25 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरराजकीयराजकारण विकासाचे, महाराष्ट्राच्या प्रगतीचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष लेख)

राजकारण विकासाचे, महाराष्ट्राच्या प्रगतीचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष लेख)

'लय भारी'च्या दिवाळी विशेषांकामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. हा लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.

गेल्या दोन वर्षांचा कालावधी जनतेसाठी अत्यंत हलाखीचा ठरला. ‘कोरोना’मुळे जनतेचे आयुष्य ठप्प झाले होते. प्रदीर्घ काळ लॉकडाऊन लागू राहिल्यामुळे लोकांना घराबाहेरही पडता येत नव्हते. संपूर्ण जगाचेच अर्थचक्र ठप्प झाले होते. त्यामुळे लोकांचा रोजगार हिरावला होता. अनेकांना आपल्या हृदयाजवळच्या लोकांना कायमचे मुकावे लागले होते. पण, अशा परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला फार आर्थिक झळ बसणार नाही, असे धोरणात्मक निर्णय घेतले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात संपूर्ण लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली गेली. त्यामुळे नव्या वर्षात ‘कोरोना’वर मात करण्यात यश आले आहे. आपल्या देशाची आर्थिक गाडी पुन्हा रुळावर आली आहे. विकासदर उत्तमपणे झेप घेऊ लागला आहे. लोकांना पुन्हा रोजगार मिळाले आहेत. छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांचा उत्साह दिसून येत आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, दसरा, नवरात्र आणि आता दिवाळी अशा एकामागोमाग आलेल्या या सणांनी जनतेच्या आयुष्यात आनंदाची लाट आणली आहे. कंदील, दिवे, पणत्या खरेदी करण्यासाठी लोकांची बाजारात झुंबड उडालेली दिसत आहे. कपड्यांची दुकाने गजबजलेली आहेत.

जनतेच्या आयुष्यातील दिवाळीचा हा आनंद असाच टिकून राहो! कोरोनासारखे संकट पुन्हा कधी येऊ नये. राज्यातील माझ्या जनतेची भराभराट होवो, प्रत्येकाला सुखी व समृद्ध आयुष्य लाभो, अशा सदिच्छा मी ‘लय भारी’च्या या दिवाळी विशेषांकाच्या माध्यमातून व्यक्त करतो. ‘लय भारी’ने आपल्या पहिल्यावहिल्या अंकाचा विषय राजकीय ठेवला आहे. विविध मान्यवर ७५ वर्षांचा राजकीय आढावा या अंकात घेणार आहेत. त्या अनुषंगाने मलाही लिहिते करण्यात आले आहे.
खरे तर, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक संपन्न असलेले राज्य आहे. महाराष्ट्राचे अनुकरण करण्याचा मोह इतर राज्यांनाही होत असतो. आपल्या महाराष्ट्राने आजवर जी काही प्रगती केली आहे, त्याला फार मोठी परंपरा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ अशा अनेकविध संतांची परंपरा लाभलेली आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची पताका थेट पाकिस्तानातील अटक किल्ल्यापर्यंत फडकली होती.
ब्रिटिश राजवटीमध्येसुद्धा राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे या मराठी माणसांनी मोठे कार्य केले होते. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा नेत्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष केला. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक सुधारणेचे मोठे कार्य केले. स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीची पहाट उगवली; पण त्यावेळी महाराष्ट्र राज्य नव्हते. त्यावेळी मुंबई हे राज्य होते. आताच्या महाराष्ट्रातील बराचसा भाग त्या वेळच्या मुंबई राज्यात नव्हता. त्यातूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुंबई महाराष्ट्राला देण्याबद्दल आकस होता. त्यामुळे ते मुंबई महाराष्ट्राला देऊ इच्छित नव्हते. दुर्दैवाने त्या वेळचे महाराष्ट्रातील नेते यशवंतराव चव्हाण यांनीसुद्धा पंडित नेहरूंची ‘री’ ओढली. महाराष्ट्राच्या हितापेक्षा त्यांनी जवाहरलाल नेहरूंची हांजी हांजी करण्यात धन्यता मानली. पण, शिवरायांचा वारसदार असलेल्या मराठी माणसांनी हा अन्याय सहन केला नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने उग्र रूप धारण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी ठिकठिकाणी उग्र आंदोलने होऊ लागली. मुंबईतील आंदोलकांवर तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यातून १०५ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यामुळे पंडित नेहरूंना आपला हेकेखोरपणा सोडावा लागला आणि मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली. यशवंतराव चव्हाण यांनाही आपली चूक उमगली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचे भाग्य यशवंतराव चव्हाण यांना लाभले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा राजकीय इतिहास जेव्हा जेव्हा सांगितला जातो, त्यात यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळाचे कौतुक केले जाते. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादा पाटील यांनीसुद्धा चांगले काम केले होते; पण शरद पवार यांनी त्यांना धोका दिला. वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवार यांनी पाडले. शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यांनी प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री म्हणून काम केले. ते भाग्य सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना लाभले नाही. आपल्याच नेत्यांमध्ये आपापसांत भांडणे लावून द्यायची, हे काँग्रेसचे धोरण आहे. त्याचा फटका या तिन्ही मुख्यमंत्र्यांना बसला.

देवेंद्र फडणवीस यांनी मात्र संपूर्ण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. देवेंद्रजींच्या काळात महाराष्ट्राने चौफेर प्रगती केली. अनेक मोठमोठे प्रकल्प साकार झाले. मेट्रो रेल्वे असो किंवा समृद्धी महामार्ग असो… देवेंद्रजींच्या कामाची छाप जिथे तिथे दिसते. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री कालावधी ‘कोरोना’च्या लॉकडाऊनमध्येच गेला. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत फार काही प्रगती झालेली दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने प्रगती व विकासाचा झंझावात चालू ठेवला होता, तोच झंझावात मी यापुढेही चालू ठेवणार आहे. योगायोगाने देवेंद्र फडणवीस माझे सहकारी आहेत. त्यांची साथ असल्यामुळे विकासाचा रथ वेगाने धावेल याची खात्री मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला देतो.

सन १९९५ ते १९९९ या कालावधीत शिवसेना – भाजप युतीचे सरकार सत्तेत होते. हा कालावधीसुद्धा महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच युती सरकारने मुंबई – पुणे हा एक्स्प्रेस वे सुरू केला होता. हा महामार्ग तेव्हा देशभरात कुतूहलाचा विषय ठरला होता. या लेखात मला कुणाचीही उणीधुणी काढायची नाहीत. म्हणूनच मी विकासाच्या राजकारणावर मांडणी करतोय. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे मी लेखाच्या पुढील टप्प्यात या महामार्गाविषयी अधिक विस्ताराने लिहिणार आहे.
हे सुद्धा वाचा
Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन
Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !
Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !
समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप
समृद्धी महामार्गाची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावर सोपवली होती. त्यावेळी मी त्यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाममंत्री होतो. या महामार्गाचं एकूणच भव्य स्वरूप, त्याचा अनेक जिल्ह्यांना होणारा फायदा, शेतकऱ्यांना मिळणारा लाभ, एकूणच याकडे आकर्षित होणारी उद्योग- व्यवसायातील गुंतवणूक पाहून मी खरोखरच प्रभावित झालो आणि बघता बघता, हा ड्रीम प्रोजेक्ट माझ्या हृदयाशी जोडला गेला. आज जवळपास सात वर्षे झाली आहेत. या महामार्गाचे प्रमुख टप्पे पूर्ण झाले असताना एक मुख्यमंत्री म्हणून मी आता या प्रकल्पाकडे पाहतोय आणि निश्चितच समाधान वाटतेय. या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन बाळासाहेबांच्या दूरदृष्टी आणि विकासाच्या दृष्टीला आम्ही आदरांजलीच वाहिली आहे.

आज आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत. समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह राज्यातील प्रत्येक क्षेत्रावर लक्ष देण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही जशी संतांची आणि देवांची भूमी म्हणून ओळखली जाते, तशीच महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर राज्य, अशीसुद्धा ओळख आहे. ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. वेगाने विकास होण्याची क्षमता इथे असून, समृद्धी महामार्ग हा एक गेम चेंजर प्रकल्प म्हणून देशात ओळखला जाईल याविषयी मला पूर्ण खात्री आहे.

महाराष्ट्रानं कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिलं आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रांत उत्कृष्ट काम केले असून, राज्यात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. असे करण्यासाठी जागतिक दर्जाची वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था असणे खूप महत्त्वाचे आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोलीपर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सुरू असून, भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

एखादा भव्य प्रकल्प सुरू झाल्यावर काही अडचणी आणि आव्हाने येतातच. समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाल्यावरही छोट्या-मोठ्या अडचणी येत होत्या. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा अर्थातच ज्यांच्या जमिनी यात संपादित होत आहेत, त्या गावकरी आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेणं. भूसंपादनाच्या मोबदल्यावरून किंवा महामार्गाचे काम पर्यायी भागातून घ्या; आमच्या जमिनीवरून नको, असाही सूर होता. काही शेतकऱ्यांच्या शेतात महामार्गाच्या कामामुळे पाणी गेल्याने त्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी होत्या; तर काही ठिकाणी मोठमोठ्या डंपर्समुळे रस्ते खराब झाल्याच्या तक्रारी होत्या. मला आठवतं, या संपूर्ण काळात ज्या ज्या जिल्ह्यांतून हा महामार्ग जातोय, त्या प्रत्येक ठिकाणी मी भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या, गावकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं. एवढंच नाही तर त्यांच्या अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. हा महामार्ग काय केवळ राज्याच्या फायद्याचा नाही; तर तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश आणणारा, उन्नती करणारा आहे हे समजावून सांगितले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही, असा विश्वास दिला आणि चित्र बदलू लागलं.
भूसंपादन हा खरोखरच एक क्लिष्ट विषय असतो. ज्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी जातात, त्यांना योग्य तो मोबदला, तोदेखील वेळेत मिळणं हे आव्हान असतंच. शिवाय आपल्या जमिनी देणं कुणालाच आवडत नसतं. पण मी आवर्जून सांगू इच्छितो की, समृद्धी महामार्गाबाबत आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण विश्वासात घेऊन त्यांच्या जमिनी ऐच्छिक संमतीने घेण्याचा निर्णय घेतला. लँड पुलिंग स्कीमबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला. महामार्ग सुधारणा अधिनियम २०१६ मध्ये त्याप्रमाणे सुधारणा करण्यात आली. या महामार्गामुळे महाराष्ट्र राज्य देशातील अन्य राज्यांपेक्षा पुढे जाणार असून, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे हे आम्ही घरोघरी जाऊन सांगितले.
Chief Minister Eknath Shinde's article on the progress of Maharashtra

हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली होती. डिसेंबर २०१६ ते मे २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीत १० हजार हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण झाले. या काळातच एमएसआरडीसीने २६ तालुके आणि ३९२ गावांमधील गावकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी पथके तयार केली होती आणि या पथकांनी प्रत्येकाशी बोलणं सुरू केलं होतं. महामार्गामुळे लाखो लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे आणि आपल्या जीवनात समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही हा आमचा मुद्दा पटत असल्याने एकूणच गावकरी तयार होत होते; पण पाहिजे तेवढा वेग येत नव्हता.
मार्च २०१७ मध्ये आम्ही खासगी जमिनीची थेट खरेदी करण्याचे धोरण आणले. त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचे होते ते शेतकरी-गावकरी यांच्या बॅंक खात्यात भूसंपादनाचा मोबदला आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट जमा करणे. मला आठवतं माझ्या उपस्थितीत हिंगणा तालुक्यातील पहिली अशी खरेदी करण्यात आली आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचल्याचा संदेश आला. तो प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. मोबदला मिळालेले शेतकरी आणि इतर उपस्थित अक्षरश: अवाक आणि चकित झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद होता. ठाण्यातही आम्ही अशाच तऱ्हेने एक कार्यक्रम घेऊन मोबदला बँकेत थेट जमा केला. नंतर अवघ्या आठ महिन्यांत एमएसआरडीसीने ८४ टक्के भूसंपादन केले. उरलेली १६ टक्के जमीनही कायद्याप्रमाणे पुढच्या दोन महिन्यांत संपादित केली. अशा तऱ्हेने विक्रमी नऊ महिन्यांत सर्व भूसंपादन पूर्ण झाले.

या संपूर्ण काळात मोबदल्यावरून आणि भूसंपादनावरून अनेक जनहित याचिका दाखल झाल्या होत्या; पण उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिले. विभागाने भूसंपादनात केलेल्या मेहनतीचे हे यश आहे.
आज हा महामार्ग पूर्णपणे ग्रीन एक्स्प्रेस वे व्हावा म्हणून संपूर्ण मार्गाच्या दुतर्फा ३३ लाख झाडं लावण्यात येत आहेत. हा महामार्ग तयार करण्यासाठी काही झाडं तोडावी लागली होती. त्या बदल्यात साडेसहा लाख झाडंच आम्हाला लावणं आवश्यक होतं; मात्र त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी झाडं लावण्यात येत आहेत. या महामार्गालगत दुष्काळप्रवण विदर्भ आणि मराठवाड्यातील क्षेत्रात २०० शेततळी आणि चेक डॅम बांधण्यात येत आहेत. हा महामार्ग तीन पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून जातोय. त्यामुळे वन्य प्राण्यांसाठी महामार्गावरून व खालूनही छोटे मार्ग काढण्यात आले आहेत. वन विभागाने सांगितल्याप्रमाणे ध्वनिरोधक उभारणे व इतर आवश्यक उपाययोजनासुद्धा केल्या आहेत. मी तर म्हणेन की, देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांत वन्यजीवांची, पर्यावरणाची इतकी काळजी घेऊन आणि उपाययोजना करून उभारलेला महामार्गाचा हा एकमेव प्रकल्प असावा.

या महामार्गावर दोन्ही बाजूंनी देश–विदेशांतील मोठमोठे कारखाने उभारले जाणार आहेत. नागपूरहून मुंबई, पुण्याला तसेच अन्य जिल्ह्यांतून मुंबईला येणारा शेतीमाल व अन्य उत्पादने वाहून नेणे अधिक सोईचे होणार आहे. या महामार्गालगत उभारण्यात येणारी १९ नवनगरेही कृषीपूरक उद्योगांना चालना देणारी व ग्रामीण भागात सुविधा देणारी कृषी समृद्धी केंद्रे असणार आहेत. या महामार्गाबाबत समाजातील सर्व स्तरांत, तसेच जगभरातील मोठमोठ्या उद्योजकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यात मोठी दळणवळण क्रांती घडविणारा हा प्रकल्प असून, तो नव्या आधुनिक महाराष्ट्रातील परिवहन व्यवस्थेचे अनोखे प्रतीक ठरणार आहे.

विशेष म्हणजे हा महामार्ग थेट दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडॉर, जवहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांना जोडला जाणार आहे. महामार्ग ज्या ज्या जिल्ह्यांतून जाईल, त्या त्या ठिकाणी पर्यटनाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. येत्या दोन दशकांत थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल की, लोकांना त्यांच्या गावाजवळ, ग्रामीण भागातच रोजगार मिळेल आणि त्यांचे शहरांवरील अवलंबित्व कमी होईल, अशी मला आशा वाटते.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा जरी सहा महसुली विभागातल्या १० जिल्ह्यांमधून जाणार असला तरी त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ सगळ्या राज्याला मिळणार आहे. मी तर म्हणेन की, हा देशातील एक गेमचेंजर प्रकल्प राहील आणि पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या प्रोत्साहनाने आम्ही आणखीही असे मोठे प्रकल्प भविष्यात निश्चितपणे मार्गी लावू, असा एक विश्वास माझ्या मनात निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात प्रगतीचा लखलखाट आणो, अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो!
(लेखक महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.)

‘लय भारी’चा दिवाळी अंक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पुढील वितरकांकडे संपर्क साधावा : मुंबई :बागवे एजन्सी (७५०६०००८६९), पुणे : वीर एजन्सी (९४२२०३४१७६), नाशिक : पाठक ब्रदर्स (९९२२४६३०४०), कोल्हापूर : प्रशांत चुयेकर (९७६५०२४४४३), औरंगाबाद : केतन शहा (९५४५५१९४४०)

Video : असा रंगला ‘लय भारी’चा उद्घाटन सोहळा

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!