29 C
Mumbai
Monday, August 28, 2023
घरराजकीयमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरात दौऱ्यावर, अमित शहासोबत बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरात दौऱ्यावर, अमित शहासोबत बैठक

अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ आणि उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते भलतेच फार्मात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकूण कार्यभार पाहता अजित पवारच गेल्या काही दिवसापासून विविध बैठका घेत आहेत. त्यामुळे राज्यात shadow मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यामुळेच की काय विरोधकही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की, अजित पवार अशी शब्दात डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि शिंदे गटाचे आमदारही अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत असल्याचे खासगीत बोलत आहेत. या सगळ्या घटना पाहता शिंदे यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. असे असताना सोमवारी सकाळी गुजरातच्या गांधीनगरमधील हॉटेल लीलामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 26 व्या पश्चिम क्षेत्रीय परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या बैठकीदरम्यान, शहा यांच्या कानावर राज्याचे राजकारण शिंदे यांनी टाकल्याची चर्चा आहे. या दोघांमध्ये नंतर एक बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.

2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे 8 आमदार घेऊन सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंपसदृश परिस्थिती निर्माण झाली. महाविकास आघाडीत अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदारांना भरभरून विकासनिधी दिला, असा आरोप एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना आमदारांनी केला. पण राज्यमंत्री मंडळ विस्तारत अजित पवार यांना अर्थखाते देऊ नका, या मागणीसाठी शिंदे गटाचे आमदार अडून बसले होते. त्यामुळे नव्या मंत्र्यांचे खातेवाटप काही दिवस रखडले होते. मोगल सैन्यांना ज्याप्रमाणे पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे तसेच शिंदे गटाच्या आमदारांना अजित पवार यांची भीती वाटत होती. पण अखेर फडणवीस आणि शिंदे यांनी काही आमदारांची समजूत काढल्यावर अजित पवार यांना त्यांच्या मनातले ‘अर्थ’ खातेच मिळाले.

आता तरी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार स्थिर होईल असे वाटत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत. फडणवीस जपान दौऱ्यावर गेल्यावर राज्यात कांदाप्रश्न चिघळला. तेव्हाही अजित पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या घरी पाठवून कांदाप्रश्नी आपल्या खात्याच्या मंत्र्याची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय फडणवीसच नाहीतर आम्हीही ‘संकटमोचक’ आहोत, हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीस काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत, त्यांनी जपानवरुन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा, पीयूष गोयल यांच्याशी फोनाफोनी करून त्याबाबाबतची माहिती एक्स (ट्विट) वर देत, अजित पवार आणि मुंडे यांचा डाव उलटवून लावला.
 हे सुद्धा वाचा
संतापजनक : मंत्री हसन मुश्रीफ यांना शाहू महाराजांच्या विचारांचा पडला विसर, लोकशाहीच्या मंदिरात केले अपरिपक्व विधान !
अपक्ष आमदाराने 50 वर्ष जुन्या पक्षाच्या कार्यालयावर दावा करणे हास्यास्पद जनता दलाचा बच्चू कडूवर हल्लाबोल
गदर ‘टू’चा नवा रेकॉर्ड, चक्क 450 कोटी रुपयांची कमाई 

फडणवीस जपानला असल्याची संधी साधत अजित पवार यांनी विविध खात्यांच्या बैठका घेतल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी अडवलेले प्रकल्प मार्गी कसे लागतील याबाबत अधिकाऱ्यांना सूचना आणि मार्गदर्शन केले. अजित पवार यांचा बोलविता धनी दिल्लीत आहे का, अशी शंका एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना आली. अजित पवार आणि अमित शहा यांच्यात गेल्या दोन महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकामुळे अमित शहा हे अजित पवार यांना रसद पुरवत असल्याची दबक्या आवाजातील चर्चा शिंदे गटाच्या आमदार मंडळीत सुरू होती, मुख्यमंत्री शिंदे यांच्या अधिकारावर अजित पवार अतिक्रमण करत असल्याची बाब या आमदारांनी शिंदे यांच्या कानावर घातली. या सगळ्या घडामोडी पाहता मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहा यांच्या बैठकीकडे राजकीय जाणकार वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत. शिंदे यांनी आपल्या अधिकारावर अतिक्रमण होतेय, अशी तक्रार शहा यांच्याकडे केली की अन्य चर्चा याचे तपशील मात्र उपलब्ध झाले नाहीत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी