic.twitter.com/HtYZYdCiRX
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 25, 2023
पत्रकारांनी 2024 पर्यंत भाजपविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा! त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत पत्रकारांना धाब्यावर घेऊन जा, असा सल्ला बावनकुळे यांनी नगरमधील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. यानंतर बावनकुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
आपण सर्वांना आणि सगळं काही विकत घेऊ शकतो, या भंपक भ्रमामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना बाहेर आली आहे. त्यांनी एवढंच सांगावं, हा आविष्कार त्यांचा आहे की त्यांच्या पक्षातील बॉस ने असे फर्मान जारी केले आहे? माध्यमे तुमच्याच इशाऱ्यावर चालतील, असे दिवस अजून… pic.twitter.com/1OWpkiJ6yb
— Ambadas Danve (@iambadasdanve) September 25, 2023
देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही, या शब्दांत वडेट्टीवार यांनी बावनकुळेवर टीकास्त्र सोडले आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवूनही भाजपविरुद्ध आवाज दबत नाही. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? पण जनता २०२४ मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांना दिला आहे.
हे ही वाचा
पत्रकारांसाठी भाजपचं ‘चहापाणी’ तंत्र
चंद्रशेखर बावनकुळेंना सुप्रिया सुळेंनी फटकारले; पत्रकारांबाबतच्या वक्तव्याचे पडसाद उमटले !
पंकजा मुंडे यांना केंद्राचा झटका !
हे कमी म्हणून की काय, ‘आपण सर्वांना आणि सगळं काही विकत घेऊ शकतो, या भंपक भ्रमामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना बाहेर आली आहे. त्यांनी एवढंच सांगावं, हा आविष्कार त्यांचा आहे की त्यांच्या पक्षातील बॉसने असे फर्मान जारी केले आहे?’, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.
माध्यमे तुमच्याच इशाऱ्यावर चालतील, असे दिवस अजून तरी आलेले दिसत नाहीत. कारण असे असते तर त्यांनी तुम्हाला माणिपूरचा आरसा दाखवला नसता बावनकुळेजी. असले धंदे जनमतही बदलत नाही. कर्नाटक निवडणूक त्याचे जवळचे उदाहरण आहे, असाही टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
थोडक्यात बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत आला आहे. वास्तविक वाचाळवीरांना लगाम लावण्याऐवजी खुद्द प्रदेशाध्यक्ष वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळे भाजपच्या इतर नेत्यांची आता गोची झाली आहे.